अभियांत्रिकी प्रवेश आणि प्रकिया (१)
अभियांत्रिकी प्रवेश आणि प्रकिया (१)
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधी निर्माणशास्त्र, वास्तुकला आणि
हॉटेल व्यवस्थापन ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या
वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा २ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेतली
जाईल. या काळात विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत मग्न असतील तेव्हा पालकांनी mhtcet2022.mahacet.org या संकेतस्थळावरील (इन्फॉर्मेशन
ब्रोशर-टेक्निकल एज्युकेशन कोर्सेस-कॉमन एंट्रंस टेस्ट-एमएचटी-सीईटी २०२२) माहितीपुस्तिका
काळजीपूर्वक वाचून ठेवावी.
सीईटीव्दारे इच्छित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी गुण जसे आवश्यक
ठरतात त्याचबरोबर बरीच कागदपत्रे आणि दाखलेही आवश्यक असतात. विशेषत: राखीव संवर्ग घटकातील
उमेदवारांना प्रवेश अर्ज सादर करताना काही दाखले व प्रमाणपत्र जोडणे गरजेचे असते.
त्याअभावी अर्ज नाकारला जाऊ शकतो किंवा प्रलंबित राहू शकतो किंवा पुढे प्रवेश
प्रक्रियेत रद्दही होऊ शकतो. त्यामुळे हे दाखले /कागदपत्रे मिळवण्यासाठी आतापासूनच
हालचाल करायला हवी.
गृह विद्यापीठ
या सामाईक प्रवेश प्रक्रियेमध्ये गृह (होम) विद्यापीठाला महत्वाचे स्थान असते. या विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या
शासकीय अस्वायत्त (नॉन ॲटानॉमस) आणि
विद्यापीठांतर्गत येणारे विभाग (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट)- अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७० टक्के जागा या गृहविद्यापीठ
प्रवर्गातील असतात. याचा अर्थ असा की, या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या
महाविद्यालयांमधून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य
दिले जाते.
गृहविद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारे जिल्हे-
(१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ,
औरंगाबाद- (जिल्हे- औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद), (२) स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठ, नांदेड - (जिल्हे- हिंगोली, लातूर,
नांदेड, परभणी), (३) मुंबई विद्यापीठ- (जिल्हे- मुंबई शहर, मुंबई उपनगर,
रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे), (४) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर- (जिल्हे - कोल्हापूर, सांगली, सातारा), (५) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ- (जिल्हे- पुणे, नासिक, अहमदनगर), (६) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठ, जळगाव - (जिल्हे- जळगाव, धुळे, नंदुरबार), (७) पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर विद्यापीठ, सोलापूर- (जिल्हा- सोलापूर), (८) गोंडवाना विद्यापीठ -(जिल्हे- चंद्रपूर, गडचिरोली), (९) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ - (जिल्हे- भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा) (१०) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ- (जिल्हे- अकोला,
अमरावती, बुलडाना, वाशिम, यवतमाळ)
शासकीय संस्थांमधील प्रवेश
(१) शासकीय स्वायत्त संस्था (एसएनडीटी) - १०० टक्के जागा
राज्यस्तरीय. (२) शासकीय अस्वायत्त
संस्था आणि विद्यापीठ विभाग - १ आणि २
गटातील संस्थांमध्ये अखिल भारतीय प्रवेश कोटा, संस्थेचा कोटा आणि अल्पसंख्याक कोटा
नाही. (३) इंस्टिट्यूट ऑफ
केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई - ७० टक्के जागा राज्यस्तरीय, ३० टक्के जागा अखिल भारतीय
कोट्यातून भरल्या जातात. या संस्थेत व्यवस्थापन कोटा आणि अल्पसंख्यांक कोटा नाही. (४) डॉ.बाबासाहेब
आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ, लोणेरे - ८५ टक्के जागा राज्यस्तरीय आहेत. १५ टक्के
जागा कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांसाठी
राखीव आहेत. या संस्थेत अखिल भारतीय प्रवेश कोटा, व्यवस्थापन कोटा आणि
अल्पसंख्यांक कोटा नाही. (५) शासकीय/ अनुदानित शासकीय- अल्पसंख्याक
महाविद्यालये - (स्वायत्त) संस्थेतील ५० टक्के
जागा राज्यस्तरीय आहेत. अशा संस्थेतील ३५ टक्के जागा गृह विद्यापीठांतर्गत
येणाऱ्या महाविद्यालयांसाठी आणि १५ टक्के जागा इतर विद्यापीठांसाठी राखीव असतात. या संस्थांमधील ५० टक्के जागा अल्पसंख्यांकासाठी
राखीव आहेत.
अशासकीय संस्थांमधील प्रवेश
(१) विनाअनुदानित खाजगी
व्यावसायिक/प्रायव्हेट प्रोफेशनल संस्था- (अल्पसंख्याक संस्था
वगळून) - (अ) स्वायत्त संस्था- ६५ टक्के जागा राज्यस्तरीय, (ब) अस्वायत्त संस्था-
४५.५ टक्के जागा गृह विद्यापीठ, १९.५ टक्के जागा इतर विद्यापीठ. अ आणि ब गटासाठी -
अखिल भारतीय कोट्यातील जागा- १५ टक्के, संस्थेच्या कोट्यातील जागा - २० टक्के.
अल्पसंख्याक कोटा नाही. (२) विनाअनुदानित
अल्पसंख्याक संस्था - (अ) स्वायत्त संस्था-
१०० टक्के जागा राज्यस्तरीय, (ब) अस्वायत्त संस्था- ७० टक्के जागा गृह
विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आणि ३०
टक्के जागा इतर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांसाठी.
अखिल भारतीय कोट्यासाठी जॉईंट एन्ट्रस
एक्झामिनेशन (जेईई-मेन) या परीक्षेचे गुण
ग्राह्य धरले जातात.
इतर मुद्दे
(१) संरक्षण दलातील पालकांच्या मुलांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात
येतात. त्यासाठी पुढील तीन प्रकार करण्यात आले आहेत - (१) डिफेन्स एक - महाराष्ट्राचे अधिवासी (डोमेसाईल) असलेले माजी सैनिक, (२)
डिफेन्स दोन- सध्या संरक्षण दलात कार्यरत महाराष्ट्राचे अधिवासी असणारे
जवान/अधिकारी. (३) डिफेन्स तीन-
महाराष्ट्राचे अधिवासी नसलेल्या पण सध्या महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या
जवान/अधिकारी यांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. किंवा महाराष्ट्राचे
अधिवासी नसणा-या व सध्या त्यांच्या बदलीमुळे इतरत्र कार्यरत असणाऱ्या जवान/अधिकाऱ्यांचे
पाल्यही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र अशा
संबंधितांचे कुटुंबीय, पाल्याच्या शिक्षणासाठी नियमानुसार महाराष्ट्रात
राहणारे असावे. त्यांच्या पाल्याने १२ वी(एचएससी)ची परीक्षा महाराष्ट्रातील शाळा/महाविद्यालयातून देणे आणि उत्तीर्ण होणे
आवश्यक आहे. या तिनही प्रकारातील उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी तयार केली
जाते. यासाठी विशेष प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या योजनेचा लाभ भारतीय लष्करी
सेवेतील नागरी (सिव्हिलियन स्टाफ)
कर्तव्य पार पाडणाऱ्या किंवा पार
पाडलेल्या व्यक्तिंच्या पाल्यांना दिला जात नाही. (२)
५ टक्के जागा दिव्यांगासाठी राखीव असून त्यासाठी २१ प्रकाराचे
अपंगत्व अधोरेखित करण्यात आले आहेत. यासंवर्गाचा फायदा घेण्यासाठी उमेदवारास,
किमान ४० टक्के अपंगत्व असून ते कायमस्वरुपी असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे
प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्राचे अधिवासी असणाऱ्या
उमेदवारांना, गृहविद्यापीठ/राज्यस्तरीय जागेसाठी दिला जातो. (६) अनाथ उमेदवारांसाठी एक टक्का जागा राखीव आहेत.
याचा लाभ अल्पसंख्याक संस्था आणि अखिल भारतीय जागा संवर्गाला दिला जात नाही.
संस्था वा विषयातील बदल
(१) पहिले वर्षं यशस्वीपणे पूर्ण
केलेल्या एखाद्या उमेदवारास विषयामध्ये अथवा पाळीमध्ये (शिफ्ट) बदल करावयाचा असल्यास, त्याला त्याच संस्थेत अशी संधी, जागा उपलब्ध
असल्यास मिळू शकते. संबंधित उमेदवारास पहिल्या व दुसऱ्या सत्रात मिळालेले गुण
यासाठी विचारात घेतले जातात. ही प्रक्रिया संबंधित संस्थेच्या प्राचार्यांमार्फत
पार पाडली जाते. (२) पहिल्या,
दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षानंतर विषय अथवा संस्था बदलाची प्रकिया - (अ) पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला
प्रवेश मिळालेला संबंधित उमेदवार, त्याच शैक्षणिक वर्षात दुसऱ्या कोणत्याही
संस्थेत बदलीसाठी पात्र ठरणार नाही. (ब) पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षानंतर, इच्छुक
विद्यार्थ्यांना काही अटी/शर्तींसह दुसरा विषय अथवा दुसऱ्या संस्थेत बदलीची संधी
मिळू शकते. (क) मात्र कोणत्याही
परिस्थितीत विनाअनुदानित संस्थेमधून शासकीय अथवा शासकीय अनुदानित संस्था,
विद्यापीठाचे विभाग किंवा विद्यापीठामार्फत व्यवस्थापन करण्यात येणारे विभाग यात
बदली केली जाणार नाही. तथापि शासकीय अथवा शासकीय अनुदानित संस्था, विद्यापीठाचे
विभाग किंवा विद्यापीठांमार्फत व्यवस्थापन करण्यात येणारे विभाग यातील
विद्यार्थ्यांची विनाअनुदानित संस्थांमध्ये बदली होऊ शकते. (ड) स्वायत्त
संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची बदली कोणत्याही टप्प्यावर होत नाही. (इ) शासकीय अथवा शासकीय
अनुदानित संस्था, विद्यापीठाचे विभाग किंवा विद्यापीठामार्फत व्यवस्थापन करण्यात
येणाऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना याच घटकातील दुसऱ्या संस्थेत बदली हवी
असल्यास, त्यांना संबंधित संस्थेच्या प्राचार्यांमार्फत अर्ज सादर करावा लागतो.
संबंधित प्राचार्यांना, आपल्या संस्थेतील रिक्त जागा, संबंधित उमेदवाराची गुणांची
टक्केवारी, ज्या संस्थेत आणि ज्या अभ्यासक्रमात बदली हवी असेल त्याचे नाव, बदलीचे कारण आणि शेऱ्यांसह, संपूर्ण माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवावी लागते. संचालनालयाकडून
अंतिम मान्यतेसाठी, बदली उमदेवारांची यादी प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे (ॲडमिशन्स रेग्युलेटिंग ॲथॉरिटी) पाठवली जाते. प्राचार्य अथवा संचालकांच्या
शिफारशीविना आलेल्या अर्जांचा विचार केला जात नाही. (ई) काही अटीशर्तींसह
विनाअनुदानित संस्थांचे प्राचार्य/संचालक इतर संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या बदली प्रवेशासंदर्भात
विचार करु शकतात. मात्र त्यासाठी त्यांना आधी तंत्रशिक्षण संचालनालयाची मान्यता
घ्यावी लागते.
सुरेश वांदिले
०००

Comments
Post a Comment