भारतीय लष्कर : आव्हान आणि संधी (1)

भारतीय लष्कर : आव्हान आणि संधी (1)

भारतीय लष्कर (थलसेना, वायुसेना, नौसेना) यामध्ये 12 वी नंतर प्रवेशासाठी दरवर्षी संधी उपलब्ध होत असते. साहसी, प्रज्ञावंत, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या कणखर उमदेवारांनी या पर्यायांचा विचार करायला हवा. वेगळे करिअर आणि दर्जेदार जीवनशैली जगण्याची संधी यामुळे मिळू शकते. नागरीसेवांपेक्षा अधिक सुविधा, व्यक्तिमत्व विकासाच्या संधी, निवृत्तीनंतरही उत्तम आयुष्य जगण्यासाठी करण्यात येणारे सहाय्य, देशात आणि देशाबाहेरही नियुक्ती, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, मुलांच्या शिक्षणासाठी साहाय्य, ही काही या सेवेची वैशिष्ट्ये सांगता येतील.

थलसेनेत थेट प्रवेश

भारती थलसेनेत थेट प्रवेशासाठी 10+2 टेक्निकल एन्ट्री स्किम, ही योजना राबवली जाते. 12 वी विज्ञानशाखेत गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयामध्ये सरासरीने 70 टक्के गुण मिळवणारे उमेदवार यासाठी पात्र ठरतात. या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षे कालावधीचे अभियांत्रिकी शिक्षण दिले जाते. हा कालावधी संपल्यावर त्यांना लेफ्टनंट या पदावर नियुक्ती दिली जाते. यंदा 90  विद्यार्थ्यांची या निवड केली जाईल. संस्थेतील प्रशिक्षण देण्याची क्षमता तसेच त्याक्षणाला पदांची गरज लक्षात घेऊन कमी किंवा जास्त उमेदवारांना प्रवेश दिला जाऊ शकतो.

हा अभ्यासक्रम सुरु होण्याऱ्या महिन्याच्या पहिल्या तारखेस संबंधित उमेदवाराचे किमान वय साडेसोळा ते कमाल वय साडेएकोणवीस पेक्षा अधिक नसावे.

या योजनेचे स्वरुप हे शिक्षण आणि प्रशिक्षण असे आहे. उमेदवारांना पुढील प्रमाणे प्रशिक्षित केले जाते. (1) मुलभूत लष्करी प्रशिक्षण - याचा कालावधी एक वर्षाचा असून ते ऑफिसर प्रशिक्षण केंद्र गया, येथे दिले जाते. (2) फेज वन (टप्पा एक) - नियुक्तीपूर्व प्रशिक्षण - याचा कालावधी तीन वर्षाचा असून ते कॉलेज ऑफ मिलिटिरी इंजिनीअरिंग पुणे किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिंकदराबाद किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन महू येथे दिले जाते. (3) नियुक्ती नंतरचे प्रशिक्षण - याचा कालावधी एक वर्षाचा असून ते सुध्दा कॉलेज ऑफ मिलिटिरी इंजिनीअरिंग पुणे किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड मेकॅनिकल इंजिनीअरिंग सिंकदराबाद किंवा मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन महू येथे दिले जाते.

अभ्यासक्रमाच्या पूर्तेतनंतर विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीची अभियांत्रिकी पदवी  प्रदान केली जाते.

या उमेदवारांना लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाल्यावर दोन वर्षात कॅप्टन या पदावर पदोन्नती दिली जाते. सहा वर्षे पूर्ण झाल्यावर मेजर, आठ वर्षे पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट कर्नल, तेरा वर्षे पूर्ण झाल्यावर कर्नल, सव्वीस वर्षे पूर्ण झाल्यावर कर्नल (टाइम स्केल) या पदांवर पदोन्नती दिली जाते.  त्यानंतर ब्रिगेडिअर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, व्हाइस चिफ ऑफ द इंडियन आर्मी, चिफ ऑफ आर्मी स्टॉफ अशा पदोन्नती मिळू शकतात. मात्र त्यासाठी विशिष्ट अशा सेवा शर्ती असतात. त्यापूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या पदांवर निवड/पदोन्नती होऊ शकते.

अभ्यासक्रम/प्रशिक्षणाच्या काळात तीन वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ५६,१०० रुपये विद्यावेतन दिले जाते. चौथ्या वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर या उमेदवारांना लेफ्टनंट पदाचे संपूर्ण वेतन , भत्यासह लागू केले जाते. या उमेदवारांना त्यांच्या सेवाकाळात विविध प्रकाराचे लाभ आणि सुविधा दिल्या जातात.

निवड प्रकिया

या योजनेअंतर्गत निवडीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची, 12 वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. यासाठी विशिष्ट कटऑफ गुण निर्धारित करण्यात येतात. निवडलेल्या उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डा (एसएसबी) पुढे मुलाखती/चाळणी परीक्षा द्यावी लागते. ही चाळणी अलाहाबाद, भोपाळ, बेंगळुरु किवा कपुरथळा यापैकी कोणत्याही एका केंद्रावर घेतली जाते. ही चाळणी मानसोपचार तज्ज्ञ, समूह चाळणी अधिकारी आणि मुलाखत घेणारे अधिकारी यांच्याव्दारे घेतली जाते.

प्रत्येक उमदेवारास दोन टप्प्यातील निवड प्रकियेतून जावे लागते. पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारासच दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरवले जाते. पहिल्या  टप्प्यात अयशस्वी झालेल्या उमेदवारांना लगेच परत पाठवले जाते. चाळणी परीक्षा पाच दिवस चालते. दुसऱ्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाळणी  घेतली जाते. एसएसबीने निवडलेल्या आणि वैद्यकीय बोर्डाने,वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त ठरवलेल्या उमदेवारांना नियुक्तीचे पत्र दिले जाते. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना एसएसबीच्या मुलाखत/चाळणी परीक्षेत मिळालेले गुण, उच्च शैक्षणिक अर्हता, एनसीसीचा अनुभव, इत्यादी बाबींचा समावेश केला जातो.

या चाळणी परीक्षेत काही अपघात किंवा जखम झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही.

संपर्क-www.joinindiaarmy.nic.in

०००

नौदलात थेट भरती

भारतीय नौदलामार्फत 10+2 (बी.टेक) कॅडेट एन्ट्री स्किम (योजना) राबवली जाते. या योजनेमधून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरुपी नियुक्ती (कमिशन) दिली जाते. त्यांना नॅव्हल ॲकॅडेमी, एजिमाला (केरळ) येथे चार वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या उमेदवारांची शैक्षणिक आणि कार्यकारी, अभियांत्रिकी आणि विद्दूत शाखेसाठी निवड केली जाते. यासाठी, जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन (जेईई) - मेन या परीक्षेतील गुण आणि प्राधान्यक्रम (प्रिफरन्स) या बाबींचा आधार घेतला जातो. पहिल्या प्रिफरंसमधील शाखा मिळाली नाही तर जागा उपलब्ध असल्यास उमेदवाराचा विचार दुसऱ्या शाखेसाठी केला जाऊ शकतो. उमेदवाराने केवळ एकच शाखा निवडल्यास, गुणवत्ता यादित येऊनही दुसऱ्या शाखेसाठी त्याचा विचार केला जात नाही.

या योजनेंतर्गत अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारास 12 वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने 70 टक्के आणि 12 वी किंवा दहावीत इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते.

निवड प्रकिया

प्राथमिक निवड यादितील उमेदवारांना बेंगळुरु, भोपाळ, कोलकता आणि विशाखापट्टणम येथील एसएसबीच्या केंद्रांमध्ये मुलाखती/ चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते.  चाळणी परीक्षेचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रांचे अवलोकन/ बोध, समूह चर्चा या बाबींचा समावेश असतो. या टप्प्यात अयशस्वी  झालेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. दुसऱ्या टप्प्याची चाळणी/मुलाखती चार दिवस चालतात. यामध्ये समूह  चर्चा, मानसशास्त्रीय चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असतो. यात यशस्वी झालेल्या उमदेवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते. ही चाचणी साधारणत: तीन ते पाच दिवस चालते. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड, नौदलाच्या गरजेनुसार ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी केली जाते. या काळतील संपूर्ण खर्च नौदलामार्फत केला जातो. संपर्क- www.joinindiannavy.gov.in

00


 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी