अर्थकारणाचे महत्व

अर्थशास्त्राने जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापले आहे. अर्थकारणातील छोट्यामोठ्या चढउतारांचा बहुसंख्य लोकांवर परिणाम होत असतो. अर्थशास्त्र आणि सामाजिक विकास यांचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे अर्थशास्त्राशी संबंधित मनुष्यबळास विविध करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात.
पॉल सॅम्युअलसॉन हे अर्थशास्त्रातील जागतिक कीर्तिचे नोबल पारितोषिक विजेते आहेत. त्यांच्यामते कोणत्याही देशाच्या विकासात अर्थकारणाचीच भूमिका सर्वाधिक महत्वाची असते. अर्थशास्त्र हे गणितीय बाबींशी संबंधित असले तरी त्यात सामाजिक शास्त्राचा मोठा भाग अंतर्भूत असतो.
सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी सांख्यिकी माहिती गोळा करुन त्याचे विश्लेषण करावं लागतं. त्यासाठी शास्त्रोक्त कार्यप्रणालीचा उपयोग करावा लागतो.
सूक्ष्म आणि दीर्घ अर्थशास्त्र
अर्थशास्त्र हे सूक्ष्म आणि दीर्घ अशा दोन प्रकारात अभ्यासले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्र व्यक्तिंचे खर्च, गुंतवणूक, बचत अशा अर्थविषयक समस्यांशी निगडित असते. याद्वारे मागणी आणि पुरवठ्यामध्ये कसे बदल होतात,याचा अभ्यास केला जातो.
दीर्घ किंवा व्यापक म्हणजेच मॅक्रो अर्थशास्त्र हे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावतील सकल उत्पन्न, उत्पादन, व्यापार, व्याजदर, चलनवाढ आदी बाबींशी संबंधित असते. मॅक्रो इकॉनॉमिक्स सकल सामाजिक आणि राष्ट्रीय अर्थकारणाचा विचार करते. व्यावसायिक विश्लेषण आणि निर्णय प्रक्रियेत मायक्रो आणि मॅक्रो अर्थशास्त्राचा हातभार लागतो.
स्पेशलायझेशन
अर्थशास्त्र या विषयांतर्गत पुढील शाखांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं.
१) ॲप्लाइड इकॉनॉमिक्स - व्यावसायिक कार्यप्रणालीमध्ये उपयोजित अर्थशास्त्राचा वापर केला जातो. सैध्दांतिक बाबींचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे या शाखेत शिकवलं जातं. त्यामुळेच या शाखेकडे अधिक विद्यार्थी वळताना दिसतात.
२) बिहेव्हिरिअल इकॉनॉमिक्स- मानवी वर्तणुकीचा अर्थविषयक निर्णयावर कसा परिणाम होतो हे शिकवलं जातं. भावनेच्या भरात घेतले जाणारे अर्थविषयक निर्णय हे तार्किकतेला फाटा दिलेले असतात. अशा निर्णयांच्या विविध पैलूंच्या अभ्यासाचे तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते.
३) डेव्हपमेंटल इकॉनॉमिक्स- विकसित आणि विकसनशील देशाच्या अर्थकारण आणि विकास प्रक्रियेला गती देणे, या घटकांचा यात समावेश होतो. आरोग्य, रोजगार, शिक्षण, सामाजिक कल्याणकारी योजना आदींच्या व्युहनीतीचा अभ्यास यात केला जातो.
४) रुरल इकॉनॉमिक्स- ग्रामीण भागातील शेतीचे अर्थकारण, मजुरांचे वेतन विषयक प्रश्न, स्थलांतर, ग्रामीण- नागरी विभाजन, उत्पन्नातील विषमता अशा विषयांचा यामध्ये अभ्यास केला जातो. त्याचबरोबर अशा समस्या निर्धारणाचे उपाय सुचवले जातात.
५) इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स- आंतरराष्ट्रीय वस्तू आणि सेवा व्यापारातील समस्या व त्यांचे निर्धारण, विविध देशांमध्ये निर्माण होणारे अर्थकारणीय ताण तणाव, त्याचे परस्पर संबंधावर व संपूर्ण जगावर होणारे परिणाम आदी घटकांचा या विषयामध्ये अभ्यास केला जातो.
६) लेबर इकॉनॉमिक्स- कामगार/मजुरांचा अर्थकारणात मोठा सहभाग असतो. कामगार/मजुरांची गुणवत्ता व दर्जा आणि त्याचा उत्पादकतेवर होणारा परिणाम, कामगार कल्याण, कामगारांच्या विविध समस्या, यांचा या शाखेत अभ्यास केला जातो.
७) मॅनेजरिअल इकॉनॉमिक्स- आर्थिक सिध्दांत, अर्थकारणातील तार्किकता, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठीचे तंत्रकौशल्य, मागणी आणि पुरवठा, स्पर्धा, संसाधनाचे वाटप आदी संकल्पनांचा अभ्यास केला जातो. व्यवस्थापकांना निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा संकल्पना, कौशल्य आणि तंत्र या अभ्यासक्रमात विषयात शिकवले जातात.
८) इकॉनॉमेट्रिक्स- या शाखेत अर्थकारणीय स्वरुपाच्या माहितीचे विश्लेषण केले जाते. या विश्लेषणाद्वारे अर्थकारणीय भाकिते केली जातात. वित्त आणि विपणन या क्षेत्रातील निर्णय आणि कार्यप्रणाली तयार करण्यासाठी साहाय्य केले जाते. डाटा ॲनॅलिटिक्स ही सध्या वेगाने उदयमान होत असलेली ज्ञानशाखा इकॉनॉमेट्रिक्सवर अवलंबून आहे.
अभ्यासक्रम
अर्थशास्त्र हे बहुतेक सर्व विद्यापीठात शिकवले जात असले तरी नामवंत आणि दर्जेदार महाविद्यालयातून हा अभ्यासक्रम केल्यास करिअरच्या संधी पदवीस्तरापासूनच उपलब्ध होऊ शकतात. अशी महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स- http://econdse.org/, मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जनरल इकॉनॉमिक्स, फायनांशिअल इकॉनॉमिक्स, अक्चुरिअल इकॉनॉमिक्स,एन्व्हिरॉन्मेन्टल इकॉनॉमिक्स या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. (http://www.mse.ac.in/). मुंबई स्थित इंदिरा गांधी इंस्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च(
) या संस्थेत एम.एस्सी इन इकॉनॉमिक्स हा अभ्यासक्रम करता येतो. पुणे स्थित गोखले इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स (http://gipe.ac.in/) येथे ॲग्रीबिझिनेस, फायनांशिएल इकॉनामिक्स या विषयात एम.एस्सी हा अभ्यासक्रम आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स फॉर इकॉनॉमिक अनॅलिसीस हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करता येतो. इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट (www.isid.ac.in) अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नवी दिल्ली स्थित इकॉनॉमिक्स ॲण्ड प्लॅनिंग (www.isid.ac.in/epu/) या संस्थेत क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स या विषयामध्ये एम.एस्सी हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
इतर काही संस्था- जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी-दिल्ली, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी-वाराणसी,गुरु नानक देव युनिव्हर्सिटी-अमृतसर, बनस्थली विद्यापीठ राजस्थान, जिवाजी विद्यापीठ- ग्वाल्हेर, जाधवपूर विद्यापीठ पश्चिम बंगाल इत्यादी.
करिअर संधी
(१) - संघ लोकसेवा आयोगामार्फत इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विषयातील पदवीधर या परीक्षेला बसू शकतात. देशाचे अर्थमंत्रालय व त्याअंतर्गत येणारे विविध विभाग, निती आयोग केंद्र शासनाचे इतर विभाग यामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च श्रेणीची पदे मिळू शकतात.
(२) आंतरराष्ट्रीय संस्था- आंतरराष्ट्रीय कामगार संस्था, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड ॲण्ड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, युनायटेड नेशन्स इंडस्ट्रिअल डेव्हपमेंट ऑर्गनायझेशन अशा संस्थांमध्ये करिअर संधी मिळू शकते.
(३) बँकिंग- सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्रातील बँका अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीधरांना स्पेशलाइज्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती करतात. रिझर्व्ह बँक सुध्दा अशा पदवीधरांना नियुक्ती करत असते. जागतिक बँक, जागतिक नाणे निधी, आशिआ विकास बँक, यामध्येही मर्यादित प्रमाणात संधी मिळू शकते.
(४) म्युच्युएल फंड कंपन्या- या कंपन्यांमध्ये गुंतवणूक निर्णय तज्ज म्हणून अर्थशास्त्र शिकलेल्या उमदेवारास संधी मिळू शकते. इक्विटी रिसर्चर, इक्विटी ॲनॅलिस्ट म्हणून संधी मिळू शकते. समभाग म्हणजेच शेअरच्या खरेदी विक्रीचे अचुक निर्णय घेण्यासाठी अशा तज्ज्ञांचा सल्ला मोलाचा ठरतो. गुंतवणुकीच्या इतर साधनांचे सल्लागार म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते.
(५) स्टॉक ब्रोकिंग कंपन्या- या कंपन्यांना समभागाचे संशोधन आणि त्याचे भविष्यातील चढ उतारांचे भाकित वर्तवणाऱ्या तज्ज्ञांची गरज भासते. त्यासाठी अशा कंपन्या अर्थशास्त्राची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना नियुक्ती देतात. काही खाजगी बँकांनी सुध्दा सध्या स्टॉक ब्रोकिंग कंपन्या उघडल्या आहेत. तिथेही संधी मिळू शकते.
(६) इतर संस्था- सेक्यिुरिटिज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया-सेबी, इंडियन बँक असोशिएशन ,नॅशनल हाऊसिंग बँक, एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडिया, स्माल इंडस्ट्रीज डेव्हलमेंट बँक ऑफ इंडिया या संस्थांना अर्थशास्त्रज्ञांची गरज भासते.
(७) अर्थविश्लेषक- अर्थविश्लेषक म्हणून स्वतंत्ररीत्या कार्य करता येते. इंग्रजी मुद्रित,इलेक्ट्रानिक आणि आता समाज माध्यमांमध्ये अशा विश्लेषकांना चांगली मागणी असते.
(८) डाटा ॲनॅलिटिक्स- व्यायसायिक संस्थांमध्ये मोठया प्रमाणावर वेगवेगळया प्रकारच्या माहितीचा साठा गोळा होत आहे. अशा माहितीचे विश्लेषण करणे, प्रवाहांचा आढावा घेणे आणि त्याबरहुकूम निर्णय घेणे यासाठी संगणकीय तंत्रकौशल्याचा वापर केला जात आहे. मनुष्यबळ विकास, विपणन, निर्मिती अशा क्षेत्रांमध्ये डाटा ॲनॅलिटिक्सची महत्वाची भूमिका बजावत आहेत. ई-कॉमर्स कंपन्या, मोठी कॉर्पोरेट हाऊसेस ,बँका यांना अशा तज्ज्ञांची नजिकच्या काळात मोठी गरज भासणार आहे.
(९) संशोधन- अर्थशास्त्र विषयात संशोधन करुन आणखी उच्चश्रेणीचे करिअर घडवणं सुलभ जाऊ शकतं.या विषयातील संशोधनाच्या संधी पुढील संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. १) नॅशनल काउंसिल ऑफ ॲप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च- नवी दिल्ली, २) इंस्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ- नवी दिल्ली, ३) इंडियन काउंसिल फॉर सोशल सायंसेस रिसर्च- नवी दिल्ली, ४) सेंटर फॉर वुमेन्स डेव्हलपमेंट स्टडीज- नवी दिल्ली, ५) इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पाप्युलेशन स्टडीज-मुंबई, ६) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ लेबर इकॉनॉमिक्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट- नवी दिल्ली, ७) सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटिज- नवी दिल्ली, ८)नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनांस ॲण्ड पॉलिसी- नवी दिल्ली.
सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी