इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट
इंडियन
स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट
सांख्यिकीशास्त्र आणि गणित या विषयात अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण
देणारी संस्था म्हणून इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूटने नावलौकिक प्राप्त केला
आहे. देशातील बुध्दीवान तरुण- तरुणिंना या संस्थेत प्रवेश मिळावा असे वाटते. तथापि
महाराष्ट्रीय पालक- शिक्षक आणि विद्यार्थी या संस्थेतील प्रवेशाबाबत फारसे उत्साही
असल्याचे दिसून येत नाही. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजी, नॅशन डिफेन्स ॲकॅडेमी, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस अशा
काही मोजक्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाबाबत जितकी जागरुकता दिसून
येते, तितकी इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट बाबत दिसून येत नाही. या संस्थेतील
विविध अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा असल्या तरी, गुणवंत आणि बुध्दिवान विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी
प्रयत्न करुन या संस्थांमधील मराठी टक्का वाढवला पाहिजे.
या संस्थेची स्थापना १९३१ साली प्रो. प्रशांतचंद्र महालानोबीस यांनी
केली. गेल्या ९० वर्षात या संस्थेने सांख्यिकी क्षेत्रात शिक्षण- प्रशिक्षण आणि
संशोधन यामध्ये जगातील दर्जेदार अशी संस्था म्हणून कीर्ती प्राप्त केली आहे. जागतिक
पातळीवरील या संस्थेचे हे महत्व लक्षात घेऊन भारत सरकारने या संस्थेला,
इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा १९५९ सालीच दिला. या संस्थेस सांख्यिकी
शास्त्र आणि गणित या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी देण्याचाही अधिकार प्रदान
करण्यात आला. पंडित नेहरु यांनी १९५४ साली या देशाच्या दुसरी पंचवार्षिक योजनेचा
आराखडा तयार करण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपवली होता. देशाच्या आर्थिक नियोजनात
हा सर्वाधिक महत्वाचा आराखडा समजला जातो.
या संस्थेचे सांख्यिकीशास्त्रातील महत्व लक्षात घेऊन अनेक शासकीय आणि
खाजगी संस्था आणि विद्यापीठांनी संस्थेसोबत शैक्षणिक आणि संशोधन कार्यासाठी
सामंजस्य करार केले आहेत. या कंपन्यांमध्ये नॅशनल हायवे ॲथारिटी ऑफ इंडिया, टाटा
कंसलटन्सी सर्व्हिस, सिलिकॉन व्हॅली कॉम फाउंडेशन, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया,
नेटवर्क स्पेसिफाइड, एरिकस्सन इंडिया, अमेरिकन सोसासटी फॉर क्वालिटी इंडिया,
आयआयटी मद्रास, झेचेनयी इस्तवॅन युनिव्हर्सिटी, हिताची इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
इन्फोसीस, ब्रिज ॲण्ड रुफ कंपनी, नॅशनल रिसर्च युनिव्हर्सिटी, इस्टर्न आफ्रिका
स्टॅटिस्टिकल ट्रेनिंग, स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्क, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स,
बीआरएसी-युनिव्हर्सिटी, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग, युनिव्हर्सिटी ऑफ वारविक,
योकोहामा नॅशनल युनिव्हर्सिटी.या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा अधिक
उंचावण्यात झाला आहे.
संस्थेचे अभ्यासक्रम-
(१)
बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स)- कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम
बेंगळुरु कॅम्पस येथे शिकवला जातो.
अर्हता- गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा
उत्तीर्ण. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले
जाते. दर वर्षी इतर खर्चासाठी ५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते.
(२)
बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स (ऑनर्स)- कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम
कोलकता कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या
विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास
दरमहा ५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. दर वर्षी इतर खर्चासाठी ५ हजार रुपयांचे
अर्थसाहाय्य केले जाते.
(३)
मास्टर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स)- कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम
कोलकता आणि बेंगळुरु कॅम्पस येथे आलटून पालटून शिकवला जातो. अर्हता- गणित विषयासह
बी.एस्सी परीक्षा उत्तीर्ण. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा ८ हजार
रुपये विद्यावेतन दिले जाते. दर वर्षी इतर खर्चासाठी ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य
केले जाते.
(४)
मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स (ऑनर्स) - कालावधी- दोन वर्षे. हा
अभ्यासक्रम दिल्ली कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित विषयासह बी.एस्सी
परीक्षा उत्तीर्ण. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा ८ हजार रुपये
विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी इतर खर्चासाठी ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले
जाते.
