अमृततूल्यच्या जगात!


 

अमृततूल्यच्या जगात!

सध्या जिकडे बघावे तिकडे  अमृततूल्य चहाचे बोर्ड बघायला मिळतात. चहाच्या टपऱ्यांपासून ते अमृततूल्यपर्यंतचा हा प्रवास चहाच्या अतिशय वाढलेल्या लोकप्रियतेचा पुरावा होय. या अमृततूल्यचहाची निर्मिती-उत्पादन- चहा लागवड- चहा शेतीशी निगडित खते-कीटकनाशक निर्मितीचे कारखाने यासाठी तज्ज्ञ व्यवस्थपकांची गरज भासते. ही गरज भागवण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ बेंगालने, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टी मॅनेजमेंट, हा स्वयंसहाय्यीत अभ्यासक्रम या विद्यापीठाने १९९६ साली सुरु केला. चहामळे आणि चहा निर्मिती कारखान्यांमधील उत्पादन, विक्री, विपणन आणि व्यापार या क्षेत्रातील सर्व पैलुंच्या सैध्दांतिक बाबी उमदेवारांना कळव्यात यादृष्टिने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमदेवारांना चहामळे, चहा निर्मिती कारखाने, चहा उत्पादनाशी संबंधित कृषीरासायनिक कारखाने, खत कारखाने आणि टी ब्रोकर कंपन्यामध्ये साहाय्यक व्यवस्थापक या पदावर रोजगाराची संधी मिळू शकते. चहा लागवड, व्यवस्थापन याक्षेत्रातील कार्यात्मक ज्ञान, कौशल्यप्राप्तीसाठी आणि  सध्या या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांना त्यांचे ज्ञान - कौशल्यवृध्दी व पुढील प्रगतीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो.

 

 

अर्हता- या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधरास प्रवेश मिळू शकतो. उमेदवाराचे कमाल वय १ जून रोजी २५ वर्षे असावे.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात पुढील विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे - () चहाचे वनस्पतीशास्त्र आणि चहाची रोपवाटिका, () मृदा आणि जलव्यवस्थापन, () किटकनाशक व्यवस्थापन, () चहाचे कृषीशास्त्र, () चहाच्या सर्वसामान्य बाबी, () जैवरसायनशास्त्र आणि चहा उत्पादन, () कामगार कायदे आणि व्यवस्थापन, () चहाचे अर्थशास्त्र, () संगणकाचा वापर.

निवड प्रकिया- या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी त्यांना पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाते. उपलब्ध जागा आणि राखीव जागेचे निकष लक्षात घेऊन प्रवेश दिला जातो. अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास चाळणी परीक्षा घेतली जाऊ शकते. या अभ्यासक्रमाचा कालावधी-एक वर्षं आहे.

या संस्थेमध्ये पुढील अभ्यासक्रमही करता येतात- () बीएस्सी इन टी सायंस.कालावधी- ३ वर्षे,() एम.एस्सी इन टी सायंस. कालावधी- २ वर्षे. () एम.फिल इन टी सायन्स. () पीएचडी इन टी सायंस.

संपर्क - युनिव्हर्सिटी ऑफ नार्थ बेंगाल, पोस्ट ऑफिस- राजा राममोहनपूर, जिल्हा- दार्जिलिंग सिलीगुरी - ७३४०१३, दूरध्वनी- ०५३- २७७६३८०, संकेतस्थळ - www.nbu.ac.in, ईमेल-pgdtm_nbu@yahoo.com

०००

अहा आणि वहा !

चहाची गुणवत्ता आणि दर्जा ठरवतं कोण?  या क्षेत्रासाठी वेगळया प्रकारचं कौशल्य असलेलं मनुष्यबळ लागतं. हे कौशल्य प्राप्त केलेल्या व्यक्तिंना चहा निर्मिती कंपन्यांमध्ये  रोजगाराची संधी मिळते. काहीजण खाजगीरीत्या आपल्या कौशल्याची सेवा देतात.

अभ्यासक्रम-

प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन  टी टेस्टिंग ॲण्ड मार्केटिंग,

हा अभ्यासक्रम इंडियन इंस्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट  या संस्थेनं सुरु केलाय. ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या पुढाकारानं स्थापन करण्यात आलीय. या संस्थेचा विकास सेंटर ऑफ एक्सलंस म्हणजेच गुणवत्तेचं केंद्र म्हणून केलं जातय. या संस्थेला टी बोर्ड, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, स्पाईसेस बोर्ड आणि प्लँटेशन इंडस्ट्रीनं पाठबळ दिलं आहे.

टी टेस्टिंग या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आणि सध्याच्या काळातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील चहा उद्योगाशी निगडित महत्वाच्या गरजा लक्षात घेऊन या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलीय. टी टेस्टिंग सोबत मार्केटिंग (विपणन) चं तंत्र आणि कौशल्य शिकवलं जात असल्याने उमेदवारांना रोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळणं सुलभ जातं.

  काय शिकाल ? - सुयोग्य विपणनासाठी टी टेस्टिंग, चहाचे उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण, टी टेस्टिंगची भाषा, कप टेस्टिंगची तंत्रं, इलेक्ट्रॉनिक नोज आणि इलेक्ट्रॉनिक टंग, खरेदीच्या अनुषंगाने टेस्टिंग आणि चहांचे मिश्रण, चहाच्या चवीच्या अनुषंगाने रसनेंद्रियाचा विकास , चहा श्रेणीकरणाच्या सूक्ष्म छटा इत्यादी विषय घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. टी टेस्टिंगच्या अनुषंगाने रसनेंद्रियाच्या कौशल्य निर्मितीचं प्रात्यक्षिक शिकवलं जातं. टी इस्टेट, चहा उत्पादन करणारे कारखाने आदींच्या भेटी या बाबींचा प्रशिक्षण कालावधीत समावेश आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यावर प्रकल्पाचं (प्रोजेक्ट वर्क) सादरीकरण करावं लागतं. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. दोन्हीच्या गुणांवर आधारित, सर्टिफिकेट कोर्स इन टी टेस्टिंग ॲण्ड मार्केटिंग हे प्रमाणपत्र दिलं जातं.

    देशात आणि परदेशात उत्पादन होणाऱ्या प्रमुख चहांच्या परीक्षणाच्या विविध पध्दतींची ओळख या अभ्यासक्रम/प्रशिक्षणात करुन दिली जाते. या संस्थेच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत परीक्षणाच्या पध्दती शिकवल्या जातात. त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक बोलावले जातात. या अभ्यासक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यात चहा उद्योगाशी संबंधित विक्री- विपणनातील संधी, जागतिक स्तरावरील ग्राहकांच्या चहाच्या आवडीनिवडी आदी बाबींची ओळख करुन दिली जाते. त्यामुळे या  क्षेत्रातील व्यवसाय संधीची माहिती मिळते.

हा अभ्यासक्रम/ प्रशिक्षण कोणत्याही विद्याशाखेतील उमेदवारांना करता येतो. प्रत्यक्ष मुलाखत आणि टी टेस्टिंगची आवड लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते.

संपर्क- प्रोग्रॅम कुऑर्डिैनेटर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट,जनभारती कॅम्पस, पोस्ट ऑफिस मलाथल्ली, बेंगळुरु- ५६००५६, दूरध्वनी-०८०-२३२११७१६, ईमेल- mdp.iipmb@gmail.com / mdp@iipmb.edu.in

०००

कौशल्य निर्मिती आणि रोजगार संधी

रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरु शकतील असे काही पदवीस्तरीय अभ्यसाक्रम मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने सुरु केले आहेत. बीएस्सी इन () पेंट टेक्नॉलॉजी, () बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन सायन्स, () सायकॉजिकल हेल्थ ॲण्ड बिहेव्हिरिअल सायंस. बीए इन () मल्टीमीडिया ॲनिमेशन, () मल्टीमीडिया व्हिज्युअल इफेक्ट, () मल्टीमीडिया स्क्रीन रायटिंग, () मल्टीमीडिया फिल्म प्रॉडक्शन ॲण्ड मॅनेजमेंट, () मल्टीमीडिया फिल्म आर्ट, () ॲडर्व्हटायजिंग कम्युनिकेशन डिझाइन. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायंस इन () रिटेल मॅनेजमेंट, () कस्टमर क्लिअरन्स, फ्राईट फॉरवर्डिंग ॲण्ड लॉजिस्टिक्स, () कॅपिटल मार्केट.

या सर्व अभ्यासक्रमांना १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. मात्र त्यासाठी संस्थेची चाळणी परीक्षा द्यावी लागते. सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी-प्रत्येकी तीन वर्षे.

कौशल्य निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम- () डिप्लोमा इन स्क्रीनप्ले रायटिंग/ कालावधी - ११ महिने, () डिप्लोमा इन फिल्म मेकिंग/ कालावधी-११ महिने.

सटिफिकेट इन () स्क्रीनप्ले रायटिंग/ कालावधी - ६ महिने, () साऊंड डिझायनिंग/ कालावधी - ६महिने, () एडिटिंग/ कालावधी - ३ महिने, () सिनेमॅटोग्रॅफी/ कालावधी- ६ महिने, () प्रॉडक्शन डिझाइन/ कालावधी - ६ महिने, () ॲक्टिंग / कालावधी - ६ महिने, () फायनांशिअल मार्केट्स/ कालावधी- ६ महिने, () योग/ कालावधी- २ महिने, () बिझिनेस ॲनॅलिटिक्स/ कालावधी-६ महिने, (१०) डिजिटल मार्केटिंग/ कालावधी- ६ महिने, (११) फोटोग्रॅफी/ कालावधी- २ महिने, (१२) सेल्स ॲण्ड मार्केटिंग/ कालावधी- ६ महिने, (१३) मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मॅनेजमेंट / कालावधी- ६ महिने, (१४) फिटनेस न्युट्रिशन/ कालावधी - २ महिने, (१५) क्लाऊड कॉम्प्युटिंग/ कालावधी - ६ महिने, (१६) ट्रॅव्हल रिझर्वेशन/ कालावधी-४महिने, (१७) ऑफिस मॅनेजमेंट ॲण्ड लाइफ स्किल्स/ कालावधी- ४ महिने, (१८) ऑलिंपिक लिफ्टिंग/ कालावधी -  ६ महिने.

संपर्क - कलिना कॅम्पस, सांताक्रुझ-पूर्व, मुंबई- ४०००९८, दूरध्वनी- ०२२- ६९१९५६००, ईमेल-garware@giced.mu.ac.in, संकेतस्थळ-www. giced.mu.ac.in

०००

नवं शिका

 एमबीए इन इश्युरंस- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जोधपूरच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्कूल ऑफ इंश्युरन्स स्टडीजने, हा स्पेशलाईज्ड अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी प्राप्त उमेदवार या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. या विद्यार्थ्यांना १० वी आणि १२ वीमध्ये ‍किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. प्रवेशासाठी २०२२ आणि २०२३च्या कॅट/ सीमॅट/ मॅट या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील. संपर्क- दूरध्वनी- ०२९१-२५७७१३८, संकेतस्थळ-www.insuranceschoolnlu.ac.in

सुरेश वांदिले

०००

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी