फॅक्ट्रिचा धंदा


 फॅक्ट्रिचा धंदा

मराठवाड्यातील एका मोठ्या शहरात, एका शिकवणी वर्गाची कॅचलाईन (ठळक बाब), डॉक्टर - इंजिनीअर घडवणारी फॅक्ट्री अशी आहे. या कॅच लाईनसह मोठ-मोठे जाहिरात फलक शहरात सर्वत्र लागले आहेत. मुंबई-पुण्यासह इतरही शहरांमध्ये साधारणत: अशाच रितिने शिकवणी वर्गाच्या जाहिरातींचा मारा केला जातो.
डॉक्टर- इंजिनीअरची फॅक्ट्री आम्ही चालवतो, असे स्वत:च सांगणारे शिकवणीवर्ग विद्यार्थ्यांना एक प्रॉडक्ट किंवा उत्पादन समजतात, हे ओघाने आलेच. एखाद्या उत्पादनासाठी कच्चा माल हवा असतो. या शिकवणीवर्गाच्या दृष्टिने १२ वीतला विद्यार्थी हा कच्चा माल! या कच्च्या मालाला ते त्यांच्या कारखान्यातील यंत्रांमध्ये (पाठांतर, विविध नोट्स, दररोज किंवा आठवड्यातून होणाऱ्या चाळणी परीक्षा वगैरे) टाकणार. इथे संपले त्याचे काम. त्यांच्या मते आता डॉक्टर आणि इंजिनीअर होण्यासाठी हा विद्यार्थीरुपी कच्चा माल १०० टक्के तय्यार!
फॅक्ट्रिच्या शोधात
दुर्देव्याने अशाच फॅक्ट्रीच्या शोधात पालक दहावी किंवा त्यापूर्वीपासूनच लागतात. आजूबाजूचे, मित्रमंडळी, दूरचे, इकडचे तिकडचे नातेवाईक यांचे सल्ले घेतले जातात. मार्गदर्शन घेतले जाते. अनुभव कथनाची वेगवेगळी सत्रे पार पडतात. पालक मंडळींना फक्त कथेतच असणारा जादूचा दिवा सापडल्याचा आनंद होतो. या आनंदातच ते डॉक्टर- इंजिनीअर घडवणाऱ्या कारखान्यांकडे धाव घेतात.
लग्नसोहळ्यादी कार्यक्रमांसाठी कार्यालये सहा सहा महिन्यांपासून किंवा त्याआधीही बूक केली जातात. मंगल कार्यालयाचा व्यवस्थापक जसे, लांब चेहरा करुन सांगतो, कालच सर्वतारखा बूक झाल्या. आता शक्य नाही. बिच्चारी वर/वधूपक्षाची मंडळी गयवया करु लागताच, तो उपकार केल्याच्या नजरेने आणि भावनेने त्याच्या समोरच्या रजिस्टर किंवा सध्या टॅबवर वरखाली किंवा खालीवर पाच दहा मिनिटे बघतो, चेहरा आणखी लांब करतो आणि नकारार्थी आणि होकारार्थी असा अधला-मधला चेहरा करुन तो वर/वधू पक्षाला बघू काहीतरी, असं सांगतो. या पक्षाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. मात्र आत्ताच्या आता इतकी रक्कम भरलीतरच काहीतरी शक्य होईल, असं तो व्यवस्थापक सांगतो. अगदी असेच नसले तरी याच मार्गाने शिकवणी वर्गाचेही व्यवस्थापक पालकांशी वागतात. टॅबवर वरखाली बघून हा व्यवस्थापक शिकवणी वर्गात जागा उपलब्ध नसल्याचे सांगत सांगत, केवळ तुमच्यासाठी म्हणून,भली थोरली रक्कम भरण्याचे सांगतो. पालकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. ते शिकवणी वर्गात मुलाचा प्रवेश पक्का करतात. आता मुलगा डॉक्टर/इंजिनीअर झालाच असे समजून पालक मंडळी घरी परतात. घरीदारी उत्सव साजरा होतो. आपले नशिबच चांगले म्हणून अमूक-ढमूक-तमूक शिकवणी वर्ग-कम-फॅक्ट्रीत प्रवेश मिळाल्याच्या कौडकौतुकात बरेच दिवस जातात. मुलगाही या कौतुकाने हरखून जातो.
प्रश्न पडले पाहिजेत
अशा फॅक्ट्रीमध्ये शिकवणारे शिक्षक किंवा सर कोण आहेत? त्यांचा अनुभव काय? त्यांचे स्वत:चे शिक्षण काय? अशा खोलात जाण्याचे कष्ट बहुदा घेतले जात नाही. राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) बोर्डाच्या अभ्यासक्रमावर कितपत लक्ष केंद्रित केले जाते?संकल्पना समजावून देण्यासाठी किती वेळ देतात? प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित विषय समजून घेण्याचा खरोखरच आवाका आहे का, हे समजून घेतात का? विद्यार्थ्याची आठवी नववी पासूनची शैक्षणिक कामगिरी समजून घेतात का? किंवा साधी चौकशी तरी करतात का?
रुग्ण कसाही असो आम्ही तो बरा करणारच, असे काही डॉक्टर मंडळीचे सांगणे असते. तसाच शिकवणी वर्ग चालकांचा आविर्भाव असतो. मुलाचा बुध्द्यांक यथातथा असला तरी त्याने आमच्याकडे प्रवेश घेतला म्हणजे त्याला डॉक्टर-इंजिनीअर होण्यापासून आता कुणी थांबवू शकत नाही, असा आभास निर्माण केला जातो. या कोणत्या बाबींचा पालक मंडळी कितपत विचार करतात, हा संशोधनाचा विषय आहे.
बोर्डाची पुस्तके
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम हा शैक्षणिक बोर्डाच्या अभ्यासक्रमांवरच आधारित असतो. तो केवळ १२ वीच्या क्रमिक पुस्तकांवर नसतो ही बाब सुध्दा लक्षात घ्यायला हवी. ११वीची पुस्तकंही महत्वाची ठरतात. महाराष्ट्राच्या सीईटीमधील २० टक्के भाग ११वीच्या पुस्तकातील असतो. ही बाब कितपत पालकांना ठाऊक असते? शाळा/कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षकसुध्दा याविषयी विद्यार्थ्यांना सांगतात का, हा कळीचा विषय आहे.
महाराष्ट्र सीईटीसाठी शिकवणी लावणाऱ्या वर्गातील सर/प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणत्या साहित्याच्या आधार घेतात? ११ वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्राच्या क्रमिक पुस्तकातील प्रत्येक टॉपिक (घटक) विद्यार्थ्यांना समजावून सांगतात का? धड्याखाली असणारे संदर्भसाहित्य तरी वाचतात का? असे अनेक प्रश्न पालकांना पडायला हवे.
सीईटीचा अभ्यासक्रम सुध्दा ठरलेला असतो. त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र सीईटीचा पेपर हा दरवर्षी ठराविक साच्यातच निघेल असे नाही. अभ्यासक्रमाच्या चौकटित, विद्यार्थ्यांचे आकलन, संकल्पनांची स्पष्टता, गती, कल(ॲप्टिट्यूड) अशासारख्या बाबी समजून घेण्यासाठी प्रश्नांची रचना केली जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक घटक हा समजून घेणे व शिकवणी सरांनी तो समजावून सांगणे आवश्यक ठरते. हा घटक फार महत्वाचा, तो त्यापेक्षा कमी महत्वाचा आणि तो तर अजिबातच महत्वाचा नाही, असे सांगण्याकडे कल असतो. हे घातक आहे. शिकवणी सरांच्या मते अजिबातच महत्वाच्या नसणाऱ्या घटकांवर प्रश्न येऊ शकतात. असे प्रश्न आले की विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. मग बरेचदा अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न आले, अशी हूल उठवली जाते.
११ वी आणि १२वीच्या भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र,गणित आणि जीवशास्त्र या विषयांच्या बोर्डाच्या पुस्तकांमध्ये असलेल्या अनुक्रमणिकेचा शब्द न शब्द विद्यार्थ्याने वाचायला हवा. म्हणजे नेमके या पुस्तकात त्याला काय शिकायचे हे लक्षात येऊ शकते. प्रत्येक धड्याचे पान त्याने उलटायला/वाचायला हवे. धड्यातील उपशीर्षके कोणती, चौकटी कोणत्या, महत्वाचे किंवा हे लक्षात ठेवा, असे काही नमूद आहे का हे लक्षात घ्यायला हवे.
शिकवणी सर, किती विद्यार्थ्यांना बोर्डाची क्रमिक पुस्तके वाचून काढा नि समजत नाही ते विचारा असे सांगतात? पालकांनी सुध्दा विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके वाचण्याचा आग्रह धरला पाहिजे. शिकवणी वर्गाच्या नोट्‌स वाचणार की क्रमिक पुस्तकांचे धडे वाचण्यात वेळ घालवणार असला, प्रश्न त्यांना पडू नये. हे धडेच मुख्य पाया असतात हे समजून घ्यायला हवे. हा पायाच भुसभूशित राहिल्याने शिकवणी वर्गाचे नोटस कितीही उच्च दर्जाचे असले तरी विद्यार्थ्याची इमारत भक्कमपणे उभी राहील असे ठामपणे सांगता येत नाही.
ठोकताळे आणि यांत्रिकीपणा
शिकवणी सर त्यांच्या ठोकताळयाप्रमाणे शिकवतात. त्यात यांत्रिकीपणाही असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी कोणत्या, हे ते लक्षात घेत नाहीत. शिकवणी वर्गात जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा काही समान बुध्दीमत्तेचा असत नाही. ते शक्य नाही. पण सारेच विद्यार्थी समान बुध्दीमत्तेचे आणि एकसारख्या आकलन क्षमतेचे असल्याचे गृहीत धरुन शिकवणी सराची यांत्रिक गाडी सुसाट पळत राहते. या गाडीच्या वर कोण आलय, खाली आलेय कोण हे बघण्याची तसदीही ते घेत नाहीत. दररोजची चाचणी, आठवड्यातील चाचणी ,महिन्याची चाचणी घेतली, त्याचे गुण कळवले,त्यासाठी संगणकीय पॉवर पाईंटच्या स्वरुपातील रंगीबेरंगी ग्राफ काढून विद्यार्थ्यांचा कथित प्रगतीचा कागद डकवला की (अपवाद वगळता) कर्तव्य संपले अशी साधारणता कार्यशैली असते.
अशा चाळणीपरीक्षांच्या गुणांवरुनही बरेच मुलाचा घोडा कुठपर्यंत धावू शकतो, हे स्पष्ट होऊ लागते. ते स्पष्टपणे सांगण्याचे कष्ट घेतले जात नाही. एकदा शिकवणी वर्गात मुलाला टाकले की पुढे फारसे खोलात जायचे नाही ही पालकांची वृत्ती असल्याने, शिकवणी सरांचे फावत असते.
मुलांच्या संकल्पना स्वयंस्पष्ट असल्याशिवाय, विद्यार्थ्यांना वैद्यकीय, इंजिनीयरिंगच नव्हे तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळणे शक्य नाही ही बाब पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रारंभापासूनच समजून घ्यायला हवी. जे विद्यार्थी हे समजून घेण्याची तसदी घेत नाहीत एक तर त्यांना अपयश मिळते किंवा यथातथा शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळू शकतो. त्याचाच जर आनंद वाटून घ्यायचा असेल तर अशा फॅक्ट्रींचा धंदा जोरात चालणारच.
सुरेश वांदिले
May be an image of 1 person

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी