पदवीचे की कौशल्याचे महत्व ?
पदवीचे की कौशल्याचे महत्व ?
तज्जांच्या असे निदर्शनास आले आहे की, भारतातील कौशल्ययुक्त
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी दुरावत आहेत. त्यामुळे
गेल्या काही वर्षात अंदाजे १,३५,००,००० कोटी रुपयांची करिअर संधी गमावली गेली आहे.
सातत्याने वेगवेगळया संस्थांकडून सांगण्यात येत असते की, वाढते औद्योगिकरण आणि
आर्थिक वृध्दी यामुळे भारतात २०३० पर्यंत विविध क्षेत्रात कौशल्ययुक्त मनुष्यबळाची
गरज भासणाऱ्या २५० मिलियन रोजगार संधी निर्माण होणार आहेत. असे जर प्रत्यक्षात
घडले तर भारत हा जगातील सर्वात मोठा कौशल्ययुक्त मनुष्यबळ पुरवणारा देश ठरु शकतो.
कौशल्ययुक्त मनुष्यबळाचे हे महत्व लक्षात घेता पुढील काही
वर्षांमध्ये विद्यार्थ्यांकडे असणाऱ्या पदवीपेक्षा इतर शैक्षणिक बाबींचा विचार
रोजगार देताना केला जाऊ शकतो. अशी जाहिरात येऊ शकते की, संबंधित उमदेवारास डाटाबेस
व्यवस्थापनाचे कौशल्य, क्वालिटी ॲश्यूरन्स, इंफॉर्मेशन सेक्युरिटीचे तंत्र आणि
इंग्रजी भाषेतील संवाद व मौखिक कौशल्य हीच अत्यावश्यक गुणवत्ता असून संबंधित
उमदेवाराने कोणतीही पदवी प्राप्त केलेली असली वा नसली तरी चालू शकेल. एखाद्या
उमेदवाराने ही जाहिरात बघितली आणि त्याच्याकडे पदवीपेक्षा जाहिरातीत नमूद असणारे
कौशल्य-संच असेल तर तो या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरु शकतो. अशाच प्रकारच्या
इतर उमेदवारांसमवेत त्याची मुलाखत झाली व तो त्यात उत्तीर्ण झाला तर त्यास चांगली
नोकरीही मिळू शकते. ही परिस्थिती सध्या आपल्याकडे दिसत नसली तरी त्यादिशेने वाटचाल
मात्र सुरु झाल्याची चिन्हे दिसताहेत.
पदवीची गरज नाही ?
स्पेस एक्स् आणि टेसला या जगप्रसिध्द कंपन्याचा संस्थापक इलॉन
मस्क याने नुकतेच असे सांगितलेय की त्याच्या ऑटोमेटिव्ह आणि ऑटो कंपनित काम
मिळवण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नाही, मात्र संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञता जर
एखाद्याने मिळवली असेल तर त्याला रोजगार सुलभतेने मिळू शकतो. एलन मस्क याने २०१४ साली
सुध्दा, ऑटो बिल्ड नावाच्या नियतकालिकास दिलेल्या मुलाखतीत असेच मत व्यक्त केले
होते. या क्रांतीकारी विधानाकडे आपल्या देशातील विविध कंपन्यांच्या प्रमुखांचे
लक्ष गेले आहे. ते वेगवेगळया व्यासपीठांवर या अनुषंगाने विचार सुध्दा व्यक्त
करायला लागले आहेत.
आपल्या देशात ज्या सॉफ्टवेअर कंपन्या अभियांत्रिकी
महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंटसाठी जातात, तेव्हा विद्यार्थ्याची निवड करताना
त्याचा कल, तांत्रिक कौशल्य आणि त्याचे पदवी आणि दहावी - बारावी मधील गुण बघतात. त्यामुळे
अनेकदा उत्तम शैक्षणिक कामगिरी म्हणावी तेवढी चांगली नसलेल्या, मात्र तंत्रकौशल्य
उत्तम असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जात नाही. गुणांची सांगड अशी कौशल्याशी
जोडल्याने योग्य उमेदवाराची निवड होतच असते असे ठामपणे सांगता येत नाही. एलन मस्क
यांच्यामते अशी परिस्थिती आता बदलणे गरजेच आहे.
आऊट ऑफ बॉक्स विचार
काही कंपन्या कौशल्यप्राप्त उमेदवारांच्या गुणांना महत्व देत
नसल्याचे दिसून येते. नाविन्यता किंवा आऊट ऑफ बॉक्स जाऊन विचार करणाऱ्या सर्जनशील
व्यक्तिंना रोजगार देताना प्राधान्य देण्याचा विचार करायला हवा, असे गीकी बाईक्स
या स्टार्टअपचे संस्थापक श्री रजत भाटिया यांनी स्पष्ट केले आहे. ते त्यांच्या
कंपनित याच पध्दतीने उमेदवाराची निवड करतात. कागदी प्रमाणपत्रापेक्षा उमदेवाराची
वेगळा विचार करण्याची क्षमता आणि त्याबरहुकूम कार्य करण्याची तयारी ही बाब
सध्याच्या काळात महत्वाची ठरणार आहे.
याचा अर्थ पदवीपेक्षा तंत्रकौशल्य महत्वाचे समजायचे काय ? जीवनाच्या
स्पर्धेत पदवीचे महत्व कायम राहणार की कमी होणार की काहीच महत्व राहणार नाही, हे
प्रश्न निर्माण होतात. विद्यापीठ वा शैक्षणिक संस्थांमध्ये न जात
ज्ञान-तंत्र-कौशल्य अवगत केल्यास करिअर संधी मिळू शकतील का, असाही सवाल निर्माण
होतो. विद्यापीठीय शिक्षण हे फार महत्वाचे नसल्याचे काही जण ठामपणे सांगतात, यासाठी
ते फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि इतर
काही अशाच मान्यवरांचे उदाहरण देतात. ही सर्व मंडळी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण
करु शकली नव्हती. पण ही उदाहरणे तुरळक स्वरुपातील आहे. या उदाहरणातील व्यक्ती
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करु शकल्या नसल्या
तरी त्या अत्यंत बुध्दिमान आहेत. त्यांची तुलना सर्वसाधारणरीत्या करणे उचित
ठरणारे नाही. विविध क्षेत्रात यशस्वी झालेले नामवंत आपल्या यशाचे श्रेय हे
विद्यापीठीय शिक्षणास देत असतात, ही बाब सुध्दा विसरता येत नाही.
विद्यापीठीय शिक्षणाचे महत्व
अशा परिस्थितीत भारतात विद्यापीठीय शिक्षणास किती महत्व देणे
आवश्यक ठरेल किंवा आहे. सध्यातरी कोणत्याही व्यक्तिच्या जीवनाला वेगळी दिशा आणि
उंची देण्यासाठी विद्यापीठीय शिक्षणच महत्वाची भूमिका ठरवत असते. या शिक्षणामुळे
अशा व्यक्तिंनी निवडलेल्या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य प्राप्त केलेले असते. त्याबळावर
त्यांना चांगली करिअर संधी मिळते. त्यातून ते आणखी कौशल्ये हस्तगत करु शकतात.
आपल्या व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास करु शकतात. या बाबींचा उपयोग त्यांना आणखी उंच
झेप घेण्यास मदत होत असते. त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते, नेतृत्वकौशल्य
वाढते. नवी आव्हाने स्वीकारण्याची मनोभूमिका तयार होते. त्यात यशस्वी होण्यासाठी परीश्रम
करण्यासाठी ते तयार होतात. महाविद्यालीयन उच्च शिक्षणामुळे या बाबी शक्य होतात.
भारतीय विदयापीठांमधील शिक्षणामुळे या बाबी कितपत शक्य होऊ शकतात, याचा सुध्दा
विचार करणे भाग आहे.
रोजगारक्षमतेला फाटा
आपली शिक्षणपध्दती विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे कौशल्य
प्रदान करण्यास असमर्थ ठरत असल्याचे वारंवार विविध सर्वेक्षण आणि अभ्यासांमध्ये
दिसून आले आहे. विद्यापीठे ही बेरोजगार पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधरांची
निर्मिती करणारे कारखाने बनले आहेत. आपल्या देशाचा, एम्प्लॉयबिलिटी रिपोर्ट अहवाल
काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. त्यानुसार ८० टक्के पदवीधर अभियंत्यांना
त्यांच्या विषयातील तंत्र आणि कौशल्य प्राप्त करता येत नसल्याने ते योग्य त्या
रोजगार संधीपासून वंचित राहतात. थोडक्यात काय तर ८० टक्के अभियंते हे बेकार
राहण्याची शक्यता अधिक असते. त्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवडले जात नाही.
यातूनच भारतातील बेरोजगार किंवा रोजगारासाठी सक्षम नसणाऱ्या अभियंत्यांच्या संख्येत
दरवर्षी लक्षणीय स्वरुपात वाढत होत आहे.
स्टार्टअपमधील माहिती तंत्रज्ञानविषयक नोक-यांसाठी आवश्यक असणारे
तंत्र - कौशल्य - आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान या बाबी, फक्त ३.८४ टक्के
अभियंत्यांकडेच असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या बाबी लक्षात घेता पुढील
काही भ्रम दूर करणे गरजेचे आहे, अभ्यासकांच्या मते विद्यापीठीय शिक्षण घेणारे
सर्वच विद्यार्थी हे ज्ञानसंपन्न आणि रोजगारक्षम होतात, ज्या विद्यार्थ्यांना
उत्तम गुण मिळतात ते प्रचंड बुध्दिमान असतात, ज्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण
मिळतात ते सर्व विद्यार्थी कौशल्यप्राप्त असतात. या भ्रमांना दूर केल्यानंतरच
विद्यापीठीय शिक्षणाचा भर सैध्दांतिक ज्ञानापेक्षा कौशल्यनिर्मितीसाठी वाढू शकतो. तंत्र-
कौशल्य आणि विद्यापीठीय शिक्षणाचा सध्यातरी सुयोग्य संगम साधणे गरजेचे आहे. तांत्रिक
कौशल्यासोबत लेखन आणि मौखिक भाषिक कौशल्य बाबी अत्यंत महत्वाच्या ठरतात. तार्किक
विश्लेषण, संख्यात्मक कौशल्य, वेगळा विचार करण्याकडे असलेला कल आणि क्षमता, समस्यांचे
निर्धारण आणि या समस्या सोडवण्याची क्षमता, वेळेचे व्यवस्थापन, सामाजिक जाणिव, निर्णय
क्षमता, सकारात्मक विचारसरणी या सारख्या गुणांची वाढ करणे गरजेचे आहे. या गुणांच्या
बळावर हे विद्यार्थी भविष्यातील कोणत्याही समस्यांना थेटपणे आत्मविश्वासाने भिडू
शकतात. यासाठी विद्यापीठीय शिक्षणप्रणालीचा सध्या असलेला अधिकाधिक गुण मिळवण्यावरील
भर कमी करणे आवश्यक ठरते.
०००

Comments
Post a Comment