(५)
मास्टर ऑफ सायंस इन क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स - कालावधी- दोन
वर्षे. हा अभ्यासक्रम दिल्ली आणि कोलकता कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता-
कोणत्याही विषयातील पदवी. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा ८ हजार
रुपये विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी इतर खर्चासाठी ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य
केले जाते.
(६)
मास्टर ऑफ सायंस इन क्वालिटी मॅनेजमेंट सायंस -कालावधी- दोन वर्षे.
हा अभ्यासक्रम बेंगळुरु आणि आणि हैदराबाद कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता-
कोणत्याही विषयातील पदवी. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा ८ हजार
रुपये विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी इतर खर्चासाठी ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य
केले जाते.
(७)
मास्टर ऑफ सायंस इन लायब्ररी ॲण्ड इन्फॉर्मेशन सायंस - - कालावधी-
दोन वर्षे. हा अभ्यासक्रम बेंगळुरु कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- कोणत्याही
विषयातील पदवी. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा ८ हजार रुपये
विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी इतर खर्चासाठी ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले
जाते.
(८)
मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायंस/अर्हता- कोणत्याही
शाखेतील बीटेक/बीई किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी. संबंधित उमेदवाराने
१२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम बेंगळुरु
कॅम्पस येथे शिकवला जातो. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा १२४०० हजार
रुपये विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी इतर खर्चासाठी ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य
केले जाते.
(९)
मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन क्रिप्टोलॉजी ॲण्ड सेक्युरिटी /अर्हता- कोणत्याही
शाखेतील बीटेक/बीई किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी. संबंधित उमेदवाराने
१२ वीमध्ये गणिताचा अभ्यास केलेला असावा. कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम कोलकता
कॅम्पस येथे शिकवला जातो. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा १२४०० हजार
रुपये विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी इतर खर्चासाठी ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य
केले जाते.
(१०)
मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन क्वालिटी, रिॲलिबिलिटी ॲण्ड ऑपरेशन रिसर्च,
/अर्हता- कोणत्याही शाखेतील बीटेक/बीई किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी.
किंवा स्टॅटिस्टिक्स मधील पदव्युत्तर पदवी. संबंधित उमेदवाराने १२ वीमध्ये
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. किंवा मॅथेमॅटिक्स मधील पदव्युत्तर पदवी. संबंधित
उमेदवाराने पदवी अभ्यासक्रमाला स्टॅटिस्टिक्सचा आणि १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि
रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम कोलकता कॅम्पस
येथे शिकवला जातो. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास दरमहा १२४००रुपये
विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी इतर खर्चासाठी ८ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले
जाते.
(११) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिस्टिकल मेथड्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स- कालावधी-
एक वर्षं. अर्हता- कोणत्याही शाखेतील बीटेक/बीई किंवा गणित या विषयासह कोणत्याही
विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम चेन्नई आणि तेजपूर कॅम्पस येथे शिकवला जातो.
(१२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स -कालावधी- एक वर्षं.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.संबंधित उमेदवाराने १२वीमध्ये गणितचा अभ्यास
केलेला असावा. हा अभ्यासक्रम गिरिदीह कॅम्पस येथे शिकवला जातो.
(१३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरल ॲण्ड रुरल मॅनेजमेंट वुईथ
स्टॅटिस्टिकल मेथड्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स-कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही
विषयातील पदवी. संबंधित उमेदवाराने १२वीमध्ये गणित किंवा सांख्यिकी शास्त्राचा
अभ्यास केलेला असावा. हा अभ्यासक्रम गिरिदीह कॅम्पस येथे शिकवला जातो.
(१४) संस्थमार्फत ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या माध्यमातून संशोधनाची संधी
उपलब्ध करुन दिली जाते. अशी संधी गणित, सांख्यिकीशास्त्र, क्वांटिटेटिव्ह
इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायंस, क्वालिटी, रिॲलिबिलिटी ॲण्ड ऑपरेशन रिसर्च, फिजिक्स
आणि ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स, जिऑलाजी, बॉयलॉजिकल सायंस, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन
सायंस या विषयांमध्ये दिली जाते. संशोधन कार्यासाठी निवड झालेल्या सर्व
उमेदवारांना दरमहा ३१ हजार रुपयेची शिष्यवृत्ती दिली जाते. इतर खर्चासाठी दरवर्षी
२० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी संस्थेमार्फत
चाळणी परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातात. बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना निवास
व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाते.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment