डिजिटल खेळ
डिजिटल खेळ
संगणकीय
खेळ विकसित करणे (गेमिंग डेव्हलपमेंट) हे नवे क्षेत्र असूनही गेल्या वर्षी या क्षेत्रात २५ हजाराच्या आसपास
करिअर संधी निर्माण झाल्याचे एक्सफेनो या कंपनिने निदर्शनास आणले आहे. स्पेशॅलिस्ट
मनुष्यबळाच्या रोजगाराच्या संदर्भात कार्यरत करणारी ही कंपनी आहे. २०२४ पर्यंत
भारतातील गेमिंग इंडस्ट्रीची वार्षिक उलाढाल २५० बिलियन डॉलर्स पर्यंत जाण्याची
शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतात सहजतेने उपलब्ध होणारे
स्मार्ट फोन, मोबाईल इंटरनेटचा वाढता वापर, टॅबेलट्स आणि गेमिंग ॲप्सचा वाढलेला
वापर यामुळे भारतात गेमिंगचे क्षेत्र झपाट्याने विस्तारित आहे. गेल्या काही वर्षात
अँड्रॉइड, वेब, आयओएस आणि संगणकासाठी २५० पेक्षा अधिक डिजिटल गेम दाखल झाले आहेत.
जपान, उत्तर अमेरिका, युरोप आदी देशांमध्ये या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळास
मोठी मागणी आहे.
ई
स्पोर्ट्स आणि आणि मोबाईल वरील खेळांची लोकप्रियता वाढल्याने या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी निर्माण
झाल्या आहेत. तथापि गेमिंग आणि गेम डेव्हलपमेंट या दोन भिन्न बाबी असल्याचे, या
क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवायला हवे. गेमिंग हा केवळ
मनोरंजनाचा प्रकार असून गेम डेव्हलपमेंट मात्र अथक परिश्रम करावयास लावणारे,
सर्जनशील क्षेत्र आहे. या क्षेत्रात प्रगतीसाठी सहनशीलता, सुयोग्य संधी आणि
उच्चप्रतिचे कौशल्य आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या संस्थेमधून गेम डेव्हलपमेंटचा
अभ्यासक्रम केल्याबरोबर लगेच मोठ्या संधी मिळतील असे सांगता येत नाही.
गेम
डेव्हलपमेंट उद्योगासाठी, डिझायनर, प्रोग्रॅमर आणि आर्टिस्ट यांची गरज भासते. या
क्षेत्रातील डिझायनरला मानवी भावभावना यांची चांगली जाण असणे अपेक्षित असते तसेच
त्याला अभिकल्प म्हणजेच डिझाइनच्या मूलभूत संकल्पना माहीत असणे गरजेचे असते.
प्रोग्रॅमिंग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिस संहिता लेखन (कंटेट रायटिंग), कोडिंगची भाषा, विज्ञान आणि
गणिताचेही ज्ञान असणे आवश्यक ठरते. आर्टिस्ट क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या टू डी आणि
थ्रीडी कला आणि त्यांच्या निर्मितीचे ज्ञान अपेक्षित आहे. गेम डेव्हलपमेंटच्या
अभ्यासक्रमामध्ये या तिनही विषय घटकांचे ज्ञान संबंधित उमेदवारांना प्रज्ञान केले
जाते. तसेच या विषय घटकांच्या तंत्रकौशल्याची माहिती करुन दिली जाते. या विषय
घटकांमध्ये गेम लेव्हल डिझाइन, यूआय/यूएक्स डिझाइन, प्रोग्रॅमिंग, टूडी/थ्री डी
आर्ट, निर्मिती यांचा प्रामुख्याने समावेश असतो.
ई
स्पोर्ट्स कडे भारतातील २५ वर्षे वयोगटातील लाखो तरुणांचा मोठा ओढा असल्याचे दिसून
आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यकाळात अधिकाधिक संधी निर्माण होतील असा कयास
करण्यास हरकत नाही. भारतीय संस्कृती, मूल्ये आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब
असणाऱ्या देशी डिजिटल गेमिंगचा विकास करण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे.
त्या अनुषंगाने शिक्षण मंत्रालामार्फत निश्चितपणे मोठी पावलं पुढील काळात उचलली
जातील.
संस्था आणि अभ्यासक्रम
(1) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) या संस्थेने पदव्युत्तर पदवी स्तरावर मास्टर
ऑफ डिझाइन इन डिजिटल गेम डिझाइन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा या क्षेत्रातील
सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम समजला जातो. विद्यार्थ्यांच्या सजर्नशीलतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या
अभ्यासक्रमातील विषय घटक शिकवले जातात. हा अभ्यासक्रम केलेल्या सर्व उमेदवारांना
उत्तमोत्तम संधी प्राप्त झाल्या आहेत. हा अभ्यासक्रम आंतरज्ञानशाखीय स्वरुपाचा
असून यात संगणकीय तंत्र, कला, सौंदयपूर्ण अभिकल्प, सामाजिक आणि ज्ञानप्रकिया समजून
घेण्याची प्रकिया या घटकांचा अध्ययनात समावेश करण्यात येतो. विद्यार्थ्यांचे संवाद
कौशल्य, समूहात काम करण्याची सक्षमता, सर्जनशील आणि टीकात्मक वैचारिक क्षमता आणि
विविध समस्यांच्या निर्धारणाचे कौशल्य हे गुण विकसित होण्यासाठी प्रयत्न केले
जातात.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमात डिजिटल मीडिया, डिजिटल
आर्ट, गेमिंगचा इतिहास आणि सैध्दांतिक बाबी, टूडी आणि थ्रीडी ग्रॅफिक्स, मॉडेलिंग,
स्टोरी टेलिंग ॲण्ड नॅरेटिव्ह आर्किटेक्चर (कथानकाची मांडणी आणि बांधणी), यूझर इंटरफेस डिझाइन (वापरकर्त्यासाठी सुलभ
अभिकल्प), गेम डिझाइन, ऑनलाइन गेम, कॅज्युअल गेम, मॅसिव्हली
मल्टी प्लेअर गेम (असंख्य खेळांडूसह खेळला जाणार खेळ), या विषय घटकांचा समावेश आहे. डिजिटल गेमची निर्मिती, व्हिज्युअल डिझाइन,
गेमचे विश्लेषण, विविध प्रकारच्या गेमचा
अभ्यास, संस्कृती आणि कला, चित्रपट आदी विषय घटकांचे ज्ञानसुध्दा विद्यार्थ्यांना
प्रदान केले जाते. विद्यार्थ्यांना गेम निर्मिती-विकास-परीक्षण आणि डिझाइनच्या
संपूर्ण प्रकियेमध्ये सामावून घेतले जाते. या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक गेम
डिझायनर्स आणि आर्टिस्ट यांच्याकडून महत्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले जाते. या
प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना गेम डिझाइनसाठी आवश्यक असलेले तंत्र आणि कौशल्य यात
पारंगतता मिळवणे शक्य होऊ शकते. वेगवेगळया सॉफ्टवेअर आणि गेम इंजिनचा उपयोग करुन
गेम डिझाइन करण्याची कला शिकवली जाते. आंतरसंवादीय डिजिटल कथाकथन, दृष्यात्मक
परिणाम आणि चलत रेखाटने, टूडी आणि थ्रीडी भूमिकांचे ॲनिमेशन, डिजिटल गेमसाठी
संहिता लेखनाचे तंत्र, गेम डिझाइन मधील सौंदर्यतत्वे, संगीत आणि ध्वनीची निर्मिती,
प्रत्यक्ष गेमचे कार्यान्वयन आणि त्याची प्रतिकृती आदी बाबीही शिकवल्या जातात.
डिझाइन मॅनेजमेंट (अभिकल्प व्यवस्थापन),
संशोधन कार्यपध्दती, सामाजिक शास्त्रे आदीबाबतही ज्ञान प्रदान केले जाते. गेमिंग
उद्योग, मनोरंजन उद्योग आणि दृष्यात्मकता (व्हिज्युअलायझेशन) या क्षेत्रात समर्थपणे करिअर करता यावे याअनुषंगाने विद्यार्थ्यांना
प्रशिक्षित केले जाते.
या अभ्यासक्रमाचा कालावधी अडीच
वर्षांचा आहे. प्रवेशासाठी एनआयडी मार्फत घेतली जाणारी चाळणी परीक्षा द्यावी
लागते. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधराला प्रवेश मिळू
शकतो.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन,
पालडी, अहमदनगर- ३८०००७, दूरध्वनी-०७९-२६६२९५००, ईमेल-academic@nid.edu,
संकेतस्थळ- nid.edu
याच संस्थेत, ॲनिमेशन फिल्म डिझाइन हा
चार वर्षे कालावधीचा पदवीस्तरीय अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाला कोणत्याही
ज्ञानशाखेतील 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. मात्र त्याला एनआयडी मार्फत
घेण्यात येणारी चाळणी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. ॲनिमेशन क्षेत्राची
झपाट्याने वाढ होत असल्याने हा अभ्यासक्रम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नामवंत
कंपन्यांमध्ये तत्काळ रोजगाराच्या संधी मिळतात. ॲनिमेशनच्या जागतिक प्रभावातून
भारतीय ॲनिमेशन उद्योग बाहेर पडला असून भारतीय मातीतल्या मूळ कल्पनांचा वापर
ॲनिमेशनमध्ये करण्याकडे कल वाढत चालल्याचे दिसून येते. भारतीय ॲनिमेशनला आता
जागतिक स्तरावर सुध्दा मान्यता मिळू लागली आहे. या क्षेत्राची वाढ लक्षात घेता
त्यासाठी आवश्यक असणारे संहिता लेखक, ॲनिमेटर्स (चित्रकर्ते) यांची मागणीही वाढत आहे. या अभ्यासक्रमात जागतिक आणि भारतीय संकल्पनांचा
सुयोग्य समावेश करण्यात आला आहे. ॲमिनेशन तंत्र कौशल्य शिकवण्याआधी
विद्यार्थ्यांना अभिकल्पाचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे
विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रक्रिया अधिक खुल्या होतात. त्यांना विषयाचा आवाका
लक्षात येण्यासही साहाय्य होते. या अभ्यासक्रमाचा भर हा प्रात्यक्षिके आणि प्रकल्प
कार्य यावर आहे. विद्यार्थ्यांना टूडी, थ्रीडी, मातीपासून प्रतिकृती बनण्याची कला,
बहुमाध्यमांचा उपयोग करण्याचे तंत्र, चित्रात्मक कथन तंत्र आदी बाबींचे ज्ञान
प्रदान करुन विविध प्रकारातील ॲनिमेशन कथाकथन करण्यात पारंगतता मिळण्यासाठी
साहाय्य केले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना चॅनेल व्ही, एमटीव्ही,
निककेलॉडिऑन, कार्टून नेटवर्क, टाटा इंटरॲक्टिव्ह , इंफोसीस, कॉग्निझंट अशा
सारख्या नामवंत संस्थांमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर, प्रोड्युसर, ॲनिमेटर, कॅरेक्टर
डिझायनर, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, कंसलटन्ट, अशा संधी मिळाल्या आहेत.
एमआयटी इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन- या संस्थेत गेम डिझाइन या विषयातील पदवीस्तरीय अभ्यासक्रम
करता येतो. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम
करता येतो. या अभ्यासक्रमात गेम आर्ट, डिझाइन आणि प्रोग्रॅमिंग/ निर्मिती, संकल्पा
अभिकल्प, पर्यावरणीय अभिकल्प, टूडी कला, थ्रीडी कला, गेमिंगची व्युहनीती, कथाकथन
यावर भर देण्यात येतो. सैध्दांतिक बाबींसोबतच प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो.
हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना आर्ट डायरेक्टर, कंसेप्ट डिझायनर,
एन्व्हीरॉन्मेंटल डिझायनर, गेम डि-कोडर, लेव्हल डिझायनर, गेमिंग आर्टिस्ट, गेम
टेस्टर, गेम डेव्हलपर अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात. संपर्क- एमआयटी
इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोनी-काळभोर, पुणे-४१२२०१, दूरध्वनी- ०२०-३०६९३६००, संकेतस्थळ-mitid.edu.in, ईमेल- admissions@mitid.edu.in
०००

Comments
Post a Comment