संगणकीय खेळांची उलाढाल
संगणकीय खेळांची उलाढाल
गेल्या आठवड्यात गेमिंग उद्योगाबाबत अर्थविषयक
नियतकालिकांमध्ये बातमी प्रकाशित झाली. या बातमीनुसार भारतात या करोना विषाणुमळे
लागलेल्या टाळेबंदीच्या काळात डिजिटल गेमिंग आणि ई-स्पोर्ट्सची लोकप्रियता प्रचंड
वाढलेली आहे. गेल्या वर्षी या उद्योगामध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली. पबजी या
गेमवरील बंदीमुळे ही वाढ काही काळ थांबली पण टाळेबंदीच्या काळात ई-स्पोर्टमध्ये
सहभागी होणाऱ्या व्यक्तिंच्या संख्येत ९० टक्के वाढ झाली. जवळपास दीड कोटी
प्रेक्षकांचा वेगवेगळया १७ प्रसारण माध्यमांव्दारे (ब्रोडकॉस्टिंग प्लॅटफॉर्म)
यात सहभाग नोंदवला गेला. फिकी (फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री ) च्या वार्षिक अहवालानुसार २०२० मध्ये ऑनलाइन
गेमिंग उद्योगाची उलाढाल ७७०० कोटी रुपयांपर्यंत पोहचली. हे डिजिटल गेम
खेळणाऱ्यांची संख्या २०२२ पर्यंत ४४० मिलियन पर्यंत पोहचण्याचा अंदाज या अहवालात
व्यक्त करण्यात आला आहे. नजारा टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिश
मित्तरसेन यांच्या अंदाजानुसार पुढील पाच वर्षामध्ये सर्व प्रकारच्या मनोरंजन
व्यवसायाच्या एकत्रित व्यवस्यापेक्षा १० पट अधिक या क्षेत्राचा विस्तार होऊ शकतो. सध्या
याव्यवसायाकडे वळणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. मात्र भविष्यातील संधी लक्षात
घेऊन या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्य हस्तगत केल्यास विपुल संधी
मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२२ च्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये
ई-स्पोर्टची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितिने याच महिन्यात
जागतिक ईस्पोर्ट् स्पर्धेची घोषणा केली आहे. ही स्पर्धा आलिंपिक व्हर्च्युअल सिरीज
या नावाने ओळखली जाईल.
०००
संस्था आणि अभ्यासक्रम
(1) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) या संस्थेने पदव्युत्तर पदवी स्तरावर मास्टर
ऑफ डिझाइन इन डिजिटल गेम डिझाइन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा या क्षेत्रातील
सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम समजला जातो. विद्यार्थ्यांच्या सजर्नशीलतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या अभ्यासक्रमातील
विषय घटक शिकवले जातात. हा अभ्यासक्रम केलेल्या सर्व उमेदवारांना उत्तमोत्तम संधी
प्राप्त झाल्या आहेत. हा अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय स्वरुपाचा असून यात संगणकीय
तंत्र, कला, सौंदयपूर्ण अभिकल्प, सामाजिक आणि ज्ञानप्रकिया समजून घेण्याची प्रकिया
या घटकांचा अध्ययनात समावेश करण्यात येतो. विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य, समूहात
काम करण्याची सक्षमता, सर्जनशील आणि टीकात्मक वैचारिक क्षमता आणि विविध
समस्यांच्या निर्धारणाचे कौशल्य हे गुण विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जातात.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात डिजिटल मीडिया, डिजिटल
आर्ट, गेमिंगचा इतिहास आणि सैध्दांतिक बाबी, टूडी आणि थ्रीडी ग्रॅफिक्स, मॉडेलिंग,
स्टोरी टेलिंग ॲण्ड नॅरेटिव्ह आर्किटेक्चर (कथानकाची मांडणी आणि बांधणी), यूझर इंटरफेस डिझाइन (वापरकर्त्यासाठी सुलभ
अभिकल्प), गेम डिझाइन, ऑनलाइन गेम, कॅज्युअल गेम, मॅसिव्हली
मल्टी प्लेअर गेम (असंख्य खेळांडूसह खेळला जाणार खेळ), या विषय घटकांचा समावेश आहे. डिजिटल गेमची निर्मिती, व्हिज्युअल डिझाइन,
गेमचे विश्लेषण, विविध प्रकारच्या गेमचा
अभ्यास, संस्कृती आणि कला, चित्रपट आदी विषय घटकांचे ज्ञानसुध्दा विद्यार्थ्यांना
प्रदान केले जाते. विद्यार्थ्यांना गेम निर्मिती-विकास-परीक्षण आणि डिझाइनच्या
संपूर्ण प्रकियेमध्ये सामावून घेतले जाते. या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक गेम
डिझायनर्स आणि आर्टिस्ट यांच्याकडून महत्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले जाते. या
प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना गेम डिझाइनसाठी आवश्यक असलेले तंत्र आणि कौशल्य यात
पारंगतता मिळवणे शक्य होऊ शकते. वेगवेगळया सॉफ्टवेअर आणि गेम इंजिनचा उपयोग करुन
गेम डिझाइन करण्याची कला शिकवली जाते. आंतरसंवादीय डिजिटल कथाकथन, दृष्यात्मक
परिणाम आणि चलत रेखाटने, टूडी आणि थ्रीडी भूमिकांचे ॲनिमेशन, डिजिटल गेमसाठी
संहिता लेखनाचे तंत्र, गेम डिझाइन मधील सौंदर्यतत्वे, संगीत आणि ध्वनीची निर्मिती,
प्रत्यक्ष गेमचे कार्यान्वयन आणि त्याची प्रतिकृती आदी बाबीही शिकवल्या जातात. डिझाइन
मॅनेजमेंट (अभिकल्प व्यवस्थापन), संशोधन
कार्यपध्दती, सामाजिक शास्त्रे आदीबाबतही ज्ञान प्रदान केले जाते. गेमिंग उद्योग, मनोरंजन
उद्योग आणि दृष्यात्मकता (व्हिज्युअलायझेशन) या क्षेत्रात समर्थपणे करिअर करता यावे याअनुषंगाने विद्यार्थ्यांना
प्रशिक्षित केले जाते.
या अभ्यासक्रमाचा कालावधी अडीच
वर्षांचा आहे. प्रवेशासाठी एनआयडी मार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी
लागते. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधराला प्रवेश मिळू शकतो.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, पालडी,
अहमदनगर- ३८०००७, दूरध्वनी-०७९-२६६२९५००, ईमेल-academic@nid.edu, संकेतस्थळ- nid.edu
याच संस्थेत, ॲनिमेशन फिल्म डिझाइन हा
चार वर्षे कालावधीचा पदवीस्तरीय अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाला कोणत्याही
ज्ञानशाखेतील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. मात्र त्याला एनआयडी मार्फत
घेण्यात येणारी चाळणी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. ॲनिमेशन क्षेत्राची
झपाट्याने वाढ होत असल्याने हा अभ्यासक्रम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नामवंत
कंपन्यांमध्ये तत्काळ रोजगाराच्या संधी मिळतात. ॲनिमेशनच्या जागतिक प्रभावातून
भारतीय ॲनिमेशन उद्योग बाहेर पडला असून भारतीय मातीतल्या मूळ कल्पनांचा वापर
ॲनिमेशनमध्ये करण्याकडे कल वाढत चालल्याचे दिसून येते. भारतीय ॲनिमेशनला आता
जागतिक स्तरावर सुध्दा मान्यता मिळू लागली आहे. या क्षेत्राची वाढ लक्षात घेता
त्यासाठी आवश्यक असणारे संहिता लेखक, ॲनिमेटर्स (चित्रकर्ते) यांची मागणीही वाढत आहे. या अभ्यासक्रमात जागतिक आणि भारतीय संकल्पनांचा
सुयोग्य समावेश करण्यात आला आहे. ॲमिनेशन तंत्र कौशल्य शिकवण्याआधी
विद्यार्थ्यांना अभिकल्पाचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे
विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रक्रिया अधिक खुल्या होतात. त्यांना विषयाचा आवाका
लक्षात येण्यासही साहाय्य होते. या अभ्यासक्रमाचा भर हा प्रात्यक्षिके आणि प्रकल्प
कार्य यावर आहे. विद्यार्थ्यांना टूडी, थ्रीडी, मातीपासून प्रतिकृती बनण्याची कला,
बहुमाध्यमांचा उपयोग करण्याचे तंत्र, चित्रात्मक कथन तंत्र आदी बाबींचे ज्ञान
प्रदान करुन विविध प्रकारातील ॲनिमेशन कथाकथन करण्यात पारंगतता मिळण्यासाठी
साहाय्य केले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चॅनेल व्ही, एमटीव्ही,
निककेलॉडिऑन, कार्टून नेटवर्क, टाटा इंटरॲक्टिव्ह , इंफोसीस, कॉग्निझंट अशा
सारख्या नामवंत संस्थांमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर, प्रोड्युसर, ॲनिमेटर, कॅरेक्टर
डिझायनर, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, कंसलटन्ट, अशा संधी मिळाल्या आहेत.
लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी- या संस्थेत बॅचलर ऑफ
डिझाइन इन गेमिंग हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- कोणत्याही
ज्ञान शाखेतील १२वी मध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. १२ वी मध्ये इंग्रजीचा
अभ्यास करणे आवश्यक. या अभ्यासक्रमात रेखांकन आणि चित्रकला, डिझाइनच्या मूलभूत
बाबी आणि तत्वे, पर्यावरणाचा अभ्यास, संवाद कौशल्ये, दृष्यात्मक अभिकल्प प्रकल्प,
दृष्यात्मक कथन विकास, डिजिटल आर्ट, मल्टिमीडिया, कॉमिक्स स्ट्रिप आणि कथानक,
थ्रीडी चरित्रांचे डिझाइन, थ्रीडी पर्यावरणीय डिझाइन, गेम तंत्र आणि कोडिंग, गेम
व्हीज्युअल इफेक्ट, गेमसाठी आवश्यक कथन
कौशल्य, ॲनिमेशन, थ्रीडी दृष्यात्मकता, संकल्पनात्मक
डिझाइन, ग्रॅफिक्स, गेम आर्ट, गेम डिझायनिंग, प्ले गेमिंग या विषयांचे ज्ञान
प्रदान केले जाते. संस्थेने बी.एस्सी इन गेमिंग हा तीन वर्षे कालावधीचा
अभ्यासक्रमही सुरु केला आहे. संपर्क- लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालंदर-दिल्ली
ग्रँट रोड, फगवारा, पंजाब-१४४४११, दूरध्वनी-०१८२४-५०६१००, ईमेल-admissions@lup.co.in, संकेतस्थळ-lup.in
000
एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन- या संस्थेत गेम डिझाइन या विषयातील पदवीस्तरीय अभ्यासक्रम
करता येतो. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम
करता येतो. या अभ्यासक्रमात गेम आर्ट, डिझाइन आणि प्रोग्रॅमिंग/ निर्मिती, संकल्पा
अभिकल्प, पर्यावरणीय अभिकल्प, टूडी कला, थ्रीडी कला, गेमिंगची व्युहनीती, कथाकथन यावर
भर देण्यात येतो. सैध्दांतिक बाबींसोबतच प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. हा
अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना आर्ट डायरेक्टर, कंसेप्ट डिझायनर, एन्व्हीरॉन्मेंटल
डिझायनर, गेम डि-कोडर, लेव्हल डिझायनर, गेमिंग आर्टिस्ट, गेम टेस्टर, गेम डेव्हलपर
अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात. संपर्क- एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन,
राजबाग, लोनी-काळभोर, पुणे-४१२२०१, दूरध्वनी- ०२०-३०६९३६००, संकेतस्थळ-mitid.edu.in, ईमेल- admissions@mitid.edu.in
०००
अंजिक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी- या संस्थेत
बी.एस्सी इन गेमिंग हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी - तीन वर्षे. ५०
टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु
शकतात.
संपर्क- अंजीक्य डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी,चा रोळी
बुद्रुक व्दार लोहगाव, पुणे-४१२१०५, दूरध्वनी-७७५६८६९०४६, संकेतस्थळ-www.adypu.edu.in

Comments
Post a Comment