सहज आणि सुलभ ग्राहकी
सहज आणि सुलभ ग्राहकी
जागतिक अर्थकारणात रिटेल उद्योग महत्वाची भूमिका बजावत आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतातील या उद्योगास नवे परिमाण देण्यासाठी सज्ज
झाल्या आहेत. वेगाने वाढत असलेल्या या उद्योगात पुढील काही वर्षात २० लाखाच्या
आसपास करिअरच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांच्या
सहज आणि सुलभ खरेदीसाठीची व्यवस्था म्हणजे
रिटेल मॅनेजमेंट. अधिकाधिक ग्राहकांना दुकानापर्यंत आकर्षित करुन त्यांच्यापुढे
हव्या तेवढ्या ब्रँडच्या वस्तू किंवा उत्पादने अत्यंत आकर्षकरीत्या सादर करण्याचा
भाग या व्यवस्थेत सामील आहे. ग्राहक आणि उत्पादक यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून
हे क्षेत्र उपयुक्त ठरत आहे. ग्राहकाला एकाच ठिकाणी असंख्य ब्रँड बघण्याचे, निवडीचे
आणि त्यातून मानसिक समाधान मिळवण्याची
संधी आणि सुविधा रिटेल मॅनेजमेंटमुळे मिळू लागली आहे. या व्यवस्थेमुळे ग्राहकाला
असंख्य ठिकाणी जाण्याचा त्रास आणि वेळ वाचतो. रिटेल मॅनेजमेंटमध्ये आकर्षक मांडणी व
सजावटीस मोठे प्राधान्य देण्यात येत असल्याने ग्राहकांची खरेदी हा नेत्रसुखद आणि
मनभावक असा प्रवास ठरतो.
रिटेल मॅनेजमेंट हे सध्या
वेगाने वाढत असलेले क्षेत्र असल्याने त्यात करिअरच्या विविध संधी निर्माण होत
आहेत. गेल्या काही वर्षात भारताने या क्षेत्रात मुसंडी मारली असून या क्षेत्रातील
कंपन्या व उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज भासू लागली आहे. आंतरराष्ट्रीय
दर्जाची गुणवत्ता प्रकिया आणि कार्यप्रणाली माहीत असलेल्या व त्याचा वापर
प्रभावीपणे करु शकणाऱ्या उमेदवारांना मोठी मागणी आहे.
रिटेलिंग व्यवसायात जगातील मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
भारतातही रिटेल उद्योंगाचा विस्तार आता मोठ्या शहरांकडून लहान शहरांकडे सुरु
झाल्याने याची व्याप्ती वाढली आहे. या विषयाचे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार
ग्राहकांशी सुसंवाद साधणे, व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कार्य करणे, अधिक्षकीय
म्हणजे सुपरवायजरी स्वरुपाची कामे करु शकतात. पुढील काही वर्षात जगभरात २० लाखाहून
अधिक संधी या क्षेत्रात निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याने रिटेल व्यवसायाला त्याचा
फायदा मिळत आहे. डिजिटायझेशनमुळे ग्राहंकापर्यंत पोहचणे सुलभ झाले आहे.
ई-कॉर्मसच्या संकेतस्थळांमध्ये सतत भर पडत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित
करण्याची तंत्रे आणि कौशल्य, त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग आणि
ग्राहकोपयोगी वस्तु किंवा उत्पादनांची मोठया प्रमाणावर खरेदी, या बाबींचा समावेश
रिटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात होतो. स्मार्ट ग्राहकांना खरेदीसाठीचे असंख्य
स्मार्ट पर्याय उपलब्ध करुन देण्याची किमया या क्षेत्रातील मनुष्यबळास करावी
लागते.
अभ्यासक्रम
रिटेल मॅनेजमेंट या विषयात
पुढील अभ्यासक्रम करता येतात – (१) डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट, (२) बॅचलर ऑफ फॅशन रिटेल मॅनेजमेंट, (३) बीबीए इन रिेटेल मॅनेजमेंट, (४) एमबीए इन रिटेल मॅनेजमेंट, (५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट, (६) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॅशन रिटेल
मॅनेजमेंट.
या विषयातील मनुष्यबळांना पुढील कंपन्यामध्ये करिअर
करण्याची संधी मिळू शकते- (१) रिटेल उद्योग (डिमार्ट/ बिगबाजार/), (२) रिलायन्स ग्रुप, (३) आटीसी रिटेल, (४) आदित्य बिर्ला ग्रुप, (५) टाटा, (६) लाइफ स्टाइल इंटरनॅशनल,
(७) स्पेन्सर,
इत्यादी.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी
उपलब्ध होऊ शकतात- (१)
रिटेल मॅनेजर, (२) स्टोर
मॅनेजर, (३) रिटेल बायर, (४) ॲनॅलिस्ट, (५) मर्कंडायझर, (६) सप्लाय चैन
डिस्ट्रिब्युटर, (७) वेअरहाऊस मॅनेजर, (८) मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, (९) ब्रँड मॅनेजर, (१०) कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, (११) इमेज प्रमोटर, (१२) मर्कंडाइज
मॅनेजर, (१३) डिपार्टमेंट मॅनेजर
अर्हता- रिटेल मॅनेजमेंट या विषयातील अभ्यासक्रम १२ वी आणि पदव्युत्तर
स्तरावरील आहेत.
महत्वाच्या संस्था-
रिटेल मॅनेजमेंट या विषयात शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या
महत्वाच्या संस्था-
(१) बिर्ला इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
टेक्नॉलॉजी- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन
रिटेल मॅनेजमेंट, संपर्क- प्लॉट नंबर ५, नॉलेज पार्क टू, ग्रेटर नॉयडा (एनसीआर)- २०१३९६, संकेतस्थळ- www.bimtech.ac.in, दूरध्वनी- ०१२०-६८४३०००
(२) एल.एन वेलिंगकर इंस्टिट्यूट ऑफ
मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट, कालावधी दोन वर्षे, संपर्क-
प्राचार्य, वुई स्कूल, लखम्सी नॅप्पो रोड, माटुंगा मध्य रेल्वे जवळ, मुंबई- ४०००१९,
- दूरध्वनी-०२२-२४१९८४००, फॅक्स- २४१०५५८५, संकेतस्थळ-www.welingkar.org, ईमेल- pgapp@weligkarmail.org
(३) डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचे स्कूल ऑफ मॅनेजमेंट- एमबीए इन रिटेल मॅनेजमेंट,
कालावधी- दोन वर्षे. संपर्क- ज्ञानपुष्पा निकेतन, प्लॉट नंबर १०,सेक्टर ४,
सीबीडी बेलापूर, नवी मुंबई -४००६१४, दूरध्वनी-०२२-२७५८९२०० फॅक्स २७५७५०६४,
संकेतस्थळ- http://www.dypatil.edu/schools/management/mba-in-retail-management/
(३) के.जे सोमय्या- पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट, संपर्क-
के.जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स ॲण्ड रिसर्च, विद्याविहार- पूर्व,
मुंबई- ४०००७७, दूरध्वनी- ०२२-६७२८३०००, संकेतस्थळ- simsr.somaiya.edu/ ईमेल-
(४) सिक्किम मनिपाल युनिव्हर्सिटी-
बीबीए - या अभ्यासक्रमाच्या चार,पाच आणि सहाव्या सत्रात रिटेल मॅनेजमेंटच्या
विविध पैलुंना शिकवले जाते. संकेतस्थळ- smude.edu.in,ईमेल- smuhelpdesk@smudde.edu.in
(४) आरआयएमटी
युनिव्हर्सिटी-
बीबीए इन रिटेल मॅनेजमेंट- अर्हता कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण, संपर्क
संकेतस्थळ- rimt.ac.in, ईमेल-info@rimt.ac.in
(५) एसआरएम युनिव्हर्सिटी- या संस्थेच बीबीए या अभ्यासक्रमांमध्ये रिटेल
मॅनेजमेंट या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.ईमेल- Infodesk@srmuniv.ac.in संकेतस्थळ- http://www.srmuniv.ac.in
००००

Comments
Post a Comment