१२ वी नंतर वेगळे पर्याय


 

१२ वी नंतर वेगळे पर्याय

१२ वीनंतर वेगवेगळया ज्ञानशाखेतील मुलामुलींनी नव्या आणि सध्याच्या काळात रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरु शकतील अशा अभ्यासक्रमांकडे वळले पाहिजे असा सल्ला बरेच मार्गदर्शक देत असतात. असे वेगवेगळे अभ्यासक्रम काही संस्‍थांनी सुरु केले आहेत. यामध्ये काही शासकीय संस्था तर काही बऱ्याच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या खाजगी संस्था आहेत. नमुन्यादाखल (इंडिकेटिव्ह) काही संस्था आणि अभ्यासक्रमांची माहिती पुढे दिली आहे. या संस्था दर्जेदार आहेत. तथापि पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भात निर्णय घेण्याआधी प्रत्यक्ष खातरजमा करुन घेणे इष्ट ठरेल.

(१) मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रामध्ये बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)-एमबीए, हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करता येतो. त्याला सरासरीने ४५ टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी गुणांमध्ये ५ टक्क्यांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या ८५ टक्के जागा महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. हा अभ्यासक्रम केल्यावर वेगवेगळया उद्योग ,व्यवसाय आणि कंपन्या यामध्ये व्यवस्थापकीय जबाबदारी पार पाडण्यासाठीच्या संधी मिळू शकतात. संपर्क- mu.ac.in/thane-sub-campus

(२) सिम्बॉयसीस सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेचा बीबीए हा अभ्यासक्रम देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमांपैकी एक समजला जातो. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या चार वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते. दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदविका दिली जाते. तिसऱ्या वर्षानंतर पदवी आणि चौथ्या वर्षानंतर ऑनर्स पदवी प्रदान केली जाते. या प्रत्येक टप्प्यांवर विद्यार्थ्याला अभ्यासक्रम सोडण्याची सूट आहे. तो तीन वर्षानंतर या अभ्यासक्रमाला पुन:प्रवेश घेऊ शकतो. या अभ्यासक्रमामध्ये (१) मार्केटिंग, (२) आंत्रप्रिन्युरशीप, (३) एनव्हीराँन्मेंट मॅनेजमेंट, (४) इंटरनॅशनल बिझिनेस, (५) अकाउंटिंग ॲण्ड फायनांस, (६) ह्युमन रिसर्च मॅनेजमेंट या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. संपर्क-https://www.scmspune.ac.in/

(३) व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल इंस्टिट्यूट  ऑफ फिल्म, कम्युनिकेशन ॲण्ड क्रिएटिव्ह आर्ट्स या संस्थेने माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रात रोजगारक्षम असे बरेच  अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या संस्थेच्या स्कूल ऑफ डिझाइनने बॅचलर ऑफ डिझाइन इन व्हिज्युअल कम्युनिकेशन, हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर (१) जाहिरात, (२) कला दिग्दर्शन,(३) द्रुक श्राव्य, (४) ब्रँडिग,आयडेंटी आणि पॅकेजिंग, (५) इन्फॉर्मेशन डिझाइन, (६) मोशन ग्रॅफिक्स, (७) टायपोग्रॅफी, (८) वेब आणि इंटरॲक्शन डिझाइन या क्षेत्रात  करिअर संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम राजीव गांधी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट या संस्थेशी अधिस्वीकृत आहे. संपर्क -https://whistlingwoods.co.in/wwi-design/

(४) मिठीबाई कॉलेज ऑफ आर्टस येथे बीए इन मल्‍टीमीडिया ॲण्ड मास कम्युनिकेशन आणि बॅचलर ऑफ मास मीडिया हे अभ्यासक्रम करता येतात. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. हे अभ्यासक्रम केल्यावर माध्यमांमध्ये वेगवेगळया प्रकारच्या करिअर संधी मिळू शकतात. संपर्क- https://www.mithibai.ac.in

