कृषी उद्योग व्यवस्थापक


 

कृषी उद्योग व्यवस्थापक 

 भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. करोना काळातही इतर अनेक क्षेत्रांनी हाय खाल्ली असली तरी शेतीचे उत्पादन समाधानकारकच नव्हे तर काही राज्यात विक्रमीसुध्दा झाले. भारताच्या एकूण सकल उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा १६ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. कृषी क्षेत्राला अधिक उर्जितावस्था देण्याचे काम कृषीआधारित उद्योगांनी केले आहे.भारत हा कृषी उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

व्यवसायिकरणावर भर

अन्न हीच मनुष्याची सर्वाधिक महत्वाची आणि मोठी मूलभूत गरज असल्याने या क्षेत्राच्या व्यवसायिकीकरणाकडे अधिकाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे अधिक उत्पादन आणि त्याचे सर्वदूर वितरण यावर जगातील सर्व प्रमुख देशांनी लक्ष केंद्रित केले आहे. भारतामध्ये या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अपरिमित संधी असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्य सरकारे व खाजगी क्षेत्राने कृषी क्षेत्राच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष पुरवले आहे.

कृषी व्यवस्थापन

जागतिक व्यापार संस्थांचे नियम आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता यामुळे कृषी आधारित उद्योग/व्यवसायाच्या व्यवस्थापनास महत्व मिळत आहे.

कृषी आधारित उद्योग क्षेत्रातील व्यवस्थापन तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट लखनौसह देशातील काही महत्वाच्या संस्थांनी, एमबीए इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या उद्योगाच्या सुयोग्य व्यवस्थापन व्युहनीतीसाठी  या प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे.

अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये-

() कृषी आधारित व्यवसाय/उद्योग वाढीसाठी आवश्यक नेतृत्व/ उद्योजकांची निर्मिती व्हावी. त्यांना या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक अशी दृष्टी, कौशल्य आणि समज मिळावी या अनुषंगाने या अभ्यासक्रमात विषय घटकांचा समावेश करण्यात आला आहे. () एमबीएच्या पहिल्या वर्षामध्ये नियमित स्वरुपाच्या एमबीएसाठी विषय शिकवले जातात मात्र दुसऱ्या वर्षी कृषी-व्यवसाय/उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे विषय शिकवले जातात. () नामवंत एमबीए महाविद्यालयातील ॲग्री- बिझिनेस व्यवस्थापन शाखेच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून प्लेसमेंट मिळाले आहे. () या क्षेत्रातील व्यवस्थापकांना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगली वेतनवाढ दिली जात असल्याचे दिसून येते.

काय शिकाल?

या अभ्यासक्रमात ढोबळमानाने पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे- () कृषी आणि खाद्दाने धोरण, () कृषीक्षेत्रासाठी लागणारे वित्त, () कृषी उत्पादनांचे विपणन (मार्केटिंग), () अन्नपदार्थांच्या विपणनासाठी व्युहनीती, () कृषी-उद्योग प्रकल्पांचे व्यवस्थापन, () बाजाराचे संशोधन (मार्केट रिसर्च) आणि माहितीची कार्यप्रणाली, () आंतरराष्ट्रीय कृषी-अन्न व्यापार, () कृषी व्यवसायाच्या अनुषंगाने मूल्य साखळी व्यवस्थापन, () कृषी उद्योगासाठी लागणारी सर्जनशीलता

नावीन्यता, ज्ञान, उद्योजकतेचे कौशल्य, विविध प्रकारच्या संबंधांची साखळी (नेटवर्किंग), (१०) अन्न आणि कृषी उद्योगासंदर्भात आंतरराष्ट्रीय व्युहनीती आणि आंतरराष्ट्रीय संस्था, (११) सूक्ष्म वित्त व्यवस्थापन, (१२) अन्न पुरवठा साखळी व्यवस्थापन, (१३) क्षमता वृध्दीचे विश्लेषण आणि क्षमता बांधणी, (१४) सार्वजनिक धोरण, (१५) सामाजिक उद्योजकता- सामाजिक बदलासाठीचे नावीन्यपूर्ण उपक्रम ,(१६) विक्री आणि वितरण व्यवस्थापन, (१७) कृषीव्यवसाय उद्योजकता , (१८) कृषी व्यवसायासाठीचे नेतृत्व कौशल्य, (१९) अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि दर्जाचे अर्थशास्त्र, (२०) कृषी व्यापार व्यवस्था आणि मूल्यनिर्धारण, (२१) भांडवली बाजारात कृषी आधारित व्यवसायाचे स्थान, (२२) कृषी आधारित उपयोजित व्यापार आणि धोरणाचे विश्लेषण, (२३) स्थैर्याचे व्यवस्थापन, (२४) उर्जा व्यवसायाचे व्यवस्थापन.

हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची कृषी व्यवसायाच्या वाढ-विकास-समृध्दी आणि स्थैर्यासाठी लागणारे सैध्दांतिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते.

रोजगार संधी

या क्षेत्रात रोजगाराची संधी देणाऱ्या महत्वाच्या संस्था- () गोदरेज ॲग्रोव्हेट, () पीआय इंडस्ट्रीज, () पायोनिअरिंग व्हेंचर्स, () निन्जाकार्ट, () वेकूल, () आयएनआय फार्म्स, () रिलायन्स फ्रेश, () केपीएमजी, () एचयूएल, (१०) ॲमाझॉन, (११) ओलॅम, (१२) डोव ॲग्रोसायन्स, (१३) ड्यू पॉईंट, (१४) मोन्सॅन्टो, (१५) सिनजेंटा, (१६) एबी ॲग्री, (१७) एडीएम-बियाणे वाहतूक आणि प्रकिया, (१८) जॉन डेरे-कृषी संयंत्रे निर्मिती, (१९) ओशन स्प्रे-शेतकऱ्यांची सहकारी संस्था.

कृषी व्यवसाय/ उद्योगातील स्टार्टअप्समध्ये ही मोठ्या संधी मिळायला सुरुवात  झाली आहे. बियाणे उत्पादन,कृषी सयंत्रे आणि उपकरणांची निर्मिती अशा  प्रकारच्या शेतीशी संबधित  विविध कंपन्या/उद्योग आणि व्यवसायांमध्ये करिअर संधी मिळू शकते. यामध्ये पशूखाद्द, कृषी रसायने, कुक्कूट पक्षांचे खाद्य, अन्न प्रकिया उद्योग, दुग्धजन्य पदार्थ प्रकिया उद्योग, फळे आणि भाजिपाला प्रकिया, मांस प्रकिया, किरकोळ विक्री उद्योग, वित्तीय सेवा, खाजगी क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सूक्ष्म वित्त बँक, कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात कार्यरत नॉन बॅकिंग फायनांशिअल कंपन्या, कृषी साठवणूक गृहे/केंद्रे, कमोडिटी ट्रेडिंग क्षेत्र, कृषी निर्यात केंद्रे, ई-कॉमर्स, संशोधन, सहकारी संस्था आणि फार्मर प्रोड्यूसिंग ऑर्गनायझेशन, सल्लागार आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्या.

 वेगळ्या कौशल्याची गरज

नियमित स्वरुपाचे व्यवस्थपकीय तंत्र आणि कौशल्यापेक्षा कृषी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रासाठी आवश्यक वित्त/ विपणन/ निर्मिती/ उत्पादन कौशल्य  व तंत्रे, अनेक बाबतीत वेगळी असतात. कृषी क्षेत्रामधील गुंतवणुकीचा कालावधी मोठा असतो. उत्पादन येण्याचा कालावधी मोठा असतो. कृषीमालाचे संरक्षण आणि सुरक्षेचे विविध प्रश्न भेडसावतात. निसर्गाचा कोप कधी होईल हे सांगता येत नाही.

या व्यवसायामध्ये कृषी आणि तत्सम क्षेत्रातील उत्पादन, कृषी रसायने, वितरण, शेतीसाठीची संयत्रे आणि उपकरणे, प्रकिया, बियाणांचा पुरवठा, निर्यात-आयात, वित्त व्यवस्थापन, विक्री, पुरवठा साखळी व्यवस्थापन, करनिर्धारण, व्यापार या विषय घटकांचा समावेश होतो. या प्रत्येकासाठी वेगवेगळी सैध्दांतिक कौशल्ये वापरावी लागतात. नियोजन आणि त्याचे प्रत्यक्ष उपयोजन यामध्ये बराच कालावधी जाण्याची शक्यता असते. या कालावधीत बाजाराची दिशा आणि दशा यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वानिकी (फॉरेस्ट्री) या घटकाचा कृषी आधारित उदयोग/व्यवसायात समावेश होतो. या क्षेत्रात अनेकवेळा ३० ते ३५ वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. दीर्घ मुदतीच्या उत्पादन चक्रामुळे मूल्य निर्धारणावर मर्यादा येऊ शकतात. गेल्या वर्षी मिळालेले मूल्य यंदा मिळेल असे ठामपणे सांगता येत नाही. कृषी उत्पादन वाढीसाठी घेतलेले लघुमुदतीचे व्यवस्थापकीय निर्णय हे विक्री योग्य उत्पादनात लघु कालावधीसाठी वाढ किंवा घट करु शकतात. याचा थेट परिणाम गुंतवणुकीवर होतो.

या सर्व बाबींचा साकल्याने विचार करुन ॲग्री-बिझिनेस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची, या क्षेत्रातील आव्हाने स्वीकारण्याची मनोभूमिका सक्षमरित्या तयार केली जाते.

 

टॉप टेन संस्था

कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या देशातील १० सर्वोच्च श्रेणीच्या संस्था. (ही क्रमवारी वेगवेगळया संस्था/व्यावसायिक नियतकालिकांव्दारे करण्यात येणारे सर्वेक्षण/ नॅशनल इंस्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क/ विद्यार्थी आणि उद्योजक/ व्यावसाकियांचा ओढा/ प्लेसमेंट इत्यादी अशा सारख्या बाबींवर आधारित आहे.)

() आयआयएम अहमदाबाद- एमबीए इन फूड ॲण्ड ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट, () आयआयएम लखनौ-पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट, () केआयआयटी स्कूल ऑफ रुरल मॅनेजमेंट-भूवनेश्वर- एमबीए इन ॲग्री बिझिनेस,() नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल एक्सटेशन मॅनेजमेंट (मॅनेज)-हैदराबाद- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्रीबिझिनेस मॅनेजमेंट, () इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमें-भोपाळ- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेंट, ()  इंस्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आनंद- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल मॅनेजमेंट, () झेवियर स्कूल ऑफ रुरल मॅनेजमेंट, भूवनेश्वर- एमबीए इन रुरल मॅनेजमेंट, () झेवियर इंस्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रुरल मॅनेजमेंट, () टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स- स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट-तुळजापूर- एम.ए इन डेव्हलपमेंट पॉलिसी, प्लॅनिंग ॲण्ड प्रॅक्टिस, (१०) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ प्लँटेशन मॅनेजमेंट, बेंगळुरु- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲग्री-बिझिनेस मॅनेजमेंट.

०००

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी