"एआय",वाढता वाढता वाढे!


 

"एआय",वाढता वाढता वाढे!

कृत्रिम बुध्दीमत्ता किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(एआय) हे सध्या वैज्ञानिक क्षेत्रातील सर्वाधिक महत्वाचे संशोधन ठरले आहे. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, ऑटोमोबाईलसह बहुतेक सर्वच औद्योगिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर केला जातो. त्याचा वापर झपाट्याने जीवनातील बहुतेक क्षेत्रात होताना दिसतो. स्मार्ट फोन आणि घरगुती उपकरणांना या कृत्रिम बुध्दीमत्तेने  "सूपर स्मार्ट " केले असून त्यात दिवसागणिक प्रगतीच होताना दिसते. कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे आपले जीवन अधिकाधिक सुलभ होताना दिसते. या क्षेत्रातील सततच्या या प्रगतीमुळे या क्षेत्रासाठी तज्ज्ञ आणि मनुष्यबळाचीही मागणी अधिकाधिक वाढलेली आहे.

मनुष्यप्राणी जी जी कार्य करु शकतो, ती कार्ये करणारी संगणकासारखी  जी यंत्रे वा रोबोट करतात, त्यासाठीचे जे तंत्र किंवा गणित (अल्गोरिदम) म्हणजे कृत्रिम बुध्दीमत्ता. संगणकामध्ये समाविष्ट प्रचंड माहितीचा साठा आणि संगणकीय शास्त्र याच्या साहाय्याने कृत्रिम बुध्दीमत्ता कार्यरत होते. कृत्रिम बुध्दीमत्तेचाच पुढचा भाग असणारे क्षेत्र म्हणजे मशिन लर्निंग आणि डीप लर्निंग. ही क्षेत्रे सारखी नसली तरी एकमेकांशी जवळीक साधून आहेत. सध्या जरी भारतात हे क्षेत्र बाल्यावस्थेत असले तरी नजिकच्या भविष्यात आपल्याकडे याचा वापर कल्पनातीत वेगाने निश्चितपणे होईल. सध्याच त्याचा वापर भारतातील अनेक उद्योग व्यवसायांनी सुरु केला असून, त्यांना प्रशिक्षित आणि तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासू लागली आहे. पुढच्या तीन चार वर्षात बहुतेक साऱ्याच उद्योगांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर केला जाईल. त्यामुळेच या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होतील.

यातील काही संधी पुढीलप्रमाणे राहतील

() बीग डेटा ॲनॅलिस्ट- हे तज्ज्ञ प्रचंड माहितीच्या साठ्याचा अभ्यास करुन भूतकाळातील सर्व बाबींचा शोध घेतात. त्याआधारे भविष्यासाठीचा कृतिआरखडा तयार केला जातो. किंवा त्या संदर्भातील कार्यरत करता येतील असे निष्कर्ष काढता येऊ शकतात. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने डेटा मायनिंग (माहितीचे खोदकाम) आणि डाटा ऑडिटिंग (महितीची व्यवहार्यता/परीक्षण/अंकेक्षण) करणाचे तंत्रकौशल्य हस्तगत केलेले असणे गरजेचे आहे. याशिवाय माहिती विश्लेषणासाठी आवश्यक अशा विविध भाषा (प्रोग्रॅमिंग) सुध्दा त्याला अवगत असणे आवश्यक ठरते.

() रिसर्च सायंटिस्ट - ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स, मशिन लर्निंग, डीप लर्निंग, कॉम्प्युटेशनल स्टॅटिस्टिक्स या तंत्र-कौशल्य-विषयात संबंधित उमेदवाराने प्रभुत्व मिळवलेले असावे. त्याला संगणकीय प्रयोगशाळेमध्ये या बाबींवर प्रयोग करणे आणि निष्कर्ष काढता यायला हवेत. संगणक शास्त्रातील प्रगत पदवी किंवा डीप लर्निंग आणि मशिन लर्निंग मधील पदवी/पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

()बिझिनेस इंटेलिजन्स डेव्हलपर(बीआय)- बाजारातील/व्यवसायातील विविध प्रवाहांचे विश्लेषण करण्यासाठी माहितीच्या साठ्याचे "खोदकाम-प्रक्रिया -निष्कर्ष " असे तीन टप्प्यातील काम या तज्ज्ञास करावे लागते. व्यवसाय/बाजाराच्या व्युहनीती ठरवण्यासाठी उपयुक्त ठरु शकणारे सॉफ्टवेअर/प्रोग्रॅमिंग तयार करण्याचे कामही या मनुष्यबळास करता येणे आवश्यक ठरते. संगणकीय व्यवसाय बुध्दीमत्तेवर प्रभुत्व असणारा एकतरी प्रशिक्षत उमदेवार असणे ही प्रत्येक व्यवसाय/उद्योगाची गरज झाली असल्याने, बीआय डेव्हलपर हे सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र ठरले आहे.

() रोबोटिक इंजिनीअर- कृत्रिम बुध्दीमत्तेच्या क्षेत्रात आता अधिकाधिक रोबोटचा वापर सुरु झाला आहे. त्यामुळे आपल्या गरजांनुसार यंत्रांचे प्रोग्रॅमिंग करु शकणाऱ्या रोबोटिक अभियंत्यांची मोठी गरज पुढील काळात लागणार आहे. उद्योग /व्यवसायातील जी कामे मुनष्य करु शकत नाही वा करु इच्छित नाही अशा सर्व प्रकारची कामे करु शकणारे रोबोट वा रोबोटिक यंत्रणेची निर्मिती, देखभाल आणि दुरुस्तीची काम या अभियंत्यांना करावी लागतील.

() सॉफ्टवेअर इंजिनीअर- कृत्रिम बुध्दीत्तेशी निगडित बाबीसह सॉफ्टवेअर प्रोग्रॅमची निर्मिती आणि विकास करण्याची जबाबदारी या तज्ज्ञावर असते. या तज्ज्ञास विविध संगणकीय भाषा, सॉफ्टवेअर विकासाचे तंत्रकौशल्य आणि संगण्कीय यंत्रणेच्या वापराचे ज्ञान असणे गरजेचे असते. सॉफ्टवेअर तंत्र आणि ज्ञानाचा वापर करुन त्यांन नवे सॉफ्टवेअर/प्रोंग्रम्स/टूल्सची निर्मिती करावी लागते.

या क्षेत्रात विविध प्रकारच्या संधी उपलब्ध असल्या तरी हे क्षेत्र अतिशय स्पर्धात्मक आहे. उच्च दर्जाचे तांत्रिक ज्ञान आणि कार्यानुभव असल्यास अशा संधी मिळणे सुलभ जाऊ शकते.

ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअरिंग

कोचिन शिपयार्ड लिमिटेड हा भारत सरकारचा एक महत्वाचा औद्योगिक उपक्रम आहे. या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणा-या मरिन इंजिनीअरिंग ट्रेनिंग इंसिट्यूट या संस्थेमार्फत प्री-सी जीएमई (ग्रॅज्युएट मरिन इंजिनीअरिंग) हा एक वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाला डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग या संस्थेने मान्यता प्रदान केली आहे. मेकॅनिकल किंवा नॅव्हॅल आर्किटेक्चर या विषयातील बीटेक केलेले  विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख- १ सप्टेबर २०२३ ही आहे.

() आयएमइसी इंडियन जीएमई ट्रेनिंग प्रोग्रॅम- या प्रशिक्षणाचा कालावधी-एक वर्षं.७० टक्के गुणांसह मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करु शकतात.लेखी परीक्षा आणि मुलाखतीव्दारे प्रवेश दिला जातो.

दोन्ही अभ्यासक्रमानंतर प्रवासी व मालवाहतुकीच्या जहाजावरील तांत्रिक स्वरुपाच्या पदांवर रोजगाराच्या संधी मिळतात.

संपर्क संकेतस्थळ-www.csimeti.in, ईमेल-meti.admnoff@cochinshipyard.in दूरध्वनी- ०४८४-४०११५९६

सुरेश वांदिले

०००

 

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी