"पंचकर्म"तंत्रकौशल्य आणि संधी
"पंचकर्म"तंत्रकौशल्य आणि संधी
शरीरातील अनावश्यक
कचरा, विषारी द्रव्य/ पदार्थ बाहेर काढून शरीराच्या
शुध्दीकरणाची प्रक्रिया पंचकर्म तंत्राव्दारे राबवली जाते. शरीरात खोलवर रुजलेला
तणाव आणि आजारावर मात करण्यासाठी पंचकर्म उपयुक्त ठरु शकते. पंचकर्म हे आयुर्वेदातील एक महत्वाची उपचार पध्दती समजली जाते.
सध्याच्या काळात धावपळीमध्ये विविध ताण- तणाव आणि जीवनशैलिशी
निगडित शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यावरील उत्तम उपाय म्हणून पंचकर्म
तंत्राकडे बघितलं जातं. ही बाब लक्षात आल्यानं देश-विदेशात पंचकर्म प्रकिया
करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचा ओढा वाढत चालल्याचे दिसून येतं. त्यामुळे पुढील
काळात या विषयातील जाणकार किंवा तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या मनुष्यबळाला आयुर्वेद
रुग्णालये, पंचकर्म केंद्रे, आरोग्य केंद्रे (हेल्थ
रिसॉर्ट), वेलनेस सेंटर, पुनर्वसन केंद्रे या ठिकाणी
करिअरच्या विविध संधी मिळू शकतात.
हे पंचकर्म पाच पध्दतीचे असल्याने त्याला पंच
म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे पध्दती किंवा प्रकिया असं संबोधलं जातं. शरीरास
वेगवेगळया प्रकारचे आजार होऊ नये म्हणून या उपचार पध्दतीत, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक बाबींचा समावेश केला जातो.
पंचकर्माव्दारे शरीरातील अनावश्यक कचरा, निर्माण झालेले विषारी घटक आणि द्रव्ये
बाहेर काढण्यात येत असल्याने शरीरातील अनेक अवयव पुन्हा कार्यक्षमतेनं कार्य करु
लागतात. पंचकर्म करणाऱ्या तज्ज्ञ आणि सहाय्यकांची मागणीही वाढत आहे.
भारतात आणि परदेशतातही पंचकर्म सहाय्यकांची अतिशय
कमतरता असल्याचं निदर्शनास आलं आहे. हे सहाय्यक पंचकर्म तज्ज्ञांना विविध उपचार
आणि क्रियांसाठी मदत करतात. ही बाब लक्षात घेऊन सेंट्रल काउंसिल फॉर रिसर्च इन
आयुर्वेदिक सायंस या स्वायत्त संस्थेने पंचकर्म टेक्निशिअनचा अभ्यासक्रम सुरु केला
आहे.
ही
संस्था केंद्रीय आयुर्वेद, योग, नेचरोपथी, युनानी, सिध्द आणि होमिओपथी (आयुष) अंतर्गत कार्यरत
आहे. पंचकर्म सहाय्यकांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र सरकारने पंचकर्म सहाय्यक
प्रमाणपत्र प्रशिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे प्रशिक्षण पंचकर्मातील चार सेवा
पुरवणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा पध्दतीने तयार करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र
सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशकांचा उपयोग करण्यात आला आहे. हे
प्रशिक्षण राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवा कौशल्य
परिषदेशी संलग्नित आहे. या पूर्णकालीन प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे. या प्रशिक्षणाचं माध्यम इंग्रजी आणि हिंदी आहे.अर्हता
- या प्रशिक्षणास कोणत्याही विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास प्रवेश
मिळू शकतो. संबंधित उमेदवाराचं वय किमान १८ वर्षे असावं.
निवड प्रक्रिया
या प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची,
बारावित मिळालेल्या गुणांवर आधारित संवर्ग निहाय (अनुसूचित
जाती, जमाती, ओबीसी इत्यादी) उमेदवारांची यादी
तयार केली जाते.
हे प्रशिक्षण, सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इंस्टिट्यूट - नवी दिल्ली (१० जागा) ,नॅशनल आयुर्वेद
रिसर्च इंस्टिट्यूट फॉर पंचकर्म - चेरुथिरुती (३० जागा), सेंट्रल आयुर्वेद रिसर्च सेंटर - गोहाटी (१० जागा), रिजनल आयुर्वेद
रिसर्च सेंटर-जम्मू (१५ जागा) या केंद्रांवर
चालवलं जातं. यातील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
या प्रशिक्षणाचं शुल्क ३० हजार रुपये असून ते
प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात देता येतं. हे प्रशिक्षण संस्थेचे
नियमित अध्यापक, पंचकर्म, कायाचिकित्सा आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि या क्षेत्रातील
नामांकित खाजगी तज्ज्ञांकडून दिलं जातं. शेवटच्या तीन महिन्यात देशातील इतर
पंचकर्म केंद्रामध्ये पंचकर्माच्या प्रात्यक्षिकाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते.
करिअर संधी
हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पंचकर्म तंत्रज्ञ,
पंचक्रम सहाय्यक, मसाजर म्हणून रोजगाराच्या अनेक संधी देश-विदेशातील आयुर्वेदिक
संस्था, रुग्णालयात मिळू शकतात.
या प्रशिक्षासाठीचा अर्ज http://ccras.nic.in/ या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतो. संपर्क-
जवाहरलाल नेहरु भारतीय चिकित्सा आणि होमिओपॅथी अनुसंधान भवन,नंबर-६१-६५,
इंस्टिट्यूशनल एरिआ,अपोजिट डी ब्लॉक,जनकपुरी,नवी दिल्ली-११००५८,
दूरध्वनी-०११-२८५२५८६२
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेतही सर्टिफिकेट
कोर्स इन पंचकर्म टेक्निशियन हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा
कालावधी -एक वर्षं. अर्हता- शाखेतील १२ वी उत्तीर्ण.संपर्क संकेतस्थळ- nia.nic.in
००००
आयुर्वेदाच्या सहाय्यानं सौंदर्यसाधना
आपल्या शरीराचं प्रत्येकाला कौतुक असतं. आपलं असलेलं किंवा
नसलेलं सौंदर्य अधिक खुललं पाहिजे, अशी (अपवाद
वगळता) बहुतेक सर्वांची आंतरिक इच्छा असते. त्यामुळे गेल्या
काही वर्षांमध्ये शरीरसौंदर्य वाढीस उपयुक्त ठरु शकतील अशा आयुर्वेदिक उपाय आणि
उपचारांकडेही बरेचजण वळले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. या क्षेत्रात
रोजगार आणि स्वयंरोजगाराच्याही संधी वाढत आहेत. ही बाब लक्षात घेऊन नॅशनल
इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेनं अल्पमुदतीचा, सर्टिफिकेट कोर्स ऑन
ट्रेनिंग फॉर ब्युटी केअर इन आयुर्वेद सुरु केला आहे.
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद ही आयुर्वेदाच्या विविध
ज्ञानशाखांमध्ये शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी महत्वाची
संस्था होय. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या
संस्थेस, राष्ट्रीय महत्वाची संस्था (इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आणि डीम्ड टु बी युनिव्हर्सिटी) म्हणून दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेमार्फत पदवी, पदव्युत्तर पदवी
आणि संशोधन अभ्यासक्रमांसोबतच रोजगार आणि स्वयंरोजगारास उपयुक्त ठरतील असे काही
प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवले जातात. यातील काही अभ्यासक्रम हे अल्पमुदतीचे आहे. हा
अभ्यासक्रम या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ सौंदर्य आयुर्वेद मार्फत सुरु करण्यात
आला आहे.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमामध्ये शरीर सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदातील
तंत्राचा वापर करण्याचं ज्ञान प्रदान केलं जातं. यामध्ये पुढील बाबींचा समावेश
आहे- (१) त्वचेची संकल्पना आणि पचनक्रिया,
(२) आयुर्वेदिक प्रकृतीवर आधारीत त्वचा
प्रकाराचे मूल्यांकन, (३) आयुर्वेदातील
तत्वं वापरुन त्वचेची स्वच्छता आणि त्वचेचा कोरडेपणा घालवण्याच्या पध्दती, (४) त्वचेवरील डाग नष्ट करणं, (५)
दररोजची शरीर स्वच्छता, (६) विविध औषध वनस्पतींचा वापर करण्यात येणाऱ्या आणि सौंदर्य वाढवण्यास
उपयुक्त ठरतील अशा स्वेदना, अलेपा यासारख्या आयुर्वेदिक प्रक्रिया/पध्दती,
(७) सतेज कांतीसाठी आयुर्वेदिक जीवनशैली,
(८) सतेज कांतीसाठी आयुर्वेदिक आहार आणि
पोषणमूल्यांचे ज्ञान, (९) विविध मुखलेप
(फेसपॅक) निर्मितीचे तंत्र, (१०) मुखअभ्यंग (फेसमसाज) आणि मुखलेपनम (फेसलेप)चा
वापर, (११) आयुर्वेद पध्दतीने दंत-
डोळे- नख- ओठांची काळजी घेणाऱ्या औषधी वनस्पतीपासूनचे उत्पादन, (१२) हस्तपादप्रसाधनम (आयुर्वेदिक
मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर), (१३) केशआयुर्वेदाची संकल्पना - केसांचे प्रकार, वाढ आणि आरोग्यदायी केसांसाठी
पोषण आहार, (१४) प्रकृतीनुसार केसांचे
मूल्यांकन, (१५) केशप्रकाशलनविधी-
आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करुन केस स्वच्छ करण्याचं/धुण्याचं तंत्र, (१६) दररोज घ्यावयाची केसांची काळजी, (१७) केसगळती थांबवण्याचं, कोंड्यावर नियंत्रण
ठेवण्याचं आणि अकाली केस पांढरे होण्यापासून थांबवण्याचं आयुर्वेदिक तंत्र आणि
व्यवस्थापन, (१८) आयुर्वेदिक हेअर
स्पा, आयुर्वेदिक हेअर डाय, हेअर पॅक, (१८) शिरोलेपमचे प्रात्यक्षिक, (१९) शिरोअभ्यंगमचे प्रात्यक्षिक, (२०) धुपना आणि केसांची काळजी घेण्याचे इतर तंत्र इत्यादी.
प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर दिला जातो. हा अभ्यासक्रम इंग्रजी
आणि हिंदी मध्ये शिकवला जातो. या अभ्यासक्रमाचं साहित्य उमेदवारांना दिलं जातं.
प्रशिक्षण संपल्यावर सैध्दांतिक (थिअरी) आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. या
परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे. हे गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारास
प्रमाणपत्र दिलं जातं.
प्रवेश प्रक्रिया
अर्हता - कोणत्याही
विद्याशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतो. प्रथम
येणाऱ्यास प्रथम प्रवेश, या तत्वावर प्रवेश दिला जातो. अर्जाचे शुल्क खुल्या
संवर्गासाठी ३०० रुपये. अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गासाठी १५० रुपये.
डिप्लोमा कोर्स इन आयुष नर्सिंग ॲण्ड फार्मसी- या अभ्यासक्रमाचा कालावधी अडीच वर्षे असून त्यापैकी सहा महिने
इंटर्नशीपचे आहेत. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम
करता येतो.
संपर्क - नॅशनल
इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जोरवार सिंग गेट, अमर रोड जयपूर -३०२००२, दूरध्वनी -
०१४१- २६३५८१६, संकेतस्थळ-nia.nic.in, ईमेल- nic-rj@nic.in
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment