"नीट" विचार करा
"नीट" विचार करा
पदवीस्तरीय वैद्यकीय शाखेतील विविध
अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेली नीट (नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ची परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेला देशभरातील २२ लाखाच्या आसपास विद्यार्थी बसले होते. या परीक्षेव्दारे बहुतेक विद्यार्थ्यांना
एमबीबीएस या अभ्यासक्रमालाच प्रवेश मिळवायचा असतो.
भारतातील वेगवेगळ्या राज्यातील सर्वच वैद्यकीय
महाविद्यालयातील एमबीबीएसची प्रवेश संख्या १,०१,०४३ अशी आहे.
त्यापैकी शासकीय महाविद्यालयातील प्रवेश संख्या
४८,२५६ अशी आहे.
शासकीय महाविद्यालयातील शिक्षण शुल्क हे परवडणारे
असल्याने या महाविद्यालयातील एमबीबीएसला प्रवेश मिळवणे हे बहुतेक सर्वच
विद्यार्थ्यांचे स्वप्न् असते. पालकांनांही तसेच वाटत असते. गेल्या काही वर्षात
ही परिस्थिती थोडी बदलेली दिसते. शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर बरेच बरे,
नाहीतर खाजगी महाविद्यालात मिळत असेल तरीसुध्दा काळजी नाही, हम मॅनेज कर लेंगे, असे
सुस्थितीतील पालकांना वाटते. कमी सुस्थितीतील इतर पालक या महाविद्यालयांचे काही
लाख किंवा कोटीपर्यंत पोहचलेले शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी फारशी खळखळ करत नाही. बस्स,
त्यांना प्रवेश हवा असतो.
जीवाचे रान
एमबीबीएस प्रवेशासाठी अतितीव्र जीवघेणी स्पर्धा
असल्याने विद्यार्थी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक जीवाचे रान करतात. महागड्या
शिकवणी वर्गात जातात. बरेच पालक तर राहते शहर सोडून, त्यांना कुणीतरी जवळच्याने सांगितले
म्हणून हैदराबाद पासून दिल्लीपर्यंत मुलांना या शिकवणीसाठी पाठवतात. नागपूरची मुलं
पुण्यात येऊन धडकतात. अशा दूरवरच्या शिकवणी वर्गात घेतलेला प्रवेश म्हणजे यशाची
हमखास हमी, असे बहुतेक पालकांना वाटते. अखंड अभ्यास एके अभ्यास करुन आणि शिकवणी
वर्गाच्या शेकड्याने चाळणी परीक्षा देऊनही बऱ्याच मुलांना एमबीबीएसच काय पण इतरही वैद्यकीय
शाखांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारे किमान गुण नीटमध्ये मिळत नाही. असे
विद्यार्थी पुन्हा एका प्रयत्नासाठी आग्रही असतात. बरेच पालकही त्याच विचारचे
असतात. काही विद्यार्थ्यांना इतर वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश मिळू शकेल असे गुण
मिळतात, पण त्यांचे खाईत तुपाशी नाही तर उपाशी, या उक्तीप्रमाणे, करीन तर
एमबीबीएसच अन्यथा दुसरे काहीच नाही, असे ठरलेले असते. त्यावर ते ठाम असतात. ते
सुध्दा दुसऱ्या प्रयत्नाची वाट स्वीकारतात. अशा विद्यार्थ्यांपुढे पालक हतबल
झालेले दिसतात.
दुसऱ्या प्रयत्नाचा पर्याय स्वीकारणे हा ज्याचा
त्याचा व्यक्तीगत प्रश्न! मात्र,
एक बाब लक्षात ठेवायला हवी की अपवाद वगळता दुसऱ्या प्रयत्नातही मनाजोगते गुण
मिळतील याची शक्यता (प्रॉबेबलिटी) फार कमी असल्याचे आकडेवारी सांगते. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर
आधीच्या प्रयत्नापेक्षाही कमी गुण मिळतात. यापैकी काही विद्यार्थी पुन्हा तिसऱ्या
प्रयत्नाच्या पर्यायाचा आग्रह पालकांकडे धरतात.
दुसऱ्या
आणि तिसऱ्या प्रयत्नाचा पर्याय
पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या प्रयत्नांकडे
वळण्यापूर्वी या परीक्षेतील अपयशाचे नेमके कारण शोधण्यासाठी, विद्यार्थी आणि
त्यांचे पालक साधकबाधक विचार करतात काय? यासाठी
शिकवणी सरांशी चर्चा करायला हवी. विद्यार्थ्याची नेमकी अडचण काय, हे समजणे फार आवश्यक
ठरते. विहिरीत पाणीच नसल्यास तुम्ही आणखी कितीही वर्षे ते पाणी काढण्याचा प्रयत्न
केला तरी पोहऱ्यात येणार कसे?
परीक्षेचे स्वरुप
नीट परीक्षा ही काही पाठांतराची परीक्षा नाही, हे
समजून घेतले पाहिजे. गाइड अथवा शिकवणी सरांचे नोटस् किंवा ज्या कोणत्या बोर्डात
शिकत असेल त्या बोर्डाच्या क्रमिक पुस्तकातील शब्द न शब्द पाठ केला तरी या
परीक्षेत यश मिळू शकत नाही. या परीक्षेत बहुपर्यायी वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह
मल्टिपल चॉइस)
चे प्रश्न असतात म्हणून शिकवणी वर्गात मिळणारे
तसे हजारो प्रश्न पाठ करणे म्हणजे खूप अभ्यास करणे नव्हे. आता तर चूक की बरोबर या
सोबतच किंबहुना त्यापेक्षाही अधिक, कोणता पर्याय अधिक अचुक असे पर्याय दिले जातात.
म्हणजे सर्वच उत्तरे बरोबर असल्याने विद्यार्थ्याने सर्वात अचुक उत्तर लिहिले नाही
तर त्याचे गुण जाणार. याचा अर्थ नीट परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमातील प्रत्येक
विषय घटक स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक ठरते. यामध्ये हा कमी महत्वाचा तो अधिक
महत्वाचा असे डावे-उजवे करुन चालत नाही.
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रापेक्षा जीवशास्त्र
सोपे असे गृहीत धरुन त्यातले काहीही विचारले तरी आपणास कठीण जाणार नाही, अशीही एक
भ्रामक समजूत बऱ्याच विद्यार्थ्यांची असते. त्यामुळेसुध्दा त्यांची विकेट जाते. भौतिकशास्त्र
आणि रसायनशास्त्राइतके जीवशास्त्रातील विषय घटक स्पष्टपणे समजून घेणेच इष्ट ठरते. प्रत्येक
विद्यार्थ्याची आकलन क्षमता सारखीच असू शकत नाही. त्यामुळे काहींना काही भाग लवकर
समजू शकतो, तर बऱ्याच जणांना तो समजू शकत नाही. आपणास कोणकोणते घटक सतत कठीण
जातात, डोके दुखवतात हे विद्यार्थ्याला दोन वर्षाच्या अभ्यासानंतर नक्कीच कळायला
हवे. त्याविषयी त्याने शिकवणी सरांची चर्चा करायला हवी. घरीही पालकांना सांगायला
हवे. पण बहुतेक वेळा तसे होत नाही. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी
अखंड अभ्यास हा मागील वर्षीच्या न सुटलेल्या अडचणी तशाच ठेऊन केला जातो. त्यामुळे
या घटकांमधील प्रश्न विचारले गेले तर पेपर अवघडच जाणार हे सांगायला ज्योतिषाची गरज
भासू नये.
जडपणा
आणि नैराश्य
आधीची दोन तीन वर्षे आणि आताचे एक वर्ष, तेच तेच
वाचून विद्यार्थ्यांच्या मेंदूला जडपणाही येऊ शकतो. अरे, हे तर आपण वाचलेच आहे
किंवा हे तर पाठच झाले आहे, असे वाटून विद्यार्थी काही भागाकडे दुर्लक्ष करु शकतो.
दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी स्पर्धा आणखी वाढलेली असते. नव्या दमाच्या
विद्यार्थ्यांसोबत धावावे लागते. दुसऱ्या वर्षी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना
आपल्या बरोबरीची मुले पुढे गेली, आपण तिथेच आहोत, याचे थोडेफार वैषम्यही असते. त्याचाही
त्यांच्या मनावर सुप्त परिणाम होत असतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन पालक आणि
विद्यार्थ्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नाचा विचार करायला हवा. गरज भासल्यास
समुपदेशकाशीही चर्चा करायला हवी.
एमबीबीएसच्या पलिकडेही वैद्यकीय क्षेत्र असल्याचे
लक्षात घ्यावे. (उदा- बॅचलर ऑफ डेंटल सायंस, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक
मेडिसीन ॲण्ड सर्जरी, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसीन ॲण्ड सर्जरी, बॅचलर ऑफ सिध्द
मेडिसीन ॲण्ड सर्जरी, बॅचलर ऑफ नॅचोरेपथी ॲण्ड योग सायंस, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक
मेडिसीन ॲण्ड सर्जरी, बॅचलर ऑफ युनानी मेडिसीन ॲण्ड सर्जरी, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, इत्यादी) एमबीबीएस
इतका मान - सन्मान- प्रतिष्ठा- पैसा इतर वैद्यकीय शाखांमध्ये मिळत नाही, हे खरे असले
तरी, या शाखांमध्ये मिळणारे ज्ञान हे कौशल्य निर्मिती करणारे असते. याचा अर्थ पाच
साडेपाच वर्षांनंतर विद्यार्थ्याला एक कला प्राप्त झालेली असते. या कला-कौशल्याचा
वापर करुन हा विद्यार्थी उत्तमच नव्हे तर चांगल्या दर्जाचे आयुष्य भविष्यात जगू
शकतो. शिवाय मिळवलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रभावीपणे वापर कितपत केला जातो यावर
यशाची समिकरणे ठरत जातात. इतर वैद्यकीय शाखेतही आता पदव्युत्तर पदवी, संशोधन अशा
संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकडेही भविष्यात वळता येऊ शकते. दुसऱ्या प्रयत्नानंतर
पुन्हा तिसऱ्या प्रयत्नांचा अट्टाहास धरण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांनी याचा
साकल्याने विचार करायला हवा. अन्यथा आधीचे एक आणि हे दुसरे अशी दोन वर्षे वाया
गेली असे समजावे. सध्याचा काळ प्रचंड गतिमान स्पर्धेचा आहे. त्यामुळे आपली
महत्वाची दोन वर्षे वाया जाणे याचा अर्थ भविष्यातील आपल्या प्रगतीला खिळ बसणे असा
होतो.
०००
वेगळी करिअर संधी
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हिअरिंग, ही
आपल्या देशातील कर्णबधिरांसाठी संवाद साधत त्यांना शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या
मनुष्यबळास प्रशिक्षित करणारी महत्वाची संस्था आहे. या संस्थेमार्फत, बॅचलर इन ऑडिओ ॲण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, हा
अभ्यासक्रम चालवला जातो. या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा
अभ्यासक्रम अनेक संधी उपलब्ध करुन देतो. अर्हता-विज्ञान शाखेतील १२ वी. प्रवेशासाठी
२६ जून रोजी चाळणी परीक्षा घेतली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३. संपर्क- नैमीशॅम कॉम्पेक्स
मानसगंगोत्री, म्हैसुरु - ५७०००६
संकेतस्थळ- www.aiishmysore.in, दूरध्वनी-०८२१-२५०२२८
ईमेल-admission@aiishmysore.in
.jpg)
Comments
Post a Comment