प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजना


 

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजना

वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा सारख्या  व्यावसायिक अभ्यासक्रमांचं उच्च शिक्षण घेताना गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजा भागवणं बऱ्याचदा कठीण जातं. त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी  , प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजना ही योजना सुरु करण्यात आली.या योजनेंतर्गत संबंधितांना अर्थसहाय्य केलं जातं. ही योजना केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत राबवली जाते.

शिष्यवृत्तीच्या निवडीसाठी १२ वीमध्ये मिळालेल्या गुणांचा आधार घेतला जातो. दरवर्षी ८२ हजार शिष्यवृत्ती मंजूर केल्या जातात. प्रत्येक राज्यातील १८ ते २५ वर्षे वयोगटाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात या शिष्यवृत्ती राज्या -राज्यांमध्ये विभाजित केल्या जातात. यापैकी ५० टक्के शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहेत.

अटी आणि शर्ती

() संबंधित विद्यार्थीनीस १२ वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळायला हवे. () मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील नियमित स्वरुपाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असावा.() दूरस्थ, पत्रव्यवहार आणि पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात नाही. () इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा किंवा शुल्कमाफीचा किंवा शुल्क परतावा रक्कमेचा लाभ घ्यायला नको. () पालकांचं वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक नसावं. सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेला उत्पनाचा दाखला सादर करावा लागेल. () शिष्यवृत्तीचं दरवर्षी नूतनीकरण करावं लागेल. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र संबंधिताला वार्षिक परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत आणि हजेरी ७५ टक्के असावी. () या शिष्यवृत्तीमध्ये पुढीलप्रमाणे राखीव जागा आहेत - इतर मागास प्रवर्ग २७ टक्के, अनुसूचित जाती-१५ टक्के, अनुसूचित जमाती -७.५ टक्के, दिव्यांग ५ टक्के. () अर्ज ऑनलाईनच करावा लागतो. () जातप्रमाणपत्र ,शैक्षणिक अर्हता, उत्पन्नाचा दाखला यांची पडताळणी केल्यावरच अर्ज स्वीकृत होतो. अर्जाची पडताळणी, ज्या संस्थेत उमेदवाराने प्रवेश घेतला आहेत तिथे आणि नंतर राज्यशासनाने ठरवून दिलेल्या संस्थे (नोडल एजंसी) मार्फत दुसऱ्यांदा केली जाते.

‍शिष्यवृत्तीचे स्वरुप

पदवी अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती वार्षिक १२ हजार रुपये असून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी २० हजार रुपये आहे.  पाच वर्षे कालावधीच्या व्यावसायिक किंवा इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षी २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. बी.टेक आणि बी.ई अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षी २० हजार रुंची शिष्यवृत्ती दिली जाते.

शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्याने बँक खातं उघडणं आवश्यक ठरतं. हे खातं आधारकार्डशी संलग्न केलेलं असावं.

योजनेसंदर्भात काही तक्रारी असल्यास त्या http://pgportal.gov.in/grievancenew.aspx  या पोर्टलवर नोंदवता येतात.

संपर्क- सेक्शन ऑफिसर, नॅशनल स्कॉलरशीप डिव्हिजन डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, वेस्ट ब्लॉक १, दुसरा माळा, विंग सहा, आर. के. पूरम, सेक्टर १, नवी दिल्ली- ११००६६, दूरध्वनी- ०११-२०८६२३६०, ईमेल-  es3.edu@nic.in संकेतस्थळ -www.scholarships.gov.in

सुरेश वांदिले

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी