हर काम देशके नाम...
हर काम देशके नाम...
सैन्यदलात जाण्याची बऱ्याच मुलामुलींची इच्छा असते. वेगवेगळ्या
टप्प्यांवर त्यांना अशी संधीही मिळत असते. १२ वी नंतर मुले/मुली नॅशनल डिफेन्स
ॲकॅडेमीच्या माध्यमातून सैन्य दलात प्रवेश करु शकतात. पदवीनंतर कम्बाईन्ड डिफेन्स
सर्व्हिसेस एक्झामिनेशनच्या माध्यमातून अशी संधी मिळू शकते. इंडियन एअर फोर्स कॉमन
ॲडमिशन टेस्टव्दारे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदासाठी भरती केली जाते. गेल्या दोन
वर्षांपासून अग्निवीर (अग्निपथ) योजना सुरु करण्यात आली असून, या योजनेव्दारे लष्काराच्या तिनही दलात
दहावी आणि बारावी झालेल्या मुलामुलींची निवड केली जाते.
अग्निवीर, ही एक वैशिष्ट्यपूर्ण योजना असून जगातील अनेक महत्वाच्या
देशांमध्ये अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्याव्दारे लष्कारातील विविध
कामगिरींसाठी उपयुक्त ठरु शकणाऱ्या प्रतिभावंत आणि अमाप उर्जा असलेल्या तरुण-तरुणींची
निवड केली जाते. लष्कराला अशाप्रकाराच्या मनुष्यबळाची कमरता भासू नये या अनुषंगाने
ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत तिनही दलांसाठी सुयोग्य
उमेदवारांची निवड चार वर्षांसाठी केली जाते. प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामकाजाच्या
काळात जे उमेदवार अत्युत्तम कामगिरी बजावतील अशा २५ टक्के उमेदवारांना तिनही दलात
सामावून घेतले जाईल. उर्वरित ७५ टक्क्यांचे काय?
असा प्रश्न ही योजना सुरु झाल्यावर उपस्थित झाला होता. त्यावर उलटसुलट चर्चाही
झाली. या ७५ टक्क्यांना सुध्दा रोजगाराच्या संधी मिळतील याची दक्षता किंवा खबरदारी
केंद्र शासनामार्फत घेतली जाणार आहे. केंद्र सरकाराच्या बऱ्याच विभागांनी अग्निवीरांना
त्यांच्या गरजेनुसार प्राधान्याने सामावून घेण्याची तयार दर्शवली. काही
महिन्यांपूर्वी रेल्वेने सुध्दा असाच निर्णय घेतला आहे. लष्कराचे कोणतेही
प्रशिक्षण उच्च श्रेणीचे आणि मानसिक - बौध्दिक आणि शारीरिक मानकांच्या कसोटीवर
तावून सुलाखून काढणारे असते. त्यामुळे खाजगी उद्योग, व्यवसाय यांनीसुध्दा या
उमेदवारांच्या रोजगाराबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
उत्तम करिअरचा मार्ग
१० वी आणि १२ वी झालेल्या मुलामुलींसाठी अग्निवीर योजना ही उत्तम
करिअर सुरु करण्यासाठी मार्ग आहे. त्यामुळे इतर कोणत्याही नकारात्मक बाबींकडे लक्ष
देता अधिकाधिक मराठी मुलांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.
नौदल अग्निवीर
नौदलातील अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी आवाहन
करण्यात आले आहे. १५ जून २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.
(१) मॅट्रिक् रिक्य्रुटच्या
बॅचसाठी १०० जणांची निवड केली जाईल. यामध्ये २० मुलींचा समावेश असेल. दहावी
उत्तीर्ण मुले/मुली यासाठी पात्र ठरु शकतात. १ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २००६
या कालावधीत (दोन्ही तारखा धरुन) जन्म
झालेले उमेदवार अर्ज करु शकतात.
निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या
निवडीसाठी दोन टप्प्यांमध्ये छाननी केली जाईल. प्राथमिक छाननीसाठी - इंडियन नेव्ही
एन्ट्रन्स टेस्ट (आयएनइटी) ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. प्राथमिक छाननी राज्यनिहाय होईल.
पुढच्या टप्प्यासाठी निवड करताना प्रत्येक राज्यासाठी कटऑफ गुण वेगवेगळे राहू
शकतात.
आयएनइटीमध्ये
बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न असतील. पेपरमध्ये प्रत्येकी एक गुणांचे ५०
प्रश्न विचारण्यात येतील. या पेपरमध्ये दोन भाग (सेक्शन) असतील. पहिल्या भागात- गणित आणि विज्ञान आणि
दुसऱ्या भागात सामान्य अध्ययन, यावर
प्रश्न विचारले जातील. पेपरचा दर्जा दहावीच्या स्तराच्या असेल.
दहावी
बोर्डाच्या विज्ञान आणि गणिताच्या पुस्तकातील सर्व घटकांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास
आणि संकल्पना स्पष्टपणे समजून घेतल्यास या परीक्षेतील पहिल्या भागात चांगले गुण
मिळू शकतात.
सामान्य
अध्ययनाच्या दुसऱ्या भागासाठी पुढील अभ्यासक्रम आहे- (१) भुगोल - नद्या, जमीन, पर्वत, बंदरे,
हार्बर (बंदरे- जिथे जहाज आणि पाणबुड्या उभ्या केल्या जातात आणि साठवून ठेवल्या जातात.), अंत:क्षेत्र (इनलँड),
(२) संस्कृती आणि धर्म, स्वातंत्र्य लढा, भारताशी
निगडित महत्वाची तथ्ये/आकडेवारी, कला, नृत्य, वारसा, (३) इतिहास, संरक्षण, युध्द आाणि शेजारी, पुरस्कार आणि लेखक, शोध, आजार, पोषण,
(४) चालू घडामोडी, भाषा, राजधान्या आणि
चलन, सामान्य नावे, संक्षिप्त शब्दाचे पूर्ण अर्थ, (५) महत्वाची व्यक्तिमत्वे, राष्ट्रीय (पक्षी, प्राणी, खेळ,
फुल), पर्वतरांगा, झेंडा, राष्ट्रगीत, (६) वेगवेगळ्या क्रीडाप्रकारातील खेळाडू, स्पर्धा, विजेते,
खेळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळया संज्ञा, खेळाडुंची संख्या.
सामान्य
अध्ययनाच्या या पेपरमध्ये उमेदवार किती जागरुक आहे, याची तपासणी केली जाते. हा
अभ्यासक्रम बघितला तर दहावीपर्यंतच्या इतिहास भूगोलाच्या पुस्तकांमधून बऱ्याच भागाचा
अभ्यास होऊ शकतो. सगळया घटकांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी सामान्य अध्ययनाशी
निगडित एखादे दर्जेदार पुस्तक वापरायला हवे. इंडिया इअर बूक किंवा भारत वार्षिकी
या पुस्तकांमध्ये ही माहिती मिळू शकते. यापुस्तकातील परीक्षेच्या घटकांपुरते वाचन
केले तरी पुरेसे ठरु शकते.
परीक्षेचा
कालावधी ३० मिनिटांचा असेल. गणित आणि इंगजीवर प्रश्न विचारले जातील. निगेटिव्ह गुण
पध्दतीचा अवलंब करण्यात येतो. याचा अर्थ प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी ०.२५ गुण
कपात केले जातील. (समजा एखाद्या
उमेदवाराचे चार प्रश्नाचे उत्तर चुकल्यास १ गुण कपात होईल.)
उमेदवारांना प्रत्येक विभागात उत्तीर्ण व्हावे लागेल तसेच त्याला निर्धारित
करण्यात आलेले सरासरी गुणही मिळवावे लागतील. (याचा अर्थ
प्रत्येक विभागासाठी उत्तीर्ण होण्यासाठी विशिष्ट गुण आणि संपूर्ण परीक्षेसाठी
एकूण गुण नौदलामार्फत ठरवले जातील.)
दुसरा
टप्पा
पहिल्या
टप्प्यातून निवडलेल्या उमेदवारांना (१) लेखी परीक्षा, (२) फिजिकल
फिटनेस टेस्ट, (शारीरिक क्षमता चाचणी)
आणि (३)रिक्य्रुटमेंट मेडिकल
एक्झामिनेशन (निवड वैद्यकीय परीक्षा)
या तीन टप्प्यांमधून जावे लागेल. दुसऱ्या टप्प्यासाठी आधार कार्ड असणे बंधनकारक
आहे.
अंतिम गुणवत्ता
यादी ही शारीरिक क्षमता चाचणी आणि निवड वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित राहील. या यादितील सर्व
उमेदवारांच्या नियुक्तीसाठी फायनल रिक्य्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन (अंतिम निवड वैद्यकीय परीक्षा) घेतली
जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच नियुक्ती केली जाईल.
(२) अग्निवीर (सिनिअर सेंकडरी रिक्य्रुट)- या योजनेंतर्गत १३६५
उमेदवारांची निवड केली जाईल .यामध्ये २७३ मुलींचा समावेश असेल. १२ वी विज्ञान
परीक्षेत भौतिकशास्त्र गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह उत्तीर्ण मुले/मुली या
योजनेसाठी पात्र ठरतात. १ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २००६ या कालावधीत (दोन्ही तारखा धरुन) जन्म झालेले उमेदवार अर्ज करु
शकतात.
निवड प्रकिया
परीक्षेचा पेपर
१०० गुणांचा असेल. यामध्ये पुढील चार भाग असतील- (१) इंग्रजी, (२) विज्ञान, (३) गणित आणि (४) सामान्य अध्ययन. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. (या निवडीसाठीची इतर संपूर्ण प्रकिया मॅट्रिक रिक्य्रुटसाठी अवलंबण्यात
येणाऱ्या प्रक्रियेसारखी राहील.)
दोन्ही
अग्निवीर परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमातील घटकांची माहिती agniveernavy.cdac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
सेवानिधी -
अग्निवीर म्हणून निवड झाल्यांनतर
उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा ३० हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ३३ हजार
रुपये, तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये आणि चौथ्या वर्षी ४० हजार रुपये वेतन मिळेल.
यातील ३० टक्के रक्कम ही अग्निवीर कॉपर्स फंडात (राखीव
निधी) टाकले जाईल. एवढीच रक्कम केंद्र शासनामार्फत टाकली
जाईल. चार वर्षाच्या कालावधीत उमदेवाराचे ५.०२ लाख रुपये आणि नौदलाचे ५.०२ लाख
रुपये असे एकूण १०.०४ लाख रुपये या निधीत गोळा होतील. या शिवाय पोषाख, प्रवास भत्ता,
जोखिम आणि कष्ट (हार्डशीप) भत्ता दिला
जाईल. चार वर्षाच्या कालावधीसाठी ४८ लाख रुपयांचे विमा कवच राहील. या कालावधीत
अग्निवीरांना नौदलाच्या वैद्यकीय सेवा केंद्रातील सुविधांचा लाभ घेता येईल.
क्रीडा,
जलतरण आणि इतर शाळा बाह्य कामगिरी (एक्स्ट्रा करिक्युलर
ॲक्टिव्हीटी- उदा- गायन/ वादन/ वादविवाद स्पर्धा/ चित्रकला/ नृत्य इत्यादी) यात चांगली कामगिरी असल्यास उत्तम. निवडीच्या वेळी त्याच लाभ होऊ शकतो.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज अंतिम तारखेच्या आधीच करावा आणि एकापेक्षा अधिक
अर्ज करु नये याची खबरदारी घेण्याची सूचना नौदलाने केली आहे. एकापेक्षा अधिक अर्ज
केलेल्या उमेदवारांचा अर्ज रद्द केला जाईल.
सुरेश वांदिले
०००
.jpg)
Comments
Post a Comment