अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट
अग्निपथ : उत्तम
आणि उत्कृष्ट
अग्निवीर (अग्निपथ) योजनेंतर्गत तिनही दल स्वतंत्रपणे भरती प्रक्रिया राबवतील. मनुष्यबळाची
गरज लक्षात घेऊन निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निर्धारित केली जाईल. तसा
उल्लेख, प्रत्येक दलाच्या अग्निवीर जाहिरातीमध्ये केला जाईल. (वायुसेना अग्निवीर महिलांची संख्या ही सेवेच्या गरजेनुसार ठरवली जाईल.)
वायुसेना अग्निवीर
फक्त अविवाहित मुले आणि मुलीच या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेच्या
कालावधीत संबंधितांना लग्नबंधनात अडकता येणार नाही. पुरुष उमेदवाराची उंची किमान
१५२.५ सेमी तर महिला उमेदवारांची उंची १५२ सेमी असावी. वय आणि उंचीच्या योग्य
प्रमाणात वजन असावे. छाती, वय आणि उंचीच्या योग्य प्रमाणात असावी. इतर शारीरिक आरोग्याची
(कान- नाक- डोळे) मानके
जाहिरातींमध्ये नमूद करण्यात येतात. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम
असावा.
या अग्निवीरांच्या निवडीसाठी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता निर्धारित
करण्यात आली आहे.
(१) विज्ञान विषय- १२ वीमध्ये
भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजीचा अभ्यास
केलेला असावा. सरासरीने ५० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक.
किंवा ३ वर्षे कालावधीचा अभियांत्रिकी (मेकॅनिकल/
इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाइल/ कॉम्य्पुटर सायंस/ इन्फॉर्मेशन
टेक्नॉलॉजी/ इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी) डिप्लोमा. सरासरीने
५० टक्के गुण आवश्यक. पदविका अभ्यासक्रमामध्ये इंग्रजीचा समावेश नसल्यास १० वी
किंवा १२ वीच्या इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण. किंवा राज्य शिक्षण मंडळाचा दोन वर्षे
कालावधीचा व्होकेशनल अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमासोबत भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास
केलेला असावा. सरासरीने ५० टक्के गुण आवश्यक. व्होकेशनल अभ्यासक्रम किंवा १० वी
किंवा १२ वीच्या इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण.(२) विज्ञान विषय वगळून- विज्ञान शाखेशिवाय इतर कोणत्या विषयातील १२ वीची
परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करु शकतात. त्यांना सरासरीने ५० टक्के गुण आणि
इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. किंवा राज्य शिक्षण मंडळाचा दोन वर्षे
कालावधीचा व्होकेशनल अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमासोबत भौतिकशास्त्र आणि गणिताचा
अभ्यास केलेला असावा. सरासरीने ५० टक्के गुण आवश्यक. व्होकेशनल अभ्यासक्रम किंवा
१० वी किंवा १२ वीच्या इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण. (१२
वीमध्ये विज्ञान विषय घेतलेले विद्यार्थी विज्ञान विषय आणि विज्ञान विषय नसलेल्या
परीक्षेला एकाच वेळी बसू शकण्याचा पर्याय अर्ज भरताना देऊ शकतात.)
निवड प्रकिया
निवडीसाठी दोन टप्प्यातील चाळणी परीक्षा घेतली जाईल.
टप्पा एक - (1) विज्ञान विषय
परीक्षा- ही ऑनलाइन चाळणी परीक्षा एक तासाची असेल. या पेपरमध्ये भौतिकशास्त्र,
गणित आणि इंग्रजी या विषयाचे प्रश्न विचारले जातील. केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ
(सेट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन-सीबीएसइ) च्या १२ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित प्रश्न विचारले जातील. (२) विज्ञान विषय वगळून परीक्षा- या पेपरचा कालावधी
४५ मिनिटांचा राहील. या पेपरमध्ये इंग्रजी, तार्किक कौशल्य (रिझनिंग) आणि सामान्य अध्ययन (जनरल अवेअरनेस) या विषयाचे प्रश्न विचारले जातील. इंग्रजीचा पेपर सीबीएसइच्या १२ वीच्या
अभ्यासक्रमांवर आधारित राहील. (३)
विज्ञान विषय आणि विज्ञान विषयाला वगळून परीक्षा- या पेपरचा कालावधी ८५ मिनिटांचा
राहील. या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी व तार्किक कौशल्य (रिझनिंग) आणि सामान्य अध्ययन (जनरल
अवेअरनेस) या विषयाचे प्रश्न विचारले जातील. भौतिकशास्त्र,
गणित आणि इंग्रजीचा पेपर सीबीएसइच्या १२ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित राहील. प्रत्येक
अचुक उत्तरासाठी एक गुण दिले जातील. चुकलेल्या उत्तरासाठी ०.२५ टक्के गुण कपात
केले जाईल. विज्ञान विषय आणि विज्ञान विषयाला वगळून परीक्षेतील दोन्ही पेपर्समध्ये
उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
दुसरा टप्पा
टप्पा एक मधील गुणांवर आधारित निवडक विद्यार्थ्यांना (शॉर्टलिस्टेड) टप्पा दोनसाठी
बोलावले जाईल. दुसरा टप्पा हा शारीरिक क्षमता चाचणी (फिजिकल
फिटनेस टेस्ट)चा आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांना ७ मिनिटात आणि
महिला उमेदवारांना ८ मिनिटात पूर्ण करावयाची १.६ किलोमीटरची दौड आणि पुरुष
उमेदवारांना दिलेल्या वेळेत १० सिट्स अप (उठाबशा),१० पूशअप्स (दंडबैठक) आणि २०
स्क्वॅट्स (उठाबशा) आणि महिला
उमेदवारांना दिलेल्या वेळेत १० सिट्स-अप आणि १५ स्क्वॅटसचा समावेश आहे.
शारीरिक क्षमता चाचणीत यशस्वी झालेल्या उमेदवारांना ॲडॅप्टॉबिलिटी (अनुकूलनक्षमता किंवा परिस्थितीशी जुळवून घेणे) चाळणी परीक्षा एक आणि दोन द्यावी लागते. ॲडॅप्टॉबिलिटी एक ही लेखी
परीक्षा असून यामध्ये भारतीय वायुदलामध्ये संबंधित उमेदवार कार्य करण्यासाठी आणि
विविध भौगौलिक प्रदेश आणि परिस्थितीत कार्यरत राहण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही
याची परीक्षा घेतली जाते. या टेस्ट एक मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना
ॲडॅप्टॉबिलिटी टेस्ट दोन द्यावी लागते. भारतीय सैन्याची जीवनशैली आणि भारतीय
वायुदलाच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची सक्षमता तपासली जाते.
टप्पा तीन
ॲडॅप्टॉबिलिटी
टेस्ट दोन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय चाळणी द्यावी लागते. या
चाळणीतील सर्व कसोट्यांवर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अंतिम निवडीसाठी पात्र ठरु
शकतात. संपर्क-agnipathvayu.cdac.in
(विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान, वाहन चालक, वाहन
देखभाल/ दुरुस्ती, आतिथ्यशीलता, लेखा, क्रीडा अशासारख्या क्षेत्रातील कौशल्य
प्राप्त केले असल्यास त्यांना, त्या संदर्भातील पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर
करावे लागतील.)
अग्निवीर योजनेचा कालावधी संपुष्टात आल्यावर संबधिताने या कालावधीत
प्राप्त केलेल्या कौशल्याच्या अनुषंगाने विस्तृत असे कौशल्य संच प्रमाणपत्र (स्किल सेट सर्टिफिकेट) प्रदान
केले जाईल.
०००
अग्निवीर आर्मी-
या अग्निवीरांची पुढील प्रकारात निवड केली जाते- (1) सामान्य सेवा - अर्हता- ४५ टक्क्यांसह १० वी
उत्तीर्ण. प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण आवश्यक. (2) तांत्रिक (टेक्निकल) सेवा - भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह १२ वी
विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. सरासरीने गुण ५० टक्के. प्रत्येक विषयात किमान ४०
टक्के. (3) कारकून/स्टोअर कीपर तांत्रिक संवर्ग- किमान ६०
टक्के सरासरी गुणांसह कला/वाणिज्य/विज्ञान शाखेतील १२ वी उत्तीर्ण. प्रत्येक
विषयात किमान ५० टक्के गुण, (4) ट्रेड्समन-- किमान दहावी
पास. प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण, (५)
ट्रेड्समन--किमान आठवी पास. प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण.(६) अग्निवीर सामान्य सेवा महिला- अर्हता- ४५
टक्क्यांसह १० वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात ३३ टक्के गुण आवश्यक.
निवड प्रक्रिया
निवडीसाठी पुढील कार्यपध्दतीचा अवलंब केला जातो. टप्पा एक शारीरीक
क्षमता चाचणी. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाळणी
परीक्षा (टप्पा दोन) घेतली जाते. या
चाळणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीइइ) (सामायिक प्रवेश परीक्षा) ही
लेखी परीक्षा द्यावी लागते. ऑनलाइन
नोंदणी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर करावी लागेल.
निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेच्या हितासाठी आवश्यक असणाऱ्या
कोणत्याही कार्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांची नियमितपणे
वैद्यकीय, शारीरिक, क्षेत्रीय चाळणी आणि लेखी परीक्षा घेण्यात येऊन त्याची सक्षमता
तपासली जाते. नियमित स्वरुपाच्या नियुक्तीसाठी या चाळण्यांचा उपयोग केला जातो. या
उमेदवारांना कोणत्याही ठिकाणी (रेजिमेंट/युनिट) काम करावे लागू शकते. त्याचबरोबर त्यांचे स्थानांतरही होऊ शकते. ज्या २५
टक्के उमेदवारांना नियमितपणे सामावून घेतले जाईल त्यांना पुढे १५ वर्षाच्या सेवेचा
(ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) लाभ मिळेल.
थलसेनेच्या
अग्निवीर भरतीसाठी वेगवेगळया ठिकाणी रॅली आयोजित केली जातील. त्याआधी किमान दोन
तीन महिने आधी १.६ किलोमीटर दौडीचा सराव करण्याची सूचना थलसेनेने केली आहे. काही
किरकोळ वैद्यकीय समस्या असल्यास त्या दुरुस्त केल्यास अंतिम निवडीच्यावेळेस
नाकारल्या जाण्याची शक्यता कमी होते. ट्रेडसमन संवर्गासाठी अर्ज करणाऱ्या
उमेदवारास ट्रेडसमन ॲप्टिट्यूड टेस्ट, द्यावी लागते त्यामुळे त्याने आपण कोणत्या
ट्रेडमध्ये बसतो याची योग्य पध्दतीने खात्री करुन घेतली पाहिजे. १० वी किंवा १२ वीच्या
प्रमाणपत्रांमध्ये नावामध्ये काही बदल असल्यास तो दुरुस्त करुन घेतला पाहिजे.
अग्निवीर
नौदलाप्रमाणे अग्निवीर थलसेना आणि वायुसेनेतील उमेदवारांना समान पध्दतीचे लाभ दिले
जातील.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment