१२ वीनंतर थेट व्यवस्थापक


 १२ वीनंतर थेट व्यवस्थापक

सध्याच्या काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम सुरु करण्यात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्था आघाडीवर असतात. विविध विषय घटकांचे आणि कालावधीचे अभ्यासक्रम वेगवेगळया आयआयएममध्ये सुरु केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयआयएमने, इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे पाच वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. १२ वी नंतर ज्याप्रमाणे अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखा, अभिकल्प (डिझाइन), विधि शाखेमध्ये प्रवेश घेता येतो, त्याचप्रमाणे या पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. या कालावधित विद्यार्थ्यांमधून, टेक्नोसॅव्ही आणि स्मार्ट व्यवस्थापक घडविण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते.
पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सर्वात आधी इंदोर आयआयएमने सुरु केला. त्यानंतर रोहतक, रांची, बोधगया आणि जम्मू येथील आयआयएम यांनी असा अभ्यासक्रम सुरु केला. या सर्व अभ्यासक्रमांमध्ये पहिली तीन वर्षे विद्यार्थ्यांना सर्व प्रकाराचे मूलभूत ज्ञान प्रदान करुन त्याचा पाया पक्का केला जातो. पुढील दोन वर्षे व्यवस्थापन विषयाच्या मुख्य घटकांना शिकवले जाते. या पाचही आयआयएमने तीन वर्षानंतर इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सोडून जाण्याची सुविधा दिली आहे. तथापि असे न करणेच श्रेयस्कर. कारण पाचव्या वर्षी या सर्व आयआयएममध्ये प्लेससमेंटसाठी नामांकित संस्था येतात. शंभर टक्के मुलांना प्लेसमेंट मिळून त्याचे करिअर उत्तमरीत्या मार्गी लागते. या अभ्यासक्रमांना कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
आयआयएम बोधगया -
या संस्थेने - २०२१ सालापासून इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण आवश्यक. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.
या अभ्यासक्रमातील पहिल्या तीन वर्षाचा अभ्यासक्रम हा दरवर्षी दोन सत्रांमध्ये संपवला जातो. चौथ्या आणि पाचव्या वर्षाचा अभ्यासक्रम हा दरवर्षी तीन सत्रात संपवला जातो. सहाव्या सत्रामध्ये विद्यार्थ्यास स्पेशलायझेशनचा विषय निवडता येतो. दुसऱ्या वर्षी बिझिनेस इंटर्नशीप किंवा संशोधन आधारित प्रकल्प किंवा ग्रामीण आणि सामाजिक प्रकल्प यापैकी कोणतीही एक बाब स्वीकारावी लागते.
काय शिकाल?
पहिल्या सहा सत्रांमध्ये पुढील विषय घटकांचा अभ्यास करावा लागतो- इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग, इमोशनल इंटेलिजन्स ॲण्ड माईंडफुलनेस, इफेक्टिव्ह लँग्वेज ॲण्ड कम्युनिकेशन स्किल, प्रिंसिपल ऑफ मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन टू सायकॉलॉजी, मॅनेजरिअल इकॉनॉमिक्स, बिझिनेस मॅथेमॅटिक्स, बिझिनेस हिस्ट्री, मार्केटिंग मॅनेजमेंट, आयटी मॅनेजमेंट, कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग, इत्यादी.
संपर्क - ॲडमिशन ऑफिस आयआयएम बोधगया, उरुवेला, प्रबंध विहार, बोधगया, ८२४२३४, दूरध्वनी -०६३१-२२००२३९, ईमेल- ipmadmission@iimgg.ac.in, संकेतस्थळ- iimgg.ac.in
०००
आयआयएम जम्मू
या संस्थेने इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम गेल्या वर्षी सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट इन बेसिक्स ऑफ मॅनेजमेंट हे प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट इन बेसिक्स ऑफ मॅनेजमेंट हे प्रमाणपत्र, तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना बीबीए पदवी प्रदान केली जाते. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी प्रत्येक वर्षी त्याची इच्छा असल्यास अभ्यासक्रम सोडू शकतो.
पहिल्या वर्षी लडाख येथे बूट कॅम्पमध्ये सामील होण्याची संधी दिली जाते. या शिबिरात सांस्कृतिक आणि एैतिहासिक पैलुंची ओळख आणि अनुभव प्रदान केला जातो. चौथ्या सत्रात कॉर्पोरेट इंटर्नशीप पूर्ण करावी लागते. तिसऱ्या सत्रात सामाजिक (सोशल इंटर्नशीप) पूर्ण करावी लागते.तिसऱ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेत अध्ययन करण्याची संधी मिळू शकते.
या अभ्यासक्रमात विज्ञान, समाजशास्त्र आणि व्यवस्थापन या तीन घटकांचा सुयोग्य समावेश करण्यात आला आहे. विज्ञान,तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषय घटकांशी व्यवस्थापनाच्या ज्ञान शाखेचे सुयोग्य पध्दतीने एकात्मिकरण करण्यात येते. २०२० सालातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. विद्यार्थी बौध्दिक- शारीरिक- भावनिक-कलात्मक- नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले जातात.
या अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांच्या निवडी, जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्टचे (जिपमॅट) गुण, दहावी -बारावीतील गुण आणि महिलांसाठी विशेष गुण (जेंडर डायव्हर्सिटी) सवलत याचा आधार घेतला जातो. इच्छूक विद्यार्थ्यांना दहावी-बारावी मध्ये किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण. गुणवत्ता यादी तयार करताना जीपमॅटला ६० टक्के, १०वीच्या गुणांना १५ टक्के, १२वीच्या गुणांना १५ टक्के आणि मुलींना १० टक्के गुणांचे वेटज (भारांक) धरले जाते.
संपर्क- आयआयएएम, ओल्ड युनिव्हर्सिटी कॅम्प्स, जम्मू - १८००१६, संकेतस्थळ- ipm.admissions@iimj.ac.in, ईमेल- ipm.admissions@iimj.ac.in, दूरध्वनी- ०१९१-३५१०३१५/२५८५८३७
निवड प्रकिया
बोधगया आाणि जम्मू येथील इंडियन इंस्टिट्यूट मॅनेजमेंट मधील पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ॲडमिशन टेस्ट (जिपमॅट-जॉईंट इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट) ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजंसीव्दारे घेतली जाते. परीक्षेचा कालावधी अडीच तास. ही संगणकाधारित (कॉम्पुटर बेस्ड) परीक्षा आहे.
जिपमॅट मध्ये ४०० गुणांचे १०० प्रश्न विचारले जातात. यामध्ये संख्यात्मक कल (क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड) - ३३ प्रश्न/ प्रत्येकी चार गुण/ एकूण गुण- १३२, माहिती विश्लेषण आणि तार्किक कार्यकारणभाव - डेटा इंटप्रिटेशन ॲण्ड लॉजिकल रिजनिंग- ३३ प्रश्न/प्रत्येकी चार गुण/एकूण गुण- १३२, शाब्दिक क्षमता आणि आकलन (व्हर्बल ॲबिलिटी ॲण्ड कॉप्रिहेंशन)- ३४ प्रश्न/प्रत्येकी चार गुण/एकूण गुण- १३६. उत्तर चुकल्यास १ गुण वजा केला जातो. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- मुंबई/ नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे, सोलापूर. संपर्क- jipmat.nta.ac.in
इतर राखीव जागांसोबतच आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात. प्रत्येक संवर्गात ५ टक्के जागा या दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात.
०००००००
आयआयएम रांची
या संस्थेच्या इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एमबीए पदवी प्रदान केली जाते. अर्हता - या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला १० वी आणि १२ वीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. राखीव संवर्गासाठी ५५ टक्के गुण.
प्रवेश प्रकिया
या अभ्यासक्रमाला, इंटिग्रेटेड प्रोग्रॅम मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्टमधील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा आयआयएम-इंदौर मार्फत घेतली जाते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे रिटन ॲबिलिटी टेस्ट (लेखी क्षमता चाचणी) या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड करते. त्यानंतर मुलाखती घेतल्या जातात. या दोन्ही प्रकिया दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, बेंगळुरु आणि रांची येथे पार पाडल्या जातात.
हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्णपणे निवासी स्वरुपाचा आहे. तीन वर्षानंतर एखाद्या विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमाच्या बाहेर पडावयाचे असल्यास त्याला तशी सुविधा दिली जाते. या विद्यार्थ्याला बीबीए ही पदवी प्रदान केली जाते.
काय शिकाल?-
पहिल्या तीन वर्षांमध्ये पुढील विषय शिकवले जातात - बिझिनेस मॅथेमॅटिक्स, नॅचरल सायंस, कम्युनिकेशन स्किल (ओरल आणि रिटन), इंडियन लिटरीचर, आर्ट्स ॲप्रिशिएशन, सायकॉलॉजी, मॅनेजिंग स्ट्रेस, सोशिऑलॉजी, बेसिक वर्ड/एक्सेल, क्रिटिकल थिंकिंग ॲण्ड प्रॉब्लेम सॉलव्हिंग, इंट्रॉडक्शन टू बिझिनेस, मायक्रोइकॉनॉमिक्स, इंडियन सोसायटी-व्हॅल्यूज ॲण्ड कल्चर, इंट्रॉडक्शन टू प्रोग्रॅमिंग, क्रिएटिव्हिटी ॲण्ड इनोव्हेशन, बिझिनेस इथिक्स ॲण्ड कॉर्पोरेट सोशल रिस्पाँसिबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, इन्फॉर्मेशिन सिस्टिम्स, फिलॉसॉफी, फायनांशिअल अकाउंटिंग, बिझिनेस लॉ, प्रिंसिपल्स ऑफ मॅनेजमेंट, ऑपरेशन रिसर्च, डेटा सायंस, फॉरेन लँग्वेज, मार्केटिंग मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, रिसर्च मेथडॉलॉजी, इकॉनॉमेट्रिक्स, मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनांशिअल मॅनेजमेंट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, आंत्रप्रिन्युरशीप, सेल्स/पर्सनल सेलिंग, बिझिनेस ॲनॅलिटिक्स, लेबर लॉ/ इंडस्ट्रिअल रिलेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, इंडियन इकॉनॉमी. चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी नियमित स्वरुपाच्या एमबीए अभ्यासक्रमाचेच विषय विद्यार्थ्यांना शिकवले जातात.
संपर्क- इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सूचना भवन, फिफ्थ फ्लोअर, ऑड्रे हाऊस कॅम्पस, मेउर्स रोड रांची- ८३४००८, दूरध्वनी- ०६५१ २२८०११३, संकेतस्थळ- iimranch.ac.in

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी