दुग्धव्यवसायातले तंत्रज्ञ
दुग्धव्यवसायातले तंत्रज्ञ
करोना काळात दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे
दिसून आले. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यदायी असल्याने पूर्वीपासूनच
भारतीयांचा ओढा त्यांच्या सेवनाकडे होताच. भारतामध्ये दुधाचे उत्पादन मोठ्या
प्रमाणावर होते. त्यावर प्रकिया करुन विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती
करणाऱ्या अनेक नामाकिंत संस्था आपल्या देशात उभ्या राहिल्या. लहान प्रमाणावरील
संस्था/व्यवसायही भारतभर कार्यरत आहेत. यातील अनेक संस्थांनी उद्योगाचा दर्जा
प्राप्त केला आहे. अशा संस्थांना संशोधन आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती
प्रक्रिया ते विक्री अशा विविध बाबींसाठी तंत्रज्ञ आणि संशोधकांची गरज भासते.
या क्षेत्रासाठी उत्कृष्ठ गुणवत्ताप्राप्त मनुष्यबळाची निर्मिती
नॅशनल रिसर्च डेअरी इंस्टिट्यूट, ही संस्था करत असते. या संस्थेतील विविध
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या विषयात रस असणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी
सुध्दा यंदा प्रयत्न करायला हरकत नाही. पदविका- पदवी-पदव्युत्तर पदवी- पीएचडी अशा
विविध पातळयांवरील येथील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम करिअरच्या संधी
हमखास मिळवून देतात.
संस्थेचे महत्व
भारतीय कृषी अनुसंधान (इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल
रिसर्च) या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत
असणारी, ही संस्था आपल्या देशातील दुध आणि दुग्ध तंत्रज्ञान विषायातील शिक्षण, प्रशिक्षण
देणारी आणि संशोधनास चालना देणारी सर्वात महत्वाची संस्था होय.
भारताच्या
दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या विकास आणि वाढीत या संस्थेने बजावलेली भूमिका फार मोठी
आहे. या संस्थेची स्थापना १९२३ साली बेंगळुरु येथे करण्यात आली. गेल्या जवळपास ९६
वर्षांपासून संस्थेने दुग्ध व्यवसायाशी निगडित विविध पैलुंवर प्राधान्याने लक्ष
पुरवले आहे.
१९२७ साली महात्मा
गांधी यांनी या संस्थेत दोन आठवड्यांचा कालावधी व्यतित केला होता. पाळीव
प्राण्यांच्या व्यवस्थापनाच्या आधुनिक पध्दती, गायी आणि म्हैशींच्या अनुषंगाने
उद्भवणाऱ्या वैद्यकीय/तांत्रिक समस्यांचा अभ्यास या ठिकाणी त्यांनी केला. या
संस्थेतील संशोधन गांधीजींच्या प्रशंसेस पात्र ठरले. गोवंशाबाबत उद्भवत असलेल्या
समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी संस्था करत असलेल्या प्रयत्नांची माहिती
गांधिजींनी करुन घेतली. याबाबात त्यांनी हरिजन आणि यंग इंडिया या नियतकालिकांमध्ये
लेखही लिहिले होते. स्वांतत्र्योत्तर काळात गांधीजींच्या विचारानुसार ग्राम विकास,
गोवसंवर्धन आणि शास्त्रीयदृष्ट्या जनावरचे संगोपनादी व्यवस्थापन या
विषयांच्याअनुषंगाने तत्कालीन राजकीय नेत्वृत्वास निर्णय घेण्यास बाध्य केले. १९३६
साली ही संस्था बेंगळुरुहून कर्नाल येथे स्थानांतरित करण्यात आली. १९५५ साली या
संस्थेचे नामांतर, नॅशनल डेअरी रिसर्च इंस्टिट्यूट असे करण्यात आले.
सर्वोच्च संस्था
या संस्थेला १९८९
साली डिम्ड युनिव्हर्सटीचा दर्जा देण्यात आला. दुग्ध तंत्रज्ञान व्यवसायात शिक्षण
- प्रशिक्षण देणारी ही आशिया खंडातील सर्वोच्च दर्जाची संस्था समजली जाते. अध्यापन
आणि दुग्धजन्य व्यवसाय/ उद्योगासाठी लागणाऱ्या उच्च प्रशिक्षित मनुष्यबळाचा पुरवठा
या संस्थेने सातत्याने केला आहे.
या संस्थेची
स्थापना बेंगळुरु येथे करण्यात आली असली तरी, कर्नाल येथे ही संस्था स्थानांतरित
झाल्यावर बेंगळुरु केद्रांचे रुपांतर दक्षिणेतील कॅम्पस म्हणून करण्यात आले. या
ठिकाणी संशोधन आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कृत्रिम
रेतन प्रशिक्षणाचा कार्यक्रम देशात पहिल्यांदा या ठिकाणी राबवण्यात आला.
इतर उपक्रम
संस्थेमार्फत कृषी
आणि डेअरी विकास केंद्राची स्थापना बिहारमधील पश्चिम चंपारण क्षेत्रात येणाऱ्या
पिपराकोठी येथे २०१६ साली स्थापन करण्यात आली. उत्तरप्रदेशातील मुझ्झफरनगर येथे
मॉडेल डेअरी सेंटरची स्थापना २००२ साली स्थापन करण्यात आली. दुग्ध
व्यवसायक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरण्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन दिल्या
आहेत.
सुसज्ज प्रयोगशाळा
कर्नाल येथे
अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे यांसह सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
या संस्थेचे कॅम्पस ५६० एकराच्या परिसरात वसले आहे. या ठिकणी १८०० दुधाळ जनावरांचे
दूध काढणारी अत्याधुनिक यंत्रणा (मिल्क पार्लर) उभारण्यात आली आहे. जनावरांचे निवास/आसरा व्यवस्थापन,
जनावरांच्या अधिक दर्जेदार प्रजाती निर्मिती प्रकल्पांवर येथे काम केले जाते. या
ठिकाणी दुग्ध विषयक सर्व आधुनिक विषय-घटकांवार सखोल संशोधन केले जाते.
अभ्यासक्रम
या
संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात. (१)
डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी, (२) डिप्लोमा इन ॲनिमल हसबंड्री ॲण्ड डेअरी,
(३)
बी.टेक इन डेअरी टेक्नॉलॉजी, (४) एम.टेक, (५)
पीएचडी
बी.टेक इन डेअरी
टेक्नॉलॉजी-
या अभ्यासक्रमात दूध
उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रकियेच्या अनुषंगाने सैध्दांतिक आणि प्रात्यक्षिक
ज्ञान प्रदान केले जाते. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या
उपकरणांचे नियंत्रण, दुरुस्ती आणि देखभाल या अभियांत्रिकी बाजूही शिकवल्या जातात. अभ्यासक्रमाचा कालावधी - चार वर्षे किंवा आठ सत्रे. सातव्या आणि
आठव्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दुग्ध प्रकिया सयंत्रावर काम करावे
लागते. या कालावधीत अशा सयंत्रांचे कार्यान्वयन आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले
जाते.
प्रवेश अर्हता- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह १२ वी
विज्ञान परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती, जमाती आणि
दिव्यांग संवर्गासाठी गुणांमध्ये १० टक्क्यांची सूट. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश
अखिल भारतीय स्तरावरील चाळणी परीक्षेतील गुणांवर दिला जातो. केंद्र सरकारच्या
नियमानुसार वेगेवगळया संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. या जागा रिक्त राहिल्यास
त्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जातात. वयोमर्यादा -३१ जुलै रोजी
१७ वर्षे ते २३ वर्षे असावे.
डिप्लोमा इन डेअरी
टेक्नॉलॉजी आणि डिप्लोमा इन ॲनिमल हस्बंड्री-
या दोन्ही
अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी तीन वर्षे किंवा सहा सत्रे. यातील एक सत्र
प्रत्यक्ष सयंत्रावर कार्य करावे लागते किंवा क्षेत्रीय स्तरावर कार्य करावे
लागते. अर्हता- १० वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
संस्थेमार्फत कर्नाल, बेंगळुरु आणि कल्याणी केंद्रावर चाळणी परीक्षा घेतली जाते. केंद्र
सरकारच्या नियमानुसार वेगेवगळया संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात. या जागा
रिक्त राहिल्यास त्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जातात.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- संस्थेच्या
कर्नाल, बेंगळुरु आणि कल्याणी येथील कॅम्पसमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता
येतात.
कर्नाल कॅम्पसमधील विषय- डेअरी मायक्रोबॉयलाजी, डेअरी केमिस्ट्री, डेअरी टेक्नॉलॉजी, डेअरी
इंजिनीअरिंग, ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल जेनेटिक्स ॲण्ड ब्रीडिंग, लाईव्हस्टॉक
प्रॉडक्शन ॲण्ड मॅनेजमेंट, ॲनिमल न्युट्रिशन, ॲनिमल फिजिऑलॉजी, डेअरी इकॉनॉमिक्स,
डेअरी एक्स्टेंशन एज्युकेशन, फोरेज प्रॉडक्शन, ॲनिमल रिप्रॉडक्शन गायनॉकॉलॉजी ॲण्ड
ऑबेस्टेट्रिक्स
बेंगळुरु कॅम्पसमधील विषय- डेअरी केमिस्ट्री, डेअरी टेक्नॉलॉजी, डेअरी इंजिनीअरिंग, ॲनिमल
बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल जेनेटिक्स ॲण्ड ब्रीडिंग, लाईव्हस्टॉक प्रॉडक्शन ॲण्ड
मॅनेजमेंट, ॲनिमल न्युट्रिशन, डेअरी एक्स्टेंशन एज्युकेशन,फूड क्वालिटी ॲण्ड
ॲश्युरन्स.
कल्याणी कॅम्पसमधील
विषय- ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, लाईव्हस्टॉक
प्रॉडक्शन ॲण्ड मॅनेजमेंट, न्युट्रिशन, डेअरी इकॉनॉमिक्स, ॲनिमल जेनेटिक्स ॲण्ड
ब्रीडिंग, डेअरी एक्स्टेंशन, ॲनिमल फिजिऑलॉजी.
कालावधी- (१) ज्या विद्यार्थ्यांनी चार वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण
केला असेल, त्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम दोन वर्षात पूर्ण करता येतो. (२) तीन वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम
केलेल्या विद्यार्थ्यांना ३ वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. अर्हता- संबधित
विषयातील ६० टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा या श्रेणितील गुणांक/श्रेयांक.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग संवर्गासाठी ५५ टक्के गुण. यंदा
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे उमेदवार या
अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. मात्र प्रवेशाच्या वेळी त्यांना गुणपत्रिका सादर
करावी लागते. या
अभ्यासकमाला अखिल भारतीय चाळणी परीक्षेव्दारे पवेश दिला जातो. इंडियन कौन्सिल ऑफ
ॲग्रिकल्चर रिसर्च संस्थेच्या वतिने ही परीक्षा, नॅशनल टेस्टिंग एजंसी मार्फत
देशातील विविध केंद्रांवर घेतली जाते. गुणवत्ता यादितील विद्यार्थ्यांना उपलब्ध
जागांनुसार प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या
सर्व विद्यार्थ्यांना दरमहा ७५६० रुपये ही संस्थेची शिष्यवृत्ती दिली जाते.
suresh
wandile
०००

Comments
Post a Comment