अंतराळातील भरारी


  

  अंतराळातील भरारी

भारताने अंतराळ संशोधनाचा बहुआयामी कार्यक्रम राबवण्याचे ठरविले असून यामध्ये दळणवळणीय उपग्रहांचा विकास, प्रगत दूरसंदेश वहन, उपग्रहीय आधारित दिशादर्शन कार्यप्रणाली, मानवी अंतराळ संशोधन, प्रगत अंतराळ वाहतूक कार्यप्रणाली, अवकाशयानांसाठी नव्या तंत्रांचे अधिक प्रगत इंजिन आदींचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांना कालबध्दरीत्या आणि प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी मोठया प्रमाणावर तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, एरोस्पेस, केमिकल, कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातील बी.टेक पदवी प्राप्त उमेदवारांना या क्षेत्रात करिअरची संधी मिळू शकते.

इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोवेव्ह, ॲन्टेना/रडार, व्हीएलएसआय ॲण्ड एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स याविषयातील स्पेशलायझेशनसह एमटेक, मेकॅनिकल शाखेतील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, थर्मल, एरोनॉटिक्स या विषयातील स्पेशलायझेशनसह एमटेक  केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.

अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी ज्ञानशाखेच्या उमदेवारांना संधी मिळू शकते. अभियांत्रिकीतील प्रत्येक ज्ञानशाखेचा संबंध अंतराळाशी येतो. मेकॅनिकल अभियंते हे अवकाश यानांचे डिझाइन, बांधणी आणि निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकतात. केमिकल अभियंते हे अवकाश यानांच्या इंधनप्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. संगणक शास्त्रातील अभियंते माहिती विश्लेषणात सहभागी होतात. तथापी एरोस्पेस अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयातील तज्ज्ञांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात प्राधान्याने संधी मिळू शकते.

     अभ्यासक्रम

    इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी ही संस्था भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत कार्यरत असणारी महत्वाची संस्था आहे.‍ केरळ राज्यातीलथिरुवनंतपूरमपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वालियामाला येथे स्थित या संस्थेत अंतराळशास्त्र आणि तंत्रज्ञानातील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनपर अभ्यासक्रम चालविले जातात.

या संस्थेत अंतराळ संशोधनाच्या संदर्भातील जागतिक दर्जाच्या संशोधनाच्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या संस्थेला डिम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे.

संस्थेचे अभ्यासक्रम

  संस्थेत बी.टेक इन एरोस्पेस इंजिनीअरिंग या शाखेत ७० विद्यार्थ्यांना, बी.टेक इन इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या शाखेत ७० विद्यार्थ्यांना आणि ड्यूएल डिग्री (बी.टेक ॲण्ड मास्टर ऑफ सायन्स /  मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) या शाखेत २२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.(हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा दहा सत्रात विभाजित करण्यात आला आहे.) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बीटेक इन इंजिनीअरिंग फिजिक्स आणि मास्टर ऑफ सायंस(ॲस्ट्रॉनॉमी ॲण्ड ॲस्ट्रोफिजिक्स किंवा अर्थ सिस्टिम सायन्स,) /मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी(सॉलिड स्टेट फिजिक्स किंवा ऑप्टिकल इंजिनीअरिंग) ही पदवी प्रदान केली जाते. पदव्युत्तर पदवीचे विषय सहावे सत्र संपल्यावर विद्यार्थ्यांना दिले जातात.यासाठी विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम आणि सहा सत्रापर्यंतच्या शैक्षणिक कामगिरीचा विचार केला जातो.

निवड प्रक्रिया- या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी JEE-ADVANCED मधील गुण ग्राह्य धरले जातात.

    अर्हता- उमेदवारांना १२ वी परीक्षेत भौतिकशास्त्र,गणित आणि रसायनशास्त्रात ७५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमाती, आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी ६५ टक्के गुण हवेत. उमेदवारांनी दहावी आणि बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात त्तीर्ण होणे आवश्यक आहे.

या संस्थेत भारत सरकारच्या नियमानुसार २७ टक्के जागा नॉन- क्रिमिलेअर इतर मागास वर्ग, १३ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्ग, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग, ३ टक्के जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवल्या जातात. भारत सरकारच्या नव्या नियमानुसार आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांसाठी दोन्ही बिटेक अभ्यासक्रमासाठी ६ जागा राखीव ठेवण्यात येतात. बीटेक-एमएस/एमटेक साठी २ जागा राखीव ठेवण्यात येतात. दोन्ही बीटेकमध्ये महिलांसाठी अतिरिक्त ५ आणि बीटेक-एमएस/एमटेक साठी अतिरिक्त ३ जागा राखीव ठेवण्यात येतात.

एरोस्पेस

या ज्ञानशाखेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने अग्निबाणवाहक, अंतरिक्ष यान, विमाने यांचे डिझाइन आणि विकास यांचे मुलभूत ज्ञान दिले जाते. या ज्ञानशाखेचे विद्यार्थी हे एरोस्पेस इंजिनीअरिंग इंडस्ट्रीमधील प्रोप्युलशन सिस्टिम्स, एरोडायनामिक डिझाइन, स्ट्रक्चरल सिस्टिम्स, प्रिसिजन मॅन्युफॅक्चुरिंग या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यास सक्षम होतात.

करिअर संधी

या विद्यार्थ्यांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये अशा प्रकारच्या महत्वाच्या आणि प्रगत प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना विक्रम साराभाई स्पेस सेंटर –त्रिवेंद्रम, इस्त्रो सॅटेलाइट सेंटर-बेंगळुरु, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर-अहमदाबाद, सतिश धवन स्पेस सेंटर-शार, लिक्विड प्रॉप्युलशन सिस्टिम्स सेंटर- बेंगळुरू, त्रिवेंद्रम आणि महेंद्रगिरी, इस्त्रो सॅटेलाइट ट्रॅकिंग सेंटर - बेंगळुरु, नॅशनल एरोस्पेस लेबॉरेटरीज, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एरोस्पेस सिस्टिम्सची निर्मिती करणारे उद्योग, मेकॅनिकल सिस्टिम्सचे डिझाइन आणि विकास करणारे उद्योग यामध्ये वेगवेगळ्या संधी मिळू शकतात.

ॲव्हिऑनिक्स-

एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्सचा दर्जा आणि विश्वासहार्यता उच्च दर्जाची असणे आवश्यक असते. एरोस्पेसशी संबधित यंत्रसामग्रीशी संबंधित सर्व आव्हाने स्वीकारण्याची क्षमता या अभ्यासक्रमाद्वारे तंत्रज्ञांमध्ये निर्माण केली जाते. या अभ्यासक्रमात कंट्रोल सिस्टिम्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सिस्टिम्स यांचा ठळकरीत्या समावेश करण्यात येतो.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील महत्वाच्या संस्थांमध्ये संधी मिळू शकते. विक्रम साराभाई स्पेस सेंटर-त्रिवेंद्रम, इस्त्रो सॅटेलाइट सेंटर- बेंगळुरु, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर-अहमदाबाद, मास्टर कंट्रोल फॅसिलिटी - हसन, नॅशनल रिमोट सेसिंग सेंटर - हैदराबाद, इस्त्रो सॅटेलाइट ट्रॅकिंग सेंटर - हैदराबाद, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्सचे विकास आणि डिझाइन करणारे विविध उद्योग, कॉम्प्युटर नेटवर्क आणि सॉफ्टवेअर सिस्टिम्सचा विकास करणारे उद्योग.

डयुएल डिग्री अभ्यासक्रम

पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मुलभूत अभ्यासक्रम शिकवले जातात. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीचे पायाभूत विषय शिकवले जातात. चौथ्या वर्षी स्पेशलायझेशनचे विषय शिकवले जातात. पाचव्या वर्षी प्रकल्प संशोधनावर भर देण्यात येतो.

ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या स्पेशलायझेशनमध्ये ग्रह, तारे, अंतराळ, विश्व आणि आकाशगंगा यांच्या अनुषंगाने भौतिकशास्त्राचे महत्व यावर लक्ष केंद्रित केले जाते.

अर्थ सिस्टिम सायन्समध्ये पृथ्वीच्या भौतिक,रासायनिक,जैविक प्रक्रियेची व्यामिश्र संकल्पना समजावून सांगितली जाते. पर्यावरण,जलावरण,भूगर्भ आणि जैवपर्यावरण यांच्या परस्परसंबंधाविषयी अभ्यास करावा लागतो. सॉलिडस्टेट फिजिक्स या स्पेशलायझेशनमध्ये सेमी-कंडक्टर उपकरणांच्या संशोधनात्मक अभ्यासावर भर देण्यात येतो. भौतिकशास्त्रातील उच्च दर्जाच्या संशोधनास प्रोत्साहन आाणि चालना देणारा हा अभ्यासक्रम आहे. ऑप्टिकल इंजिनीअरिंग या स्पेशलायझेशनमध्ये ऑप्टिक्स उद्योगातील भविष्यातीत तंत्रज्ञान विकासावर भर दिला जातो. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, लेन्स डिझाइन, ऑप्टिक्ल फॅब्रिकेशन अशा सारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते.

अशी मिळते संधी

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स, इस्त्रो आणि केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स मार्फत विद्यार्थ्यांना बी.टेक मधील कामगिरीवर आधारित अर्थसाहाय्य करण्यात येत असल्याने इस्त्रो डिपार्टमेंट ऑफ सायन्स या संस्थांना जागांच्या उपलब्धतेनुसार या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा पहिला अधिकार राहील. सरासरी ग्रेड पॉईंट ॲव्हरेज .  असल्यास विद्यार्थ्यांचा या संस्थेतील नोकरीसाठी विचार केला जाऊ शकतो. जागांची उपलब्धता लक्षात घेऊन मेरिट क्रमांकानुसार अशी नोकरी दिली जाते.

    संपर्क- डिन(अॅकेडमिक्स), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नालॉजी, वालियामाला,थिरुवनंतपूरम-  ६९५५४७, केरळ. दूरध्वनी-०४७१-२५६८४७७, फॅक्स-२५६८४५५६, संकेतस्थळ -www.iist.ac.in,ईमेल- admin@iist.ac.in

०००

इतर संस्था

() इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर- () बी.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग. प्रवेश- JEE - ADVANCED मधील गुण () एम.टेक इन एरोस्पेस इंजिनीअरिंग (प्रवेश- जॉईंट ॲडमिशन्स फॉर मास्टर्स-JAM) () पीएचडी इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (प्रवेश - ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग- GATE).

    संपर्क- डिन ऑफ अॅकेडमिक अफेअर्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर, दूरध्वनी- ०५१२-२५९०१५१, संकेतस्थळ - www.iitk.ac.in, ई-मेल - doaa@iitk.ac.in

 () इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास - () बी.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग, () बी.टेक-एम.टेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग (ड्युएल डिग्री इंटिग्रेटेड), प्रवेश-  JEE - ADVANCED  मधील गुण.    संपर्क - डिपार्टमेन्ट ऑफ एरोस्पेस इंजिनीअरिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, चेन्नई - ६०००३६, दूरध्वनी- ०४४-२२५७४०००, फॅक्स-२२५७८२०४, संकेतस्थळ - www.ae.iitm.ac.in,  ई-मेल -  office@ae.iitm.ac.in,

 

 

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी