स्मार्ट आणि सुबक
स्मार्ट आणि सुबक
इंटेरिअर
डिझायनर हा पूर्वीच्या काळात खूप महत्वाचा होताच. पण त्याचे स्थान तसे मर्यादित
होते. आजच्या काळाने इंटेरिअर डिझायनरला वेगळे महत्व दिले आहे . इंटेरिअर डिझायनर
हा एका खोलीच्या घरापासून ते २५ खोल्यांच्या महालापर्यंतच्या अंतर्गत सजावटीचा
सूत्रधार असतो.
काय शिकाल ?
घर असावे छान,
असे सध्याचे ब्रिदवाक्य नाही. तर घर दिसावे स्मार्ट, असे ते झाले आहे. घराला स्मार्टपणा आणण्याची जादू इंटेरिअर डिझायनरला
प्राप्त झाली असते. इंटेरिअर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांना, या जादूमध्ये तज्ज्ञता प्राप्त व्हावी म्हणून, स्केचिंग, ड्राईंग,
डिझायनिंगची मूलभूत तत्वे, डिझायनिंगच्या दृष्टिने आवश्यक असणारी भूमितीय कौशल्ये
आणि तंत्र, अभियांत्रिकी चित्रकला/ ग्रॅफिक्स, डिझायनिंगची विविध साधने, दृष्यात्मक
आरेखन, छायाचित्रण कला, संगणकाची मूलभूत तत्वे, संकल्पनेचे डिझाइन आणि चित्रांकन, अंतर्गत
सजावटीचा इतिहास, सौंदर्यकला, आकृती आणि आकार, रंगसंगती, त्यासाठी वापरली जाणारी
साधने व साहित्य, डिझायनिंगची कार्यपध्दती, अंतर्गत सजावटीची प्रक्रिया, डिझायनिंगची
प्रतिकृती, कलाकुसरीवर आधारित डिझायनिंग, सार्वजनिक ठिकाणचे डिझायनिंग, वाणिज्यिक
कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागांचे इंटेरिअर डिझायनिंग, मोठ्या इमारती अथवा
मॉलची दृषात्मकता वाढवण्याचा अभ्यास, डिझायनिंग व्यवस्थापन, डिजिटल मॉडेलची
निर्मिती आणि त्याची प्रत्यक्ष प्रतिकृती, सांस्कृतिक अभ्यास, अंतर्गत सजावटीसाठी
आवश्यक असणाऱ्या छायात्रिणाचे तंत्र, निवासी संकुलांचे डिझायनिंग, नवकल्पनेचे
सर्जन, अंतर्गत विद्दूतप्रकाश, वास्तुकलेची मुलभूत तत्वे, वस्तुसंग्रहालये आणि
चित्रगॅलरींच्या डिझाइन संकल्पना, प्रदर्शनाचे डिझायइन, ग्राहकाच्या संकल्पनेनुसार
डिझायनिंगचे तंत्र, वैश्विक डिझायनिंग आणि शाश्वतता इत्यादी बाबींचा समावेश असतो.
इंटेरिअर
डिझायनिंगच्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांचा समावेश असतो. शिवाय इंटेरिअर
डिझायनिंगच्या वेगवेगळया कंपन्या, फर्म, बिल्डर यांच्याकडे इंटर्नशीप करण्याचीही
संधी मिळते. या कालावधीत शिकलेले ज्ञान आणि कौशल्याचा वापर प्रभावीपणे करता आला,
तर करिअरचा पुढचा मार्ग सुलभ होऊ शकतो.
परीश्रम आणि संयम
इंटेरिअर
डिझायनिंगचा अभ्यासक्रम केल्याबरोबरच लगेच दुसऱ्या क्षणाला चांगली नोकरी मिळेल वा
मोठी कामे मिळतील, असे शक्य होत नाही. कारण या क्षेत्रात बाप दाखव - श्राध्द कर -
दक्षिणा घे, हा सिध्दांत महत्वाचा ठरतो. इंटेरिअर डिझायनिंग ही कलाकारी आहे.
कोणत्याही कलाकारास पहिल्याच झटक्यात अपवादानेच संधी मिळते. त्याला आपली कला सिध्द
करण्यासाठी संयमाने प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न कधीच वाया जात नाही . तुमची
फुललेली प्रतिभा एखाद्याच्या लक्षात आली तर तोच तुमचा वाटाडया ठरतो आणि नव्या
नव्या ग्राहकांना तुमच्याकडे आणि तुम्हाला या ग्राहकांकडे पोहचवतो. पदवीस्तरीय
कालावधीतील सैध्दांतिक पाया आणि त्यानंतरचा अनुभवाचा पाया खणखणीत असेल तर मग तुमची
गाडी सुसाट पळू शकते.
अनुभवाचा फायदा
चांगल्या अनुभव प्राप्त इंटरिअर
डिझायनरला मोठी मागणी असते. असे डिझायनर अनेकदा घराच्या एकूण किमतीच्या काही
टक्केवारीमध्ये शुल्क आकारतात. ते उच्चदर्जाची सेवा देतात. सर्व आधुनिक तंत्रांचा
आणि प्रवाहांचा कौशल्यपूर्ण वापर करतात. ग्राहकांचे पूर्ण समाधान होण्यापर्यंत काम
करतात. ग्राहकांच्या संकल्पनेनुसार आणि त्यांच्याकडील निधीनुसार जे डिझायनर उत्तम
काम करतात, त्यांना पुढील संधी गतिने मिळू
लागते.
मुंबई - पुणे - ठाणे - नाशिक -
नागपूर या अ श्रेणींच्या शहरांसह ब आणि क श्रेणीच्या शहरांमध्येही मोठ मोठी गृहसंकुले
उभी राहत आहेत. वाणिज्यिक कार्यासाठी लागणाऱ्या इमारती उभ्या राहत आहेत. रुग्णालये
- रिसॉर्ट - हॉटेल - पंचतारांकित निवासस्थाने - सेवा उद्योग देणारी कार्यालये उभी
राहत आहेत. अशा सर्वांचाच कल हा इंटेरिअर डिझायनिंगकडे असतो. एकूण खर्चाचा काही
भाग यासाठी बाजूला काढलेला असतो. त्यामुळचे इंटेरिअर डिझायनरचे मार्केट वाढत चालले
आहे.
व्यावसायिकदृष्ट्या इंटेरिअर डिझायनरला यशस्वी होण्यासाठी या विषयाचा
अभ्यासक्रम चांगल्या संस्थांमधून करायला हवा. या क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलांची
संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने चांगल्या संस्था या चाळणी परीक्षा घेऊन प्रवेश
देतात. या परीक्षा सर्वसाधारण स्वरुपाच्या असतात. विद्यार्थ्यांचा इंटेरिअर
डिझायनिंगचा कल बघण्यासाठी प्रश्न विचारले जातात. चित्रकला - रेखांकन याविषयीच्या
मूलभूत माहितीची संबंधित विद्यार्थ्याची झेप कुठपर्यंत जाते हे तपासले जाते. शिवाय
समकालीन घडामोडीवर काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. परीक्षेचा दर्जा हा १२ वीचा
असतो. बहुतेक सर्व परीक्षा या ऑब्जेक्टिव्ह पध्दतीच्या म्हणजेच वस्तुनिष्ट
पध्दतीच्या असतात.
काही संस्था-
(१) नॅशनल
इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन - या संस्थेने बॅचलर ऑफ डिझाइन - इन फर्निचर ॲण्ड इंटेरिअर
डिझायनिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा
आहे. इंटेरिअर डिझायनिंगमध्ये फर्निचरचा लक्षणीय सहभाग असतो, त्यामुळे हा
अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्निचर डिझायनिंगचे अतिरिक्त ज्ञान मिळते.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. हा अभ्यासक्रम आपल्या
देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम समजला जातो. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. ही परीक्षा
डिझाइन ॲप्टिटयूड टेस्ट (डीएटी) यानावाने ओळखली जाते. त्याचे प्राथमिक आणि मुख्य असे दोन भाग असतात.
प्राथमिक परीक्षेच्या पेपरचा कालावधी तीन तास. या पेपरमध्ये १०० गुणांचे प्रश्न
विचारले जातील. प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असते. प्राथमिक परीक्षेसाठी
महाराष्ट्रातील केंद्रे- नागपूर आणि मुंबई.
प्राथमिक
परीक्षेच्या पेपरमध्ये दोन भाग असतात. पहिल्या भागात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ
पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान व अवतीभवतीच्या
घटनांचे आकलन, तार्किक क्षमता, उताऱ्यावरील प्रश्न, संख्यात्मक चाचणी, आकृत्या,
कार्यकारण भाव, तपासण्यासाठी प्रश्नांची रचना केली जाते. भाग दोन हा निबंधात्मक
स्वरुपाचा असतो. या भागात वेगवेगळया परिस्थितीचे वर्णन करणारे उतारे दिले जातात.
त्यावर आधारित चित्र काढावे लागतात. उमदेवारांच्या चित्रांकनाचे कौशल्य तपासणीसाठी
या भागाचा उपयोग केला जातो.
मुख्य
परीक्षा- प्राथमिक परीक्षेतील गुणांवर आधारित विशिष्ट संख्येत मुख्य परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांना निवडले जातात. या परीक्षेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी admissions.nid.edu
या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. ही परीक्षा गांधीनगर/अहमदाबाद
किंवा इतर कॅम्पसमध्ये दोन दिवस चालते. ही चाळणी कॅम्पसमधील स्टुडिओमध्ये घेतली
जाते. अभिकल्प शिक्षणासाठी विद्यार्थ्याची कलचाचणी करणा-या विविध प्रकारच्या
चाळणीचा यात समावेश असतो. या चाळणीसाठी १०० गुण ठेवण्यात येतात. चाळणीची भाषा
इंग्रजी असते.
संपर्क - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, पाल्डी,
अहमदाबाद - ३८०००७, दूरध्वनी-०७९-२६६२९५००, ई-मेल - academic@nid.edu आणि admission@nid.edu, संकेतस्थळ- www.nid.edu
(२) जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स -
या संस्थेने बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन इंटेरिअर डेकोरेटर हा अभ्यासक्रम सुरु केला
आहे. या अभ्यासक्रमाचा कालवधी तीन वर्षांचा आहे. इंटेरिअर डिझायनरचे करिअर
घडविण्यासाठी हा एक प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
मोठी स्पर्धा असते. प्रवेशासाठी शासनाच्या सीइटीमार्फत प्रवेश दिला जातो.
संपर्क - सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, ७८, डॉ. डी. एन.
रोड फोर्ट, मुंबई - ४००००१, दूरध्वनी -०२२-२२६२१६५२, ई-मेल-jjschoolofart@gmail.com, संकेतस्थळ- https://www.sirjjschoolofart.in/
(३) रचना संसद
रचना
संसद ही इंटेरिअर डिझाइनचे शिक्षण प्रशिक्षण देणारी महत्वाची खाजगी संस्था आहे. १९६०
साली स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये
बॅचलर ऑफ व्होकेशन इन इंटेरिअर डिझाइन हा पदवीस्तरीय अभ्यासक्रम करता येतो.
अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशासाठी कल चाचणी घेतली जाते. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी
संलग्नित आहे.
इतर अभ्यासक्रम - गव्हर्मेंट
डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाइन. हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण
मंडळाशी संलग्नित आहे. कालावधी तीन वर्षे. तो अंशकालीन म्हणजेच पार्ट टाइम करता
येतो. अर्हता - १० वी उत्तीर्ण.
सर्टिफिकेट ॲण्ड ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन इंटेरिअर डिझाइन - १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला हे अभ्यासक्रम करता येतात. हे
अभ्यासक्रम रचना संसदने सुरु केले आहेत. ते अंशकालीन पध्दतीने करता येणे शक्य
आहेत.
संपर्क
- २७८, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी मुंबई - ४०००२५, दूरध्वनी - ०२२-२४३०१०२४, टेलेफॅक्स- २४३१०८०७, ई-मेल -
contact@rachanasansad.edu,संकेतस्थळ- rachanasansad.edu.in
(४) सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन - या संस्थेत इंडस्ट्रिअल
डिझाइन शाखेत या इंटेरिअर स्पेस डिझाइन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. अर्हता-
कला, वाणिज्य आाणि विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण
विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या विद्यार्थ्याला बारावीच्या
परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. १० वी नंतर तीन वर्षे कालावधीचा
अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी सुध्दा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत सिम्बॉयसीस एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर
डिझाइन, ही चाळणी परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कल
चाचणी/स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली
जाते.
संपर्क- सिम्बॉयसीस
इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, रस्ता क्रमांक- २३१/४ ए, विमान नगर, पुणे-४११०१४,
दूरध्वनी-०२०-२६५५७२००,ई-मेल - admissions@sid.edu.in, संकेतस्थळ- www.sid.edu.in
(५) एमआयटी
इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेत
इंटेरिअर ॲण्ड स्पेस डिझाइन कोर्स हा अभ्यासक्रम करता येतो.कालावधी- चार
वर्षे.अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण, निवड- ॲप्टिट्यूड
टेस्टव्दारे.
संपर्क - एमआयटी,
इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोणी - काळभोर, पुणे—४१२२०१, दूरध्वनी- ०२०-६७६५२३००,ई-मेल-admissions@mitid.edu.in,संकेतस्थळ- /www.mitid.edu.in
(६) श्रिष्टी इंस्टिट्यूट ऑफ आर्ट,डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी (श्रिष्टी मणिपाल) - या संस्थेत इंटेरिअर डिझाइन ॲण्ड बिल्ड, हा तांत्रिक बाबींवर भर
देणारा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कनुसार
या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. कालावधी तीन वर्षे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील १२ वी विद्यार्थी
प्रवेश मिळू शकतो. ही निवड चाळणी परीक्षेद्वारे केली जाते.
सध्याच्या काळात कमी जागेचा अधिकाधिक उत्तम
उपयोग करण्याची गरज वाढली आहे. त्यादृष्टिने इंटेरिअर डिझायनर हे ग्राहकांची इच्छा
व अपेक्षेनुसार अंतर्गत सजावट करुन देतात. या अभ्यासक्रमात इंटेरिअर डिझायनिंगचे
तांत्रिक ज्ञान आणि ग्राहकाला परवडेल अशा मूल्यांमध्ये डिझायनिंगची निर्मिती करणे,
डिझाइन आणि बांधकामाचा सुयोग्य समन्वय साधणे याबाबींचे कौशल्य शिकवले जाते.
इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात अनेक नव्या
तंत्राचा वापर केला जातो. त्रिमिती (थ्री-डी) संकल्पना
वापरली जाते. या सर्व बाबी या अभ्यासक्रमात शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना तंत्र
आणि सर्जनशीलता याचा सुयोग्य वापर करता येणे शक्य व्हावे, यासाठी भरपूर सराव संधी
दिली जाते.
या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षानंतर
प्रशिक्षणार्थी डिझायनर म्हणून संधी मिळू शकते. वरिष्ठ डिझायनर आणि बांधकाम करणारे
अभियंते,व्यवस्थापक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.
दुसऱ्या वर्षानंतर ग्राहक, सल्लागार आणि बांधकाम अभियंते,व्यवस्थापक यांच्यामध्ये
डिझायनिंगच्या अनुषंगांने कार्यरत असणाऱ्या टीमचा मुख्य भाग हे विद्यार्थी बनू
शकतात.
तिसऱ्या वर्षानंतर प्रत्यक्ष प्रकल्प
राबवण्याची संधी मिळते. त्याचबरोबर डिझायनिंग प्रकल्पात काम करत असलेल्या एकाहून
अधिक टीम(पथक)चे समन्वयन करण्याची संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर
बांधकाम, रिटेल, पर्यटन, आतिथ्य, माध्यमे व मनोरंजन क्षेत्रातील डिझायनिंगच्या
संधी मिळू शकतात.

Comments
Post a Comment