बल्लवाचार्यांचे कौशल्य!


 

बल्लवाचार्यांचे कौशल्य!

हॉस्पिटॅलिटी उद्योगामध्ये प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज भासत असते. त्याचबरोबर या उद्योगासाठी इतर घटकांतील कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ही गरज भागवण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या, इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन या संस्थांनी काही अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

अशा काही संस्था आणि अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहेत.

() इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन - दिल्ली येथे असणारी, इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग ॲण्ड न्युट्रिशन ही संस्था १९६२ साली भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालायामार्फत स्थापन करण्यात आली. आतिथ्यसेवा उद्योगाला लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाच्या गरजांची पूर्तता करण्याचा हेतू ही संस्था स्थापन करण्यामागे होता. गेल्या ६० वर्षात या संस्थेने या क्षेत्रातील शिक्षण - प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी आपल्या देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे.

अभ्यासक्रम

 () डिप्लोमा इन बेकरी ॲण्ड कन्फेक्शनरी- हा दीड वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. बेकरी उत्पादनाशी संबंधित विषयाचे सखोल ज्ञान या अभ्यासक्रमात दिले जाते. याममध्ये ब्रेडची निर्मिती, पॅस्ट्रीची निर्मिती, केक डेकोरेशन, चॉकलेट डेकोरेशन या विषय घटकांचा समावेश आहे. शिवाय व्यवसाय/स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे संवाद कौशल्य, संगणकीय ज्ञान प्रदान केले जाते. दीड वर्षांपैकी एक वर्षे संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गासाठी उच्चतम वयोमर्यादा २५ वर्षे तर राखीव संवर्गातील उमेदवरांसाठी ही वयोमर्यादा २८ वर्षे आहे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमासाठी चाळणी परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना बेकर्स, पॅस्ट्री शेफ, चॉकलेटिअर्स, डेझर्ट स्पेशॅलिस्ट अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

 () डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हेरेजेस सर्व्हिस - दीड वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमात अन्नपदार्थ आणि खाद्य-पेये सेवा क्षेत्रासाठी लागणारे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये अन्नपदार्थ सेवा, विविध पेय सेवा, अन्न आणि पेये नियंत्रण, स्वच्छता आणि आरोग्य, व्यवसाय संवादसंप्रेषण, रेस्टॉरेंट व्यवस्थापन, बार व्यवस्थापन आणि कार्यान्वयन या विषय घटकांचा समावेश आहे. दीड वर्षांपैकी एक वर्षं संस्थेत प्रशिक्षण दिले जाते. उर्वरित सहा महिने औद्योगिक घटकांमध्ये प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाला ७० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गासाठी उच्चतम वयोमर्यादा २५ वर्षे तर राखीव संवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा २८ वर्षे आहे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या उमेदवाराने १२वीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केलेला असावा. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जात नाही. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची १२ वीतील गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्याप्रमाणे प्रवेश दिला जातो.अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो.

संपर्क -  इंस्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लायब्ररी अव्हेन्यू, पुसा कॉम्पलेक्स, नवी दिल्ली 110012, दूरध्वनी-  011- 25841411, फॅक्स-25840147 संकेतस्थळ- www.ihmpusa.net, ईमेल- ihmpusa@rediffmail.com

०००

() इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी, मुंबई

 ही संस्था देशात कायम पहिल्या पाच क्रमांकात राहिली आहे. या संस्थेला पन्नास वर्षाहून अधिक शैक्षणिक कार्याचा अनुभव आहे. दिल्लीच्या संस्थेसारखेच या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देश आणि परदेशातील अनेक मोठी हॉटेल आणि पंचतारांकित हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उच्चपदस्थ आहेत. या संस्थेमध्ये पुढील अभ्यासक्रम करता येतात-

() डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन- हा अभ्यासक्रम कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. हा अभ्याक्रम केलेल्या उमेदवारांना हॉटेल रेस्टॉरेंट,फास्ट फूड आऊटलेट, रिसॉर्ट, रेल्वे खानपान सेवा, एअरलाइन्स खानपान सेवा, जलवाहतूक खानपान सेवा आणि तत्सम क्षेत्रे  या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते. या अभ्यासक्रमामध्ये पोषण मूल्ये, खाद्य पदार्थांचे मूल्य/किमती, स्वयंपाकशास्त्र, अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता, आरोग्यदायक काळजी, वस्तू आणि पदार्थ या विषयघटकांचा समावेश आहे. या उमेदवारांनी १२ वीमध्ये इंग्रजीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पहिल्या ३६ आठवड्यात सैध्दांतिक बाबी शिकवल्या जातात. त्यानंतर २४ आठवड्यांमध्ये वेगळया कंपन्या/औद्योगिक घटक यामध्ये प्रात्यक्षिक करावे लागते. १२ वीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या अभ्यासक्रमात वाणिज्यिक (कमर्शिअल) स्वरुपाच्या अन्न पदार्थांच्या पाककृती निर्मितीचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते. यामध्ये सर्वप्रकारच्या भारतीय , चायनिज आणि कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थ्यांच्या निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय वेगवेगळया प्रकारच्या भाज्या, आणि मांस कापणे, फळे आणि भाज्या सजवून त्या ग्राहकांना देण्याचे प्रशिक्षण देऊन त्याचा सराव केला जातो. कोठार व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षे. अभ्यासक्रमाचा प्रारंभ जुलै/ऑगस्ट मध्ये होतो. इच्छुक उमेदवाराची खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ आणि राखीव संवर्गासाठी २८ वर्षे. () सर्टिफिकेट कोर्स इन कुकरी- कौशल्य निर्मितीला वाव देणारा हा १२ आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी प्रशिक्षण संपताक्षणी रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावा यादृष्टिने अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. यामध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. जुलै ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते एप्रिल अशा दोन कालावधीत हा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता -कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. () सर्टिफिकेट कोर्स इन बेकरी - जुलै ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते एप्रिल अशा दोन कालावधीत हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी प्रशिक्षण संपताक्षणी बेकरी व्यवसायातील रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावा यादृष्टिने प्रशिक्षण देण्यात येते. अर्हता - कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. कौशल्य निर्मितीला वाव देणारा हा १२ आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे.

डिप्लोमा इन हाऊसकीपिंग- या अभ्यासक्रमात आतिथ्यसेवा केंद्र (हॉटेल/ गेस्ट रुम/ निवासस्थाने इत्यादी) यांच्या दैनंदिन देखभालीची कार्यपध्दती, अंतर्गत सजावट, देखभाल-दुरुस्ती सेवा, स्वच्छता आणि आरोग्य, व्यवसाय संवाद संप्रेषण या बाबींचा समावेश आहे.

डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन- या अभ्यासक्रमात आतिथ्य सेवेच्या कार्यालयाचे कामकाज, कार्यपध्दती, लेखा विषयक बाबी, हॉटेलचे लेखा, व्यवसाय संवादसंप्रेषण, संगणाचा उपयोग या बाबी शिकवल्या जातात. आणि डिप्लोमा इन फूड ॲण्ड बिव्हरेज सर्व्हिस.या तिनही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दीड वर्षे. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण उमेदवार हे अभ्यासक्रम करु शकतात

रोजगार से हुनर

आतिथ्य सेवा उद्योगास मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या कौशल्ययुक्त मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी या संस्थेने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने, रोजगार से हुनर या उपक्रमांतर्गत अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. आठवी ते दहावी उत्तीर्ण उमेदवारांना हे अभ्यासक्रम करता येतात. हे अभ्यासक्रम दर दोन महिन्यांनी सुरु होतात. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत - () फूड प्रॉडक्शन- कालावधी- आठ आठवडे / वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे, () फूड ॲण्ड बिव्हेरेजेस सर्विस- कालावधी- सहा आठवडे/ वयोमर्यादा-१८ ते २८ वर्षे, () बेकरी -- कालावधी- आठ आठवडे/ वयोमर्यादा- १८ ते २८ वर्षे, () हाऊसकीपिंग युटिलीटी - कालावधी- सहा आठवडे/ वयोमर्यादा-१८ ते २८ वर्षे.

संपर्क - इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) - मुंबई-४०००२८, दूरध्वनी- ०२२-२४४५७२४१, ईमेल-info@ihmctan.edu, संकेतस्थळ - ihmctan.edu,

०००

मिठाई कशी तयार करणार?

बेकरी आणि कन्फेक्शनरी (मिठाई/मिष्ठान्न) पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण देणारा पदविका अभ्यासक्रम फूड क्रॉफ्ट इंस्टिट्यूट, खजुराहो/मध्यप्रदेश (संपर्क ईमेल-principalfcikhajuraho@gmail.com) आणि फूड क्रॉफ्ट इंस्टिट्यूट जम्मू (संपर्क ईमेल- jammu.fci@gmail.com) येथे करता येतो.

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी