सावध एका पुढील हाका...
सावध एका पुढील हाका...
गेल्या काही दिवसांमध्ये रशिया, नेपाळ, चीन,
फिलिपाइन्स या देशांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी सुलभतेने आणि कमी खर्चात
प्रवेश, अशा जाहिराती वृत्तपत्रांमध्ये
झळकल्या आहेत. या जाहिरातींच्या मोहात पालक आणि इच्छूक विद्यार्थी पडू
शकतात.
कोणी कुठे शिकायला जावं, हा सर्वस्वी
ज्याचात्याचा प्रश्न असला तरी, या अनुषंगाने युक्रेनच्या निमित्त आपल्या देशातील
मुले-मुली मोठ्या संख्येने परदेशात शिक्षणासाठी जातात यावर झालेल्या उदंड चर्चेकडे
लक्ष द्यायला हवे. ही चर्चा सुरु असतानाच, कोणकोणत्या देशात आपली मुले जातात याचा
एक अहवाल प्रकाशित झाला. यामध्ये गेल्यावर्षी आपल्याकडील बरीच मुले पाकिस्तान,
नेपाळ, ओमान, श्रीलंका, आखाती देश यामध्ये शिक्षणासाठी गेल्याचे नमूद आहे. (ही माहिती संसदेत सादर करण्यात आली.) आपल्या देशापेक्षा पाकिस्तान, नेपाळ, कतार,
श्रीलंका किंवा काही आखाती देशात दर्जेदार शिक्षण मिळते, असे ज्या पालक आणि
विद्यार्थ्यांना वाटते, ते धन्यच समजले पाहिजेत.
या मुलांनी कोणत्या ज्ञानशाखेत प्रवेश घेतला याची
माहिती काही प्रसिध्द झालेली नाही. तथापि एकूणच इतर देशात स्वस्तात वैद्यकीय
शिक्षण घेता येते म्हणून जाणारे अधिक असतात, तेव्हा हे विद्यार्थी याच शाखेत
शिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानादी देशात गेले असावेत असे समजू या. मुलांना डॉक्टरच
करायचे असेल तर एमबीबीएस वगळून भारतात बीएएमएस (आयुर्वेद), बीएसचएमस (होमिओपॅथी) बीयूएमएस (युनानी), नेचरोपथी, बॅचलर ऑफ आक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ
फिजिओथेरपी, बीडीएस असे अभ्यासक्रम आहेत की. त्याच्या शेकड्याने संस्था देशभर
आहेत. या संस्थांमधून हे अभ्यासक्रम करणे काय वाईट?
निवड करताना काळजी घ्या
परदेशातील शिक्षणासाठी जाताना देशाची निवड करताना
ते देश किमान लोकशाही प्रक्रिया, कायदे कानून
मानणारे, शांततामय सहजीवनास प्राधान्य देणारे, राजकीय स्थैर्य असणारे असे निवडायला हवे. असे देश कोणते? हे तर
पालक आणि विद्यार्थी नक्कीच समजू शकतात. राजकीयदृष्ट्या
अस्थिर, संघर्षात होळपणारे, कर्मठ/धार्मिक किंवा चीनसारख्या पोलादी पडद्याच्या
देशात मुलांना शिक्षणासाठी पाठवल्यावर भविष्यात सारे
काहीच उत्तमच घडेल अशी आशा कशी बरे ठेवणार?
अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड,
जर्मनी, फ्रांस, कॅनेडा आणि युरोपिअन देशांमधील एकूणच परिस्थिती ही बहुतेक वेळेस
शांततापूर्णच राहिली आहे. दर्जेदार शिक्षणाचा वारसा या देशांना मिळाला आहे.
अमेरिकासारख्या देशात करोनाकाळात गेलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी
मिळवण्यासाठी फार त्रास गेला नाही. ट्रम्पादी व्यक्तींनी बरीच बडबड करुनही तेथील
शैक्षणिक व्यवस्थेत, अमेरिका फर्स्ट वगैरे काही झाले नाही. आपल्या देशातील
विद्यार्थी लाखाच्या संख्येत गेले आणि नोकरीलाही लागले.
मेळावे लागले, सावधान..
करोनामुळे गेली दोन वर्षे, परदेशी शिक्षण
संस्थांमधे प्रवेशाची माहिती देणारे मेळावे लागू शकले नव्हते. मात्र यंदा मुंबई-
पुणे- ठाणे- नासिक शहरात असे मेळावे लागायला सुरुवात झाली आहे. लवकरच नागपूर-
कोल्हापूर अशा सारख्या शहरात हे मेळावे भरतील. या आणि थेट प्रवेश घ्या, अशा अत्यंत
आकर्षक जाहिरातींसह या मेळाव्यांचे आयोजन होताना दिसते. इच्छूक पालक आणि
विद्यार्थ्यांची पावले तिकडे वळतीलच. या मेळाव्यात विविध देशातील विद्यापीठांचे
प्रतिनिधी हजर असतात किंवा तसे जाहीर केले जाते. एका संस्थेने परदेशी जाण्याचे
विमानाचे भाडे देण्याचे जाहिरातीत नमूद केले. त्यांना याबाबींविषयी जमेल तितके
प्रश्न विचारुन शंकाकुशकांचे निरसन करायला हवे.
परदेशी संस्थांमधील शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या
जीआरई (ग्रॅज्यूएट रिकॉर्ड एक्झामिनेशन), टोफेल (टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज
फॉरेन लँग्वेज), आयलेटस (इंटरनॅशनल इंग्लिश
लँग्वेज टेस्टिंग सिस्टिम), सॅट (स्कोलॅस्टिक
ॲप्टिट्यूड टेस्ट) या परीक्षा आवश्यक समजल्या जातात. थेट प्रवेश
देण्याचे आमिष दाखवणाऱ्या संस्था, या परीक्षांपासून सूट कां देऊ इच्छितात, हा
प्रश्नही विचारला पाहिजे.
अमेरिका, इंग्लंड वा ऑस्ट्रेलियामध्ये शैक्षणिक
संस्थांचे शिक्षण शुल्क प्रचंड असते. या शुल्कावरच या संस्थांचा संसार चालला असतो.
त्यामुळे या संस्थांच्या दर्जा आणि गुणवत्तेचाही विचार करणे गरजेचे आहे. ज्या
शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांची
रँकिंग (गुणवत्ता आणि दर्जाची क्रमवारी) जाणून घ्यावी. अशा रँकिंग, क्यूएस (क्वॅकक्वारेल्ली
सायमंडस) वर्ल्ड रँकिंग युनिव्हर्सिटी किंवा टाइम्स हायर एज्यूकेशन वर्ल्ड रँकिंग किंवा
ॲकॅडेमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटी या संस्थांमार्फत केल्या जातात. या
संस्थांनी मागील एक-दोन वर्षात संबंधित संस्थेला/विद्यापीठाला कोणते रँकिंग दिले
आहे, याची माहिती इंटरनेटवर मिळू शकते. किंवा आपण ज्या स्थानिक संस्थेमार्फत
परदेशी शिक्षण प्रक्रियेविषयी सल्ला-सेवा घेतली असेल त्यांच्याकडून अधिकृत माहिती
जाणून घ्यावी. काही रक्कम भरल्यास या संस्थांव्दारे अधिकृत अहवाल दिला जातो.
शैक्षणिक संस्था/विद्यापीठाच्या रँकिंगसोबतच ज्या
अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा त्या महाविद्यालयाचे रँकिंग समजून घ्यायला हवे. (उदा-अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठ हे जगातील
पहिल्या पाचात येते. याचा अर्थ या विद्यापीठातील अभ्यासक्रम देणारी सर्व
महाविद्यालये ही पहिल्या पाचातच असतील असे नव्हे. परदेशातील एखाद्या दोनशे
क्रमांकाच्या विद्यापीठातील विशिष्ट विषयाचा अभ्यासक्रम शिकवणारी संस्था पहिल्या
५० किंवा २५ मध्येही राहू शकते. याची माहिती संबंधितांकडून समजून घेणे व त्यासाठी
वारंवार विचारणा करणे गरजेचे आहे. ही बाब अमेरिकन कौन्सुलेटनेसुध्दा स्पष्ट केली
आहे.
महत्वाची संकेतस्थळे
(१) अमेरिकेतील शिक्षण
संस्था, दर्जा, अधिस्वीकृती, शिष्यवृत्ती, करिअर संधी आदी बाबत माहिती देणारे
शासकीय संकेतस्थळ-educationausa.state.gov. मुंबईत एज्युकेशन युएसएचे अधिकृत मार्गदर्शन
केंद्र- युनायटेड स्टेटस इंडियन एज्युकेशनल फाउंडेशन (युसिएफ) हे, मेकरभवन एक,
दुसरा माळा, न्यू मरिन लाईन्स, चर्चगेट पूर्व येथे आहे. हे केंद्र सकाळी साडेनऊ ते
संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत खुले असते. याठिकाणी अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठीची
प्रवेश प्रकिया, अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम, शिष्यवृत्ती, प्रवेशासाठी आवश्यक
परीक्षा यांची व्यक्तिगत माहिती दिली जाते. संपर्क - ०२२-२२६२४६०३, संकेतस्थळ-www.usief.org.in/study-in-the
US/mumbai.aspx
एज्युकेशनयूएस इंडिया मोबाईल ॲप- अमेरिकन शासनाचे हे अधिकृत ॲप असून त्यावर
अमेरिकेतील उच्च शिक्षणाची माहिती दिली जाते.
(२) इंग्लंडमधील शिक्षणासाठी study-uk.britishcouncil.org या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये विद्यापीठाची निवड, शिष्यवृत्ती आणि शिक्षणाचा खर्च, ब्रिटनमध्ये कसे
जायचे, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काय? ब्रिटनमध्ये कां
शिकायचे? अशा सारख्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.
(३) जर्मनी- www.daad.de/en/study-and-reserch-in-germany
(४) ऑस्ट्रेलिया- studyaustralia.gov.in
(५) कॅनेडा- educanada.ca
अशाप्रकारे वेगवेगळया देशांमधील शैक्षणिक संस्था
आणि प्रवेश प्रक्रियाबांबत अधिकृतपणे माहिती मिळवायला हवी. परदेशातील शिक्षण
प्रक्रियेसाठी मोठे शुल्क आकारुन, सल्ला-सेवा देणाऱ्या संस्थांनी आपणास दिलेली
माहिती व तुम्ही मिळवलेली माहिती पडताळून बघा. या सल्लागार संस्थांचे परदेशातील
शैक्षणिक संस्थांशी प्रवेशाबाबत व्यावसायिक स्वरुपाचे संबंध राहू शकतात. त्यामुळे
अमुकच संस्थांमध्ये प्रवेश घ्या, वगैरे सल्ले मिळू शकतात. हे सल्ले योग्यही राहू शकतात, पण आपण
विविध शंका उपस्थित करुन त्यांचे निरसन करायला हवे.
दचकू नका
परदेशातील शिक्षणाचे शुल्क मोठे असले तरी त्याने
दचकून जाण्याचे कारण नाही. बऱ्याच संस्था शिष्यवृत्ती देतात. अशा संस्था पदरेशी
कर्जसुविधाही देतात. त्यांचे हे कर्ज सोईचे ठरेल की भारतातील सार्वजनिक बँकांचे
कर्ज सोईचे ठरेल याचाही तुलनात्मक अभ्यास करावा. त्याविषयी सल्ला-सेवा संस्थेची
मदत घ्यावी.
महाराष्ट्रात राखीव संवर्गासोबतच आता खुल्या
संवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण संस्थांमधील काही अटीशर्तींसह परदेशी
शिक्षणासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. त्याचाही लाभ घेता येतो. स्टेट बँक ऑफ इंडिया
किंवा बँक ऑफ महाराष्ट्रसारख्या सार्वजनिक बँका शैक्षणिक कर्ज सुलभतेने देतात. या
बँकांना आठ ते दहा प्रमाणपत्र/कागदपत्रे हवी असतात. त्यांना ज्या पध्दतीने व
तऱ्हेने ही कागदपत्रे हवी असतात, त्यांची पूर्तता तंतोतत तशीच केली तर, कर्ज
प्रकिया महिन्या दीड महिन्यातही पूर्ण होऊ शकते. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची
गरज भासत नाही. परदेशात बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना शिकता शिकता काम करण्याची
संधी पहिल्या सत्रापासूनच मिळू शकते. अमेरिकेत दर आठवडयाला वीस तास असे काम करता
येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा काही खर्च त्यातून भागू शकतो.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची तीव्र इच्छा असेल
त्यांनी परदेशातील शिक्षणासाठी जायला हरकत नाही. मात्र त्यासाठी थोडा सारासार
विचार करुनच प्रवेशाचा विचार करावा. पाकिस्तानादी देशातील प्रवेश हा कोणत्याही
क्षणी घातक ठरु शकतो, हे ध्यानात ठेवलेले बरे.
लेखाच्या प्रारंभी नमूद केल्यानुसार, कुणी कुठे
शिकायला जावे, हा सर्वस्वी व्यक्तीगत प्रश्न आहे. तथापि एमबीबीएस शिक्षणासाठी
परदेशात पाठवताना आपल्या पाल्याची सुरक्षितता आणि करिअर संधी या संदर्भातील
काटेकोर चौकशी करणे आणि संपूर्ण दक्षता घेणे इष्ट ठरेल.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment