शिष्यवृत्तीचा आधार
शिष्यवृत्तीचा आधार
आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत वेगवेगळया संवर्गांसाठी शिष्यवृत्ती
किंवा आर्थिक साहाय्य योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ संबंधित
विद्यार्थ्याने घ्यायला हवा. या सर्व शिष्यवृत्तींसाठी अर्ज ऑनलाइनच करावे लागतात.
शिष्यवृत्तींची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) केली जाते. त्यामुळे यात पूर्णपणे पारदर्शकता
आहे.
काही महत्वाच्या योजना
(१) स्वनाथ
शिष्यवृत्ती योजना- या योजनेंतर्गत
पुढील तीन संवर्गांना शिष्यवृत्ती दिली जाते- (१) अनाथ, (२) कोवीड मुळे ज्या विद्यार्थ्याचे एक किंवा दोन्ही
पालक मृत्यू पावले आहेत, असे विद्यार्थी, (३) ज्या विद्यार्थ्यांचे पालक, भारतीय सैन्यातील
आणि केंद्रिय निमलष्करी दलांच्या कारवाईत शहीद झाले आहेत, असे विद्यार्थी.
ही योजना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सुरु
केली आहे. या परिषदेने मान्यता दिलेल्या संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश
मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. हा लाभ पदवी आणि पदविका या
दोन्ही अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी ५० हजार रुपये दिले
जातात. ही रक्कम संस्थेचे शुल्क, संगणक खरेदी, स्टेशनरी, पुस्तके, यंत्रसामग्री,
सॉफ्टवेअर खरेदीसाठी वापरता येते.
हा लाभ मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याच्या
कुटुंबाचे सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये किंवा त्यापेक्षा
कमी असावे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रथम वर्ष व थेट व्दीतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांनी www.scholarships.gov.in
या पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. मागील
शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली असेल त्यांनीसुध्दा
नूतनीकरणासाठी या पोर्टलवर अर्ज करावा.
सक्षम शिष्यवृत्ती योजना- या योजनेंतर्गत
दिव्यांगांना शिष्यवृत्ती दिली जाते. दिव्यांगाचे प्रमाण हे ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असावे. तसे अधिकृत
प्रमाणपत्र सादर करावे लागते. (या योजनेंतर्गत अर्ज
केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.)
ही योजना
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सुरु केली आहे. या परिषदेने मान्यता दिलेल्या
संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा
लाभ दिला जातो. हा लाभ पदवी आणि पदविका या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. या
योजनेंतर्गत दरवर्षी ५० हजार रुपये दिले जातात. यामध्ये संस्थेचे शुल्क, संगणक
खरेदी, स्टेशनरी, पुस्तके, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर खरेदीसाठी वापरता येते. हा लाभ
मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक
उत्पन्न ८ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम
विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट (डायरेक्ट बेनिफिट
ट्रान्सफर) जमा केली जाते. संपर्क- www.scholarships.gov.in
(२) प्रगती
शिष्यवृत्ती योजना- ही योजना
विशेषत्वाने मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने
मान्यता दिलेल्या संस्था आणि पदवी आणि पदविका तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश
घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत दरवर्षी ५० हजार
रुपये दिले जातात. संस्थेचे शुल्क, संगणक खरेदी, स्टेशनरी, पुस्तके, यंत्रसामग्री,
सॉफ्टवेअर खरेदीसाठी ही रक्कम वापरता येते. पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश
मिळालेल्या ६२४ मुलींना आणि पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या ५५३ मुलींना ही
शिष्यवृत्ती दिली जाते. हा लाभ मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे
सर्व स्त्रोतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी
असावे.
संपर्क- www.scholarships.gov.in
(३) गुणवत्ता
नि साधन (मेरिट कम मिन्स) शिष्यवृत्ती-
मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, शिख, पारशी, जैन आणि
ज्यू या अल्पसंख्याक गटातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला
असावा. हा लाभ मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच
लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०
हजार रुपये (यामध्ये प्रत्येक वर्षातील दहा महिन्यांसाठी
दरमहा १ हजार रुपयांप्रमाणे १० हजार रुपये देखभाल भत्ता लागू आहे.) आणि
वसतिगृहात राहत नसलेल्यांना २५ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. (यामध्ये दरमहा ५०० रुपये याप्रमाणे १०
महिन्यांसाठी ५ हजार रुपये देखभाल भत्ता लागू आहे.)
संपर्क-www.minorityaffairs.gov.in
(४)डॉ.पंजाबराव
देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना-
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण
संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय, शासनअनुदानित
महाविद्यालयांमधील मान्यता प्राप्त (विद्यापीठ अनुदान आयोग/अखिल
भारतीय तंत्रशिक्षण मंडळ/ महाराष्ट्र शासन) व्यावसायिक
अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या विद्यार्थ्यांना केंद्रिभूत प्रवेश प्रकिया (कॉमन ॲडमिशन पोसेस) व्दारे
प्रवेश मिळायला हवा. या योजनेचा लाभ
शासकीय विद्यापीठे व त्यांचे उपकेंदे आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही दिला जातो. (संस्थेच्या पातळीवर आणि व्यवस्थापन कोट्यातून
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थी, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत.) खाजगी अभिमत विद्यापीठे आणि स्वयंसहाय्यित खाजगी
विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या
योजनेचा लाभ मिळत नाही.
शैक्षणिक वर्षातील (अ) १०
महिन्यांसाठी ३० हजार रुपये- ज्या
विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर आहेत, त्यांना या
योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना मुंबई, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण
क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकांणासाठी लागू आहे. राज्यातील
इतर ठिकाणी २० हजार रुपयांचा लाभ दिला जातो. या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या अशा सर्व
विद्यार्थ्यांना हा लाभ मिळतो. (ब) १० महिन्यांसाठी १० हजार रुपये - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना
या योजनेचा लाभ दिला जातो. अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख
रुपये असावे. ही योजना मुंबई, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील
सर्व शहरे, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकांणासाठी लागू आहे. राज्यातील इतर ठिकाणी ८
हजार रुपयांचा लाभ दिला जातो. या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या अशा सर्व विद्यार्थी या
योजनेसाठी पात्र ठरतात. (क) शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांसाठी १० हजार
रुपये - आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. अशा विद्यार्थ्यांच्या
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या पुढे आणि ८ लाख रुपयांपर्यंत असावे. ही
योजना मुंबई, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे,
औरंगाबाद आणि नागपूर या ठिकांणासाठी लागू आहे. राज्यातील इतर ठिकाणी ८ हजार
रुपयांचा लाभ दिला जातो. या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या ५०० विद्यार्थ्यांच्या
मर्यादेत (संच) विद्यार्थ्यांना हा
लाभ दिला जातो.
(५)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना - या योजनेंतर्गत शिक्षण शुल्क व परीक्षा
शुल्काच्या ५० टक्के शिष्यवृत्ती दिली जाते. केंद्रिय प्रवेश प्रक्रियेव्दारे
पदविका /पदवी/ पदव्युत्त्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. हा लाभ मिळण्यासाठी
संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित) ८ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. ही
शिष्यवृत्ती दोन हप्त्यांमध्ये दिली जाते. पहिला
हप्ता ऑक्टोबर महिन्यात आणि दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत दिला जातो.
(६) अल्पसंख्याक
संवर्गासाठी शिष्यवृत्ती- मुस्लिम,
बौध्द, ख्रिश्चन, शिख, पारशी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक गटातील आर्थिकदृष्ट्या
दुर्बल आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये संबंधित
शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणारे प्रत्यक्ष वार्षिक शैक्षणिक शुल्क
किंवा २५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येते. (ही योजना तांत्रिक आणि व्यावसायिक पदविका/ पदवी/
पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांसाठी लागू आहे.) हा लाभ
मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये किंवा
त्यापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या संवर्गातील विद्यार्थ्याने माध्यमिक शालांत
परीक्षा (१०वी) महाराष्ट्रातून
उत्तीर्ण केलेली असावी.
संपर्क- mahadbt.gov.in
सुरेश वांदिले
००००
.jpg)
Comments
Post a Comment