नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनव्हर्सिटी


 नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनव्हर्सिटी

अभियांत्रिकीसाठी बहुतेक विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे आयआयटी मुंबई येथे प्रवेश हवा असतो, त्याचप्रमाणे विधि शाखेचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास पहिले प्राधान्य नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनव्हर्सिटीला दिले जाते. या संस्थेने गेल्या काही वर्षात विधि शिक्षणात देशात पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे.

संस्थेने विधि शिक्षणप्रकियेत उच्च दर्जा आणि गुणवत्ता स्थापित केली आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमात जागतिक स्तरावरील मान्य झालेले आधुनिक प्रवाह तातडिने समाविष्ट केले जातात. संस्थेचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विधि क्षेत्रातील सर्वोच्च गुणवत्ता प्राप्त व्यक्ती येत असतात.

ही संस्था २३ एकरच्या विस्तृत परिसरात वसली आहे. शासनाच्या आर्थिक पाठबळावर ही संस्था तीस वर्षापूर्वी सुरु झाली. या कालावधीत संस्थेच्या गुणवत्तेत सातत्याने भर पडत गेली आहे.

वेगळी ओळख

आपल्या देशात या संस्थेने विधि शिक्षणात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या संस्थेमार्फत अभ्यासक्रमात सातत्याने नाविन्यता आणली जाते. समाजाला भेडसावणाऱ्या महत्वाच्या पैलू आणि बाजूंचा ठळकपणे अभ्यास केला जातो. विधि शिक्षणाची दिशा ही न्यायाशी सुसंगती साधणारी ठेवली जाते. सातत्याने सामाजिक हिताच्या समस्या, प्रश्नांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांच्या जागृतीसाठी ही चर्चासत्रे उपयुक्त ठरली आहेत. या संस्थेने गेल्या वर्षी याच हेतुने मार्जिनलाईज्ड कम्युनिटी स्टडी सेंटर आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रिसर्च ॲण्ड ॲडव्हकॅसी आणि इंस्टिट्यूट ऑफ लॉ ॲण्ड इथिक्स इन मेडिसिन या गटांची स्थापना केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मुक्तपणे सामाजिक विषयांवर आपली मते मांडता येतात, भाष्य करता येतात. सामाजिक समस्यांच्या निर्धारणासाठी कोणत्या नव्या कायद्यांची गरज आहे, याविषयी विचारमंथन केले जाते. विद्यार्थ्यांना स्वतंत्ररीत्या विचार करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे त्यांच्या वैचारिक सर्जनशिलतेला उंच झेप घेता येणे शक्य होते. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर अध्यापकांच्या विरोधात मते व्यक्त करतात, त्यांना आव्हान देतात. त्यांच्या प्रश्नांना बगल न देता, उत्तरे दिली जातात.

विधि विषयाशी संबधित मुख्य अभ्यासक्रमांसोबत इतर वेगळे विषय उदाहरणार्थ - निवडणूक सुधारणा, सायबर सुरक्षा, अंतराळ कायदे, स्पर्धात्मक कायदे, कृत्रिम बुध्दिमत्ता, आरोग्य काळजी असे विषय शिकण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते. दररोज दुपारचा वेळ सामाजिक विषयांच्या वादविवादासाठी ठेवला जातो. यासाठी संबंधित विषयातील शासकीय, सार्वजिनक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि विधि क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले जाते. यातील काही तज्ज्ञ अध्यापनासाठी येत असतात.

या संस्थेकडे अत्यंत समृध्द असे ग्रंथालय आहे. परीक्षेच्या काळात मध्यरात्रीपर्यंत हे ग्रंथालय सुरु राहते.

प्रवेश प्रक्रिया

या संस्थेत बीए-एलएलबी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा संपूर्ण निवासी स्वरुपाचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी नाव नोंदवणे आवश्यक आहे. बेंगळुरु येथील विद्यार्थी असला तरी त्यास वसतिगृहातच राहावे लागते.

प्रवेशासाठी कॉमन लॉ ॲडमिशन द्यावी लागते. या परीक्षेत पहिल्या ७५ ते १०० क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणे सुलभ जाउु शकते. पहिल्या ५०० विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही संस्था असते.

संस्थेतील शिक्षण हे बहु आयामी आणि प्रात्यक्षिकांवर भर देणारे असते. शिकवण्याच्या प्रकियेत प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन, चर्चासत्रे, प्रकरण निहाय अभ्यास, अभिरुप न्यायालयाचे कामकाज आणि प्रकल्पकार्य अशा बाबींचा समावेश असतो.

 अभिनव पध्दती

या संस्थेने अध्यापनाची एक नवी आणि वैशिष्ट्यपूर्ण पध्दत विकसित केली आहे. यानुसार एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक अध्यापक शिकवतात व विद्यार्थ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्यांचे समाधान करतात. सामाजिक आणि न्यायिक समस्यांच्या बहुज्ञानशाखीय विश्लेषणात्मतक निरकारणाच्या दृष्टिने ही अध्यापन प्रक्रिया उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थी कोलंबिया, येल, हार्वर्ड, ऑक्सफोर्ड, केंब्रिज, वारविक, मिशिगन यासारख्या जागतिक श्रेष्ठत्वात वरच्या श्रेणित असणाऱ्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी निवडले गेले आहेत. ऱ्होडस आणि इनलेक्स सारख्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळत असतात. या संस्थेतील विद्यार्थी सध्या उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालायांमध्ये कार्यरत आहेत. अनेकांनी त्यांची यशस्वी प्रॅक्टिस सुरु केली आहे. देश विदेशातील नामवंत कॉर्पोरेट  लॉ कंपन्यांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. समन्यायी आणि सर्वसमावेशकतेचे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावे यासाठी प्रयत्न केले जातात.

दूरशिक्षण पध्दतीचे अभ्यासक्रम

यासंस्थेने दूरशिक्षण पध्दतीलाही महत्व दिले आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यातील काही समस्या न्यायालयात जात आहेत. नीतिमत्तेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या बाबी लक्षात घेऊन संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॉ ॲण्ड इथिक्स हा अभ्यासक्रम मीनाक्षी मिशन हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च या संस्थेच्या सहकार्याने सुरु केला आहे. डिप्लोमा इन एन्व्हीरॉन्मेंटल लॉ, डिप्लोमा इन ह्युमन राईटस, डिप्लोमा इन चाईल्ड राईट्स, कंझुमर लॉ ॲण्ड प्रॅक्टिस आणि सायबर लॉ ॲण्ड सायबर फॉरेंसिक हे इतर अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम दूरशिक्षण पध्दतीने करता येतात.

या संस्थेचे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेश संधी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना सातत्याने उत्तमोत्तम प्लेसमेंट मिळाले आहे.

नामवंत संस्था

गेल्या काही वर्षात सातत्याने सर्वोच्च स्थान पटकावणारी काही विधि महाविद्यालये -नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी-बेंगळुरू, द वेस्ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायंसेस- कोलकता, सिम्बॉसीस लॉ स्कूल-पुणे, आयएलएसएस लॉ कॉलेज - पुणे, फॅकल्टी ऑफ लॉ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी - वाराणसी, फॅकल्टी ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ - पुणे, फॅकल्टी ऑफ लॉ अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी - अलिगढ, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ओडिशा, फॅकल्टी ऑफ लॉ युनिव्हर्सिटी-लखनौ.

पॅकेजेस

गेल्या काही वर्षात पुढील शासकीय विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज मिळाले आहेत. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी-, बेंगळुरू - सरासरी वार्षिक पॅकेज १५ ते १८ लाख रुपये, द वेस्ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायंसेस, कोलकता - सरासरी वार्षिक पॅकेज ११ ते १३ लाख रुपये, फॅकल्टी ऑफ लॉ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी - वाराणसी सरासरी वार्षिक पॅकेज साडे पाच ते सहा लाख रुपये, फॅकल्टी ऑफ लॉ अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी - अलिगढ सरासरी वार्षिक पॅकेज साडे पाच लाख ते साडे सहा लाख रुपये, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ओडिशा सरासरी वार्षिक पॅकेज साडे पाच लाख ते साडे सहा लाख रुपये.

पुढील खाजगी विधि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळाले आहे. आयएलएस लॉ कॉलेज पुणे - सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडे आठ लाख रुपये, लॉयड लॉ कॉलेज - ग्रेटर नायॅडा सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडे आठ लाख रुपये, सिम्बॉयसीस लॉ कॉलेज - सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडे आठ लाख रुपये, न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ, पुणे- सरासरी वार्षिक पॅकेज सात ते आठ लाख रुपये, आर्मी इंस्टिट्यूट ऑफ लॉ, मोहाली- सरासरी वार्षिक पॅकेज पाच ते सहा लाख रुपये.

०००

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी