संधी असल्या तरी...भाग एक
संधी असल्या तरी...भाग एक
१०वी
आणि १२ वीनंतर आणि विशेषत: १२ वीनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा मिळते व त्याच्या
पुढील जीवनालाही दिशा मिळत असते. आपल्याकडील बहुतेक विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनीअर
किंवा मग सीए व्हावे वाटते. त्यात काही गैर नाही. पण प्रत्येक जण काही डॅाक्टर, इंजिनीअर
किंवा सीए बनू शकत नाही. मग अशा मुलांनी काय करायचे. त्यांना करिअरच्या संधी नाहीत
का?
प्रत्येक
विद्यार्थ्यासाठी करिअरच्या संधी आहेत. वेगवेगळया ज्ञानशाखांमध्ये कौशल्य निर्मिती करणारे अभ्यासक्रम भारत सरकार आणि राज्य
सरकार आणि काही महत्वाच्या खाजगी संस्थांनी
सुरु केले आहेत. या अभ्यासक्रमांना मुलांनी
प्रवेश मिळवला किंवा घेतला तर त्याचे करिअर निश्चितपणे उत्तमरित्या घडू शकते.
करिअर
मार्गदर्शनाच्या मुंबईतील एका कार्यक्रमात मला उपस्थित राहण्याची नुकतीच संधी मिळाली
होती. यावेळी मी विद्यार्थ्यांना दोन तीन प्रश्न विचारले. त्यांच्या हिताच्या गोष्टींची
कितपत माहीती आहे, हे जाणून घेण्यासाठी मी हे प्रश्न विचारले होते. तेथे उपस्थित एकाही
विद्यार्थ्याला या प्रश्नांची उत्तरे ठाऊक नव्हते. त्यातला एक प्रश्न होता- सीयूईटी-यूजी
म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर केवळ दोन विद्यार्थ्यांना ठाऊक असल्याचे दिसून आले.
सीयूइटी-यूजी
म्हणजे, कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स एक्झामिनेशन-अंडर ग्रॅज्युएट. ही परीक्षा आपल्या
देशातील जवळपास ४० सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील पदवीस्तरीय वेगवेगळया अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी घेतली जाते. या सर्व सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये कौशल्य वाढवणारे अनेक
व्होकेशनल अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.पाच वर्षे कालावधीचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम
सुरु करण्यात आले आहे. ते विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील आहेत. या सर्व संस्थांमध्ये
प्लेसमेंट सेल आहेत. ही परीक्षा मराठीसह १३
भाषांमधून देता येते.
१२
वींनतर वेगवेगळया करिअर संधी कोणत्या? असा प्रश्न बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना
पडत असतो. या प्रश्नाचे उत्तर या सेंट्रल युनिर्व्हसिटींच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे.
या एका परीक्षेव्दारे आाठ ते दहा विद्यापीठांमधील तुमच्या आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश
मिळवू शकता. दुर्देव्याने यावर्षी या परीक्षेला बसणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या
समाधानकारक नाही. या परीक्षेला सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्यातून बसली. ज्या राज्याला
वेगवेगळया कारणांनी दोष दिला जातो, त्या राज्यातील पालक आणि विद्यार्थी महाराष्ट्रासारख्या
स्वत:ला शैक्षणिक दृष्ट्या जागरुक समजणाऱ्या राज्यापेक्षा अधिक जागरुक असल्याचे दिसून
येते.
त्यामुळे
यंदा जे विद्यार्थी १२ वीत आहेत. त्यांनी सीयूईटी-यूजी या परीक्षेचा महत्वाचा पर्याय
लक्षात ठेवावा. शिक्षक आणि पाालकांनी त्यांनी सुध्दा ही बाब आतापासूनच मनात आणि डायरित
नोंदवून ठेवावी.
अशाच
अनेक करिअरपर्यांबाबतची मराठी मुले आणि पालकांची अनास्था ही अनाकलनीय अशीच आहे.
हसण्यामागचे
रहस्य
रस्त्यावरुन
जाता येताना आपल्यापैकी प्रत्येकास वेगवेगळया कंपनीच्या जाहिरातींचे मोठमोठे होर्डिंग्ज
किंवा जाहिरात फलक सर्वांना आकर्षित करतात. सध्या बाटा कंपनीचे एक होर्डिंग असेच सगळयांचे
लक्ष वेधून घेत आहे. या होर्डिंगवर अभिनेत्री दिशा पाटणी हसून आणि अभिनेता कार्तिक
आर्यन उड्या मारत आपलं लक्ष वेधून घेतात. हे दोघेही बाटा कंपनीच्या जोडे/चप्पल यांची
जाहिरात करत असतात. पण तो काही मुख्य उद्देश नाही. बाटा कंपनीने मागच्या सहा महिन्यात
किंवा नव्या हंगामात कोणकाणत्या नव्या डिझाइन्सचे जोडे, चप्पल, सँडल्स मार्केटमध्ये
आणले याची माहिती आपणास व्हावी आणि दिशा पाटणीचे हसू आणि कार्तिक आर्यनच्या उड्या बघून
ही नवी डिझाइन्सची पादत्राणे आपण विकत घेण्यासाठी बाटाच्या दुकानाकडे वळावे, हा असतो,
मुख्य उद्देश!
हे
नवे नवे डिझाईन्स कोण तयार करतात? असा प्रश्न कधी विद्यार्थ्यांच्या मनात आला आहे का?
पादत्राणे किंवा फूटवेअर डिझाइन ही विकसित झालेली स्वतंत्र अशी ज्ञानशाखा आहे. या शाखेचे
शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट
ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेने बॅचरल ऑफ फुटवेअर डिझाइन ॲण्ड प्रॉडक्शन हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम
सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील १२ वी झालेल्या विद्यार्थ्याला करता
येतो.

Comments
Post a Comment