(५) के.सी.कॉलेज मुंबई येथे बॅचलर ऑफ व्होकशन इन स्पोर्ट्स ॲण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षाचाआहे. तो कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला  करता येतो. या अभ्यासक्रमात पुढील बाबींचा समावेशआहे-(१) मूलभूत संवादसंप्रेषण/कम्युनिकेशन, (२) पोषण, (३) व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे, (४) मनोरंजन व्यवसायाची ओळख, (५) क्रीडा व्यवस्थापन, (६) क्रीडा व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन, (७) व्यवसाय व्यवस्थापनात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग,(८) एकात्मिक विपणन संवाद संप्रेषण ,(९) मनोरंजन विपणन/मार्केटिंग, (१०) आशय व्यवस्थापन, (११) जाहिरात ॲण्ड ब्रँड व्यवस्थापन, (१२) क्रीडा इव्हेंट व्यवस्थापन, (१३) क्रीडा जनसंपर्क, (१४) डिजिटल मार्केटिंग, (१५) माध्यम नियोजन, (१६) पुरवठा साखळी व्यवस्थापन, (१८) ग्रॅफिक डिझाइन आणि ॲनिमेशन, (१९) व्यवसाय नियोजन, (२०) सांख्यिकी व्यवस्थापन, (२१) क्रीडा विपणन, (२२) माध्यम निर्मिती-टीव्ही, रेडियो, चित्रपट, (२३) प्रचार व्यवस्थापन, (२४) क्रीडा सेलिब्रिटी  व्यवस्थापन, (२५) व्यवसाय/ बाजार/ मार्केट संशोधन, (२६) क्रीडा मानसशास्त्र, (२७) चित्रपटांचे प्रवाह आणि तंत्रज्ञान, (२८) टीव्ही निर्मिती-बातम्या आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम, (२९) क्रीडा प्रायोजकत्व, (३०) कार्यान्वयन व्यवस्थापन, (३१) समस्या व्यवस्थापन (३२) छायाचित्रण आणि व्हीडिओ प्रॉडक्शन, (३३) रेडिओ निर्मिती, (३४) समाज माध्यमे आणि ब्रँडिंग, (३५) ओव्हर द टॉप (ओटीटी) आणि नव्या युगातील इतर डिजिटल माध्यमे, (३६) मनोरंजन जगातील प्रतिभा व्यवस्थापन, (३७) इलेक्ट्रॉनिक क्रीडा, (३८) डिजिटल जाहिराती, (३९) संघर्ष आणि समझौता.

क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्राचा वाढलेला अवकाश लक्षात घेता हा अभ्यासक्रम दोन्ही क्षेत्रात उत्तमोत्तम करिअर संधी उपलब्ध करुन देऊ शकतो. संपर्क- https://kccollege.edu.in (६) शिवनादर युनिव्हर्सिटीने बीएस्सी इन इकॉनॉमिक्स (डाटा सायंस) आणि बीकॉम इन प्रोफेशनल अकाउंटिंग हे अभ्यासक्रमसुरु केले आहेत. कोणत्याही शाखेतील १२ वी मध्ये इंग्रजी आणि गणित हे विषय घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. संपर्क-https://snuadmissions.com

(७) राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीने बीए इन सेक्युरिटी  मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला तो करता येतो. या अभ्यासक्रमात  सुरक्षा व्यवस्थापन, पोलीस प्रशासन, गुन्हेगारी शास्‍त्र, न्यायवैद्यक शास्त्र, शारीरिक ‍शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. सुरक्षा व्यवस्‍थापनच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्धहोऊशकतात. संपर्क-https://rru.ac.in/school-of-internal-security-and-police-administration-sispa/

(८) बिट्स (बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्स)‍ पिलाणी, ही आपल्या देशातील नामवंत आणि दर्जेदार खाजगी शिक्षण संस्था. ही संस्था अभियांत्रिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करत होती. गेल्या काही वर्षापासून या संस्थेने इतर ज्ञानशाखांचेही अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या संस्थेने बिट्स लॉ स्कूलची स्थापना मुंबई येथे केली आहे. या लॉ स्कूलमध्ये बीबीए एलएलबी हा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बिट्स लॉ ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली नसेल,ते एमएएच-सीइटी-एलएलबी- ५ वर्षाचा अभ्यासक्रम, या परीक्षेतील गुणांव्दारे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. अर्हता कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण.

संपर्क- https://www.bitslawschool.edu.in

(९) पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मॅनजमेंट मार्फत बीबीए हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अंतर्गत पुढील विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते-बीबीए इन (१) फिनटेक, (२) बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (२) इन्व्हेस्टमेंट बँकिंग, (३) डिजिटल मार्केटिंग ॲण्ड मीडिया मॅनेजमेंट, (४) सप्लाय चेन मॅनेजमेंट.अर्हता कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. संपर्क- www.PCU.edu.in

(१०) वेस्‍ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायंस  या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड बीएस्सी-एलएलबी वुइथ स्पेशलायझेशन  इन क्रिमिनॉलॉजी ॲण्ड फॉरेंसिक सायन्स हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेत १२ वीमध्ये ५० टक्के गुण. प्रवेशासाठी कॉमन लॉ ॲडमिशन टेस्टचे गुण ग्राह्य धरले जातात. संपर्क-w www.nujs.edu

(११) घनशामदास सराफ कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज-मुंबई या संस्थेने बॅचलर ऑफ आर्ट्स इन फिल्म, टेलिव्हिजन ॲण्ड न्यू मीडिया प्रॉडक्शन हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी

संपर्क- www.dgmc.org.in

(१२) युनिव्हर्सिटी ऑफ मद्रासने ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न युनिव्हर्सिटीशी  सहकार्य करुन बीएस्सी (ब्लेंडेड ) इन फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बॉयलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपयुक्त ठरणारा आणि संशोधन कार्यास प्रोत्साहन देणारा हा अभ्यासक्रम आहे. मेलबोर्न यु‍‍निव्हर्सिटीचे प्राध्यापक या अभ्यासक्रमाचा काही भाग शिकवतात. अभ्यासक्रम मेलबोर्न युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहे.

संपर्क-www.uom.ac.in

सुरेश वांदिले

 

Comments