नव्या पर्वाचा प्रारंभ
आशा निराशेच्या हिंदोळ्यात यंदाचे
वर्षं सुरु झाले. जानेवारीच्या मध्यापर्यंत करोनाचा प्रभाव संपू लागला, असे वाटत
असतानाच ओमायक्रॉन, या करोनाच्या नव्या भावंडाचे आगमन झाले. हे भावंड ओह-माय-गॉड
म्हणायला लावते की काय अशी भीती वाटायला लागली. कारण त्याच्या प्रसार प्रचंड
वेगाने होऊ लागला. रुग्ण संख्याही वाढू लागली. मात्र दरम्यान लसिकरणाचीही गती
वाढली. नागरिकांनी मुखपट्टी वापरणे, हात आणि तोंडाची स्वच्छता, अंतर राखणे ,गर्दित
न जाणे या नियमावलीस बऱ्यापैकी अंगिकारले. परिणामी ओमायक्रॉनची वेगाने होणारी वाढ
दीड दोन महिन्यात कमी झाली. आता एप्रिलच्या मध्यात तर जणू काही पूर्विचे सामान्य
दिवस आले की काय, असे वाटू लागले. शासनानेही बहुतेक सर्व निर्बंध रद्द केले. खऱ्या
अर्थाने नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरु नये.
अशा या परिस्थितीत २०२२ मध्ये होणाऱ्या
दहावी - बारावी, पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा ऑफलाईन म्हणजे पूर्वीप्रमाणेच
परीक्षा केंद्रावर जाऊन देणे शक्य झाले. सर्व खबरदारी घेऊन परीक्षा सुरळीत
व्हाव्यात यासाठी यंत्रणेने प्रयत्न केले. गेल्या वर्षीसुध्दा काही स्पर्धा
परीक्षा ऑफलाईन झाल्या होत्या. यंदा उच्च शिक्षणासाठीच्या सर्व प्रवेश परीक्षा
ऑफलाईनच होतील. त्यामुळे आता पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यादृष्टिने आपली मानसिक
तयारी करायला हवी.
पुन्हा इकडच्या तिकडच्या देशात करोनाचा
आणखी नवा अवतार जन्मास आला, त्याने धुमाकूळ घातला. आपल्याकडे काय होईल, अशी चर्चा
सुरु झाली आहे. तिकडे दुर्लक्ष करावे. अशी चर्चा कायम होत राहणार, ही पक्की खूणगाठ
बांधायला हवी. शून्य करोना परिस्थिती ही नजिकच्या काळात तरी शक्य दिसत नाही.
त्यामुळे करोनाच्या सोबतीनेच यापुढे शैक्षणिक व्यवस्थेला आणि परीक्षांना पुढे जावे
लागेल.
डिजिटल शिक्षणाची पायाभरणी
गेल्या वर्षी बहुतांश काळ हा
ऑनलाईन-ऑफलाईन किंवा हायब्रिड म्हणजे या दोन्ही पध्दतीचा अवलंब करुन शिक्षण - प्रशिक्षण
देण्यात आले. हा कालावधी आपल्या देशात डिजिटल शिक्षणाची पायाभरणी करणारा ठरला. ही
पायाभरणी काहिंच्या मते सक्षमरित्या झाली काहिंच्या मते भुसभूशित झाली. मात्र
डिजिटल माध्यमांचा उपयोग शिक्षणात प्रभावीपणे व बऱ्याच अंशी खेड्यापाड्यांपर्यंत
केला जाऊ शकतो, ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली. त्यामुळे यापुढील काळ हा आपल्याकडे
डिजिटल माध्यमांचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढ किंवा कौशल्य निर्मिती, कौशल्यात
वाढ, नव्या कौशल्याची निर्मिती यासाठी केला जाईल. डिजिटल शैक्षणिक उद्योजकांची या
काळात झालेली वाढ, ही बाब सिध्द करते.
ऑफलाईन अभ्यासक्रम सुरु झाल्यावरही
डिजिटल माध्यमे आणि साधनांचा वापर हा यापुढील काळात शैक्षणिक कामांसाठी केला जाईल.
करोना काळामुळे पालक - विद्यार्थी आणि अध्यापक/ शिक्षकांना ही माध्यमे आणि
साधनांना आणि जुळूवन घ्यावे लागले. नंतर त्यावर प्रभुत्व मिळवता आले नसले तरी या
माध्यमांविषयी असलेली एक प्रकारची भीती किंवा अनास्था गेली. या माध्यमांचा उपयोग
करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. करोना काळाचा हा सुपरिणाम म्हणावा
लागेल.
ज्ञानाजर्नाची कल्पनातीत संधी
डिजिटल साक्षरता वाढीस लागल्याने
यापुढे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासाठी किंवा चौफेर व्यक्तीमत्व विकासासाठी
आवश्यक असणारे विविध अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण ऑनलाईन करता येणे अधिक सुलभ होणार
आहेत. हे अभ्यासक्रम केव्हाही आणि कधीही करण्यासारखे असल्याने शिवाय बरेच
अभ्यासक्रम अल्प शुल्कात आणि किंवा मोफतही करता येणे शक्य असल्याने, ज्ञानार्जनाची
कल्पनाही करता येणार नाही अशी संधी उपलब्ध झाली आहे. ज्ञानाचा सागर घरीच आल्याचे
म्हंटले तर वावगे ठरु नये. मात्र आपली घागर छोटी की मोठी हे मात्र ज्याच्या
त्याच्या कुवतीनुसार ठरेल. शिवाय डिजिटल माध्यमांसाठी प्राणवायू असणारे इंटरनेट, विद्यार्थ्यांना
अनंत आकषर्णाच्या भुलभूलैय्यांमध्ये अडकवण्यासाठी सदैव तयार असतील, हे लक्षात
ठेवायला हवे. या भुलभूलैय्यात जे अडकतील, त्यांचं होणार नुकसानही मोठे असेल. कारण,
यासाठी दिला जाणारा वेळ, विद्यार्थ्यांना अधिक सुज्ञ करण्याएैवजी अधिक अज्ञ करणारा
आणि अंधारात ढकलणारा असेल हे लक्षात ठेवायला हवे.
कौशल्य निर्मिती
करोनाच्या दोन वर्षाच्या काळात
सर्वाधिक महत्व आले ते कौशल्य निर्मितीस. कोणतेही कौशल्य असलेल्या व्यक्तींना
रोजगार मिळू शकतो आणि अशा व्यक्ती स्वयंरोजगारही करु शकतात, हे दिसून आले. त्यामुळे
या काळात सर्वाधिक भर कौशल्य निर्मिती, कौशल्याचे उन्नतीकरण (अपग्रेडेशन), नवे कौशल्य हस्तगत करणे (रिस्किलिंग) यावर धोरणकर्त्यांचा अत्याधिक भर
राहिला. केवळ प्रधानमंत्रीच नव्हे तर उद्योजक आणि व्यवसाय क्षेत्रातील धुरिणांनी
या घटकावर अधिकाधिक भर दिला. निम्नस्तरीय रोजगारापासून ते उच्चश्रेणिच्या
रोजगारापर्यंत नव्या कौशल्याची गरज असल्याचे सिध्द झाले.
अशी कौशल्ये सातत्याने हस्तगत करणे ही
सध्याची गरज झाली आहे. एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम चांगल्या संस्थेतून केला, चांगली
नोकरी लागली, म्हणजे करिअर मार्गाला लागले असे समजण्याचे दिवस सरले आहेत, याकडे सर्वच
तज्ज्ञ वारंवार लक्ष वेधत आहेत. नवे तंत्र आणि त्यातील बारकावे विद्यार्थ्यांना
सतत शिकावे लागतील. कधी स्वत:च्या पैशाने तरी संस्थेच्या पैशाने. त्यात हयगय
चालणार नाही. असे कौशल्य आणि तंत्र हस्तगत केल्यानंतर कंपनी/ उद्योग/ व्यवसायाच्या
अधिकाधिक नफ्यासाठी अथवा फायद्यासाठी करता येण्याची क्षमता प्राप्त करावी लागेल. यामध्ये
जे विद्यार्थी/ उमेदवार आघाडी घेतील, त्यांची प्रगती विस्मयकारक गतिने होण्याची
शक्यता नाकारता येत नाही. विविध प्रकारच्या जबाबदाऱ्यासुध्दा अशा उमेदवारांना मिळू
शकतात.
तेव्हा, यंदा १०-१२ वीची परीक्षा देऊन
पदवी अभ्यासक्रमाला जाणा-या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी ही खूणगाठ
आत्तापासून मनात पक्की केली पाहिजे. १० वी व १२ वी किंवा पदवीमधील गुण किंवा
त्यांची टक्केवारी ही महत्वाची राहील पण तुमचे करिअर घडवण्यासाठी ही टक्केवारीच
एकमेव घटक ठरणार नाही. उत्तम संवाद साधता येणे, उत्तम लिहिता येणे, उत्तम सादरीकरण
करता येणे, नव्या तंत्राचा वापर सहजतेने करुन आपल्या स्मार्टनेसची खात्री पटवणे
अशा बाबी महत्वाचा ठरणार आहेत.
ही सगळी व इतरही कौशल्ये आता घरबसल्या
प्राप्त करता येतात. त्याची साधने हातातील स्मार्टफोन पासून ते मांडीवरच्या लॅपटॉप
पर्यंत सर्वत्र आहेत. त्याचा सतत शोध घेणे आणि त्याचा फायदा घेणे गरजेचे आहे.
यंदा काय?
यंदाच्या मार्ग यशाचा या मालिकेत, १०
वी १२ वी आणि पदवी नंतरच्या करिअर आणि
रोजगार आणि स्वयंरोजगार संधी याविषयी माहिती देण्यात येईल. हे सर्व सध्याच्या
डिजिटल माध्यमे - कौशल्य निर्मिती- नव्या तंत्राचा स्वीकार आणि त्यावरचे प्रभुत्व
याच्या अवतीभवती फिरत राहील. कला- वाणिज्य आणि विज्ञान म्हणजेच या सर्व
ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरु शकतील असे अभ्यासक्रम, त्या शिकवणाऱ्या
संस्था, या अभ्यासक्रमांसाठी असणारी प्रवेश प्रक्रिया, परीक्षा पध्दती, संस्थेचे
प्लेसमेंट, इंटर्नशीपची सुविधा, गेल्या एक-दोन वर्षात सुरु झालेले नवे अभ्यासक्रम,
काही संयुक्तिक आकडेवारी यांचा प्रसंगपरत्वे उल्लेख त्यात येत राहील. यातील
बहुतांश संस्था केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील असतीलच. मात्र गेल्या काही
वर्षात ज्या खाजगी संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी सातत्याने केली आणि
त्यांचा समावेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या
नॅशनल इंस्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये सर्वोच्च ५० ते १०० क्रमांकात
होतो, त्यांच्या अभ्यासक्रम- प्रवेश प्रकिया- चाळणी परीक्षा आदींची माहिती देण्यात
येईल. शिवाय सध्याचे प्रवाह आणि संधी याविषयी प्रसंगपरत्वे माहिती देण्यात येईल. ही
सर्व माहिती केवळ उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठीच असेल असे समजण्याचे कारण
नाही. सर्वसाधारण पातळीवरचा आणि चौकस, परिश्रमी अशा विद्यार्थ्यांसाठी सुध्दा ही
माहिती उपयुक्त ठरु शकेल. यातील अभ्यासक्रमांची माहिती यंदाच्या म्हणजे २०२२ मधे
जशी उपयुक्त ठरेल तसेच २०२३ चा करिअरचा रोडमॅप तयार करताना अधिक उपयुक्त ठरेल.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment