रोगप्रतिकार शास्त्रातील संधी


 

रोगप्रतिकार शास्त्रातील संधी

करोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात इम्युनॉलॉजी म्हणजेच रोग प्रतिकारशक्तीबद्दल व्यापक चर्चा झाली आणि होत आहे. ही ज्ञानशाखा पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. या शाखेतील शिक्षण आणि संशोधनही सुरु आहे. त्याची गती मात्र सामान्य स्वरुपाची  होती. फारसे ग्लॅमर नसलेल्या या शाखेतील शिक्षण आणि संशोधन शांतपणे सुरु होते. गेल्या वर्षीच्या मार्चपासून धुमाकूळ घालत असलेला करोना विषाणू मार्च २०२१ मध्ये स्वत:मध्ये बदल करुन नव्याने भारतासह अनेक देशांना त्रस्त करीत आहे. त्यामुळे यापुढे इम्युनॉलॉजी शास्त्राचा अभ्यास आणि संशोधनास प्राधान्य मिळेल हे निश्चित. या शाखेकडे अभावाने वळणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरचा एक महत्वाचा पर्याय म्हणून या शाखेचा विचार करायला हवा.

पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानंतर लगेच संधी मिळेल अशी शक्यता नसली तरी संशोधनाचा मार्ग स्वीकारल्यास देशात आणि परदेशातही विविधांगी संधी मिळू शकतात. पदवी ते संशोधनाचा हा कालावधी संयमाने अध्ययनात झोकून देणे गरजेचे आहे. हे दीर्घकालीन नियोजनाचे करिअर असल्याने यंदा १२ वी झालेल्या आणि जैविक विज्ञानात आवड आणि गती असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या विषयाचा विचार करावा.

संशोधनाची दिशा पकडण्यासाठीचा प्रारंभिक मार्ग हा पदवी  आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पूर्ततेतून जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील किंवा राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान विषयाचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थामध्ये प्रवेश घेण्याचे नियोजन करायला हवे.

 संशोधन अभ्यासक्रम

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानंतर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या संशोधन अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणे शक्य आहे. (ज्यांना शक्य असेल त्यांनी पदवीनंतर परदेशातील इम्युनॉलॉजी विषयातील इंटिग्रेटेड-पीएचडी अभ्यासक्रमाचाही विचार करायला हवा.)

ही संस्था केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणारी, संशोधन कार्यास प्राधान्य देणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत आजच्या काळातील अत्यंत महत्वाच्या विषयांवर संशोधन केले जाते. या विषयांना बुध्दीमान तरुणांनी संशोधनास प्राधान्य द्यावे यासाठी संस्थेमार्फत पीएचडी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते. ही पदवी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) दिल्लीशी संलग्नित करण्यात आली आहे. हे संशोधन इम्युनॉलॉजी, इन्फेक्शियस ॲण्ड क्रोनिक डिसिज बॉयलॉजी, मॉलेक्युलर ॲण्ड सेल्युलर बॉयलॉजी, केमिकल बॉयलॉजी, स्ट्रक्चरल बॉयलॉजी ॲण्ड कॉम्प्युटेशनल बॉयलॉजी या विषयांमध्ये करता येते.

अर्हता- () बॉयलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, गणित यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा एम.टेक, एम.बी.बी.एस, एम.व्ही.ए.स्सी, एम.फार्म, इंटिग्रेटेड एमएस्सी , () संबंधित उमेदवारांना १२ वी आणि पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान ६० टक्के आणि पदव्युत्तर पदवीला ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक. शासनाच्या नियमाप्रमाणे वेगवेगळया संवर्गासाठी जागा राखीव ठेवल्या जातात.

निवड प्रकिया- पीएचडी अभ्यासक्रमासाठी पुढील पध्दतीने उमेदवारांची निवड केली जाते. () संगणकाधारित ऑनलाइन परीक्षेतील गुण, () जॉईंट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन इन बायॉलॉजी ॲण्ड इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायंसेस, या परीक्षेतील गुण.

इच्छूक उमेदवारांना या दोनपैकी कोणतीही एक परीक्षा द्यावी लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अंतिम निवडीसाठी मुलाखती घेतल्या जातात. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३१ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. हा निवासी अभ्यासक्रम असून निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारासाठी संस्थेच्या वसतिगृहात व्यवस्था केली जाते.

संशोधन प्रकल्प

या संस्थेच्या वतिने एम.टेक,एम.व्हीएस्सी,एम.एस्सी आणि इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहा महिने कालावधीच्या प्रशिक्षण  कार्यक्रमाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या काळात  हे विद्यार्थी त्यांच्या प्रकल्पावर (प्रोजेक्ट) या संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करु शकतात.

या प्रशिक्षणासाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला १० वी पासूनच्या सर्व परीक्षांमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज ते सध्या शिक्षण घेतल असलेल्या शिक्षण संस्थांमार्फत पाठवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना () इम्युनिटी ॲण्ड इन्फेक्शन, ()जेनेटिक्स,सेल सिग्नलिंग ॲण्ड कॅन्सर बॉयलॉजी , () केमिकल बायॉलॉजी, स्ट्रक्चलर बायॉलॉजी ॲण्ड बायोकेमिस्ट्री () रिप्रॉडक्शन, सेल बायॉलॉजी ॲण्ड डेव्हलपमेंट.

आजच्या काळातील अत्यंत महत्वाच्या उपरोक्त नमूद विषयांमध्ये जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर अशा दोन कालावधित हे संशोधन प्रकल्प करता येतात.

संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, अरुणा आसफअली मार्ग, नवी दिल्ली- ११००६७, दूरध्वनी-०११-२६७१७१०१ आणि ०२२-६२५०७७२५, ईमेल-acdemic2021@nii.ac.in आणि  phdadm2021@nii.ac.in, संकेतस्थळ-www.nii.res.in

Comments

Popular posts from this blog

उच्च शिक्षणाचे प्रवेशव्दार!

महिला किसान सशक्तीकरण

वेगळे पर्